‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ साजरा करण्यासाठी सहभागी व्हा : मोहिते-पाटील

‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ साजरा करण्यासाठी सहभागी व्हा : मोहिते-पाटील
Published on
Updated on

अकलूज : पुढारी वृत्तसेवा 'स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा' निमित्ताने 13 ते15 ऑगस्ट रोजी अकलूज येथे होणार्‍या भव्यदिव्य कार्यक्रमासाठी सर्व अकलूजकरांसोबतच माळशिरस तालुक्यातील विविध गावांतील संघटनांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन सहकारमहर्षी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांनी केले. भारताचा 75 वा स्वातंत्र्य दिवस अमृतमहोत्सवी वर्ष म्हणून साजरे होत आहे. यानिमित्ताने अकलूजमध्ये भव्य कार्यक्रमाच्या नियोजनासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील यांनी बोलाविलेल्या सहविचार सभेत जयसिंह मोहिते-पाटील बोलत होते.

यावेळी भाजपचे संघटन महामंत्री धैर्यशील मोहिते-पाटील, प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा स्वरुपाराणी मोहिते-पाटील, माजी सरपंच किशोरसिंह माने-पाटील, तहसीलदार जगदीश निंबाळकर, गटविकास अधिकारी विनायक गुळवे, पो. नि. अरुण सुगावकर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे आदींसह अकलूज परिसरातील विविध संघटनांचे पदाधिकारी व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी जयसिंह मोहिते-पाटील म्हणाले की, अकलूजमध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, आनंदयात्रा, विज्ञानयात्रा, रयतेचा राजा, राजा शिवछत्रपती हे महानाट्य, गौरव भारतीय लोककलेचा, गौरव मराठी मातीचा, स्वातंत्र्यदिनाचे दिल्लीच्या धर्तीवरचे चित्ररथ संचलन, गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेला अकलूजचा महालेझीम अशा भव्यदिव्य कार्यक्रमांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अकलूजचा लौकिक वाढविला आहे. याच परंपरेला साजेसा भारताचा अमृतमहोत्सव साजरा करायचा असल्याने यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे.

राष्ट्रीय सण, धार्मिक सणात सर्व जाती-धर्मातील अकलूजकर सहभागी होऊन साजरा करतात, ही अकलूजची परंपरा आहे. याच परंपरेनुसार सर्वांनी योगदान देऊन हा कार्यक्रम न 'भुतो, न भविष्यति' असा साजरा करायचा असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले की, सहकारमहर्षींनी सुरू केलेल्या कार्यक्रमाची परंपरा व त्याचा आलेख बाळदादांनी कायमच चढता ठेवलेला आहे. कार्यक्रमाची देशपातळीवर दखल घेतली जाईल, असा कार्यक्रम करण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे. या कार्यक्रमात सहकारमहर्षी साखर कारखाना, शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज नगरपरिषद यांच्यासह परिसरातील विविध संस्था, संघटना, सार्वजनिक मंडळे सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाच्या नियोजनाकरिता विविध कमिट्या कार्यरत आहेत. 'हर घर तिरंगा' या उपक्रमात सर्वांनी उत्स्फूर्त सहभागी होण्याचेही यावेळी सांगितले. यावेळी नागरिकांनी आपल्या सूचना सभेत मांडल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news