करमाळा : पुढारी वृत्तसेवा करमाळा तालुक्यातील पंचायत समितीच्या 12 गणाचे आरक्षण सोडत गुरुवारी पंचायत समितीच्या सभागृहात काढण्यात आली. यावेळी नियंत्रक अधिकारी तथा भूसंपादनच्या उपजिल्हाधीकारी अरुणा गायकवाड व तहसीलदार समीर माने, गटविकासाधिकारी मनोज राऊत यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली. या आरक्षणावरील आक्षेपासाठी 2 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यावेळी नायब तहसीलदार विजयकुमार जाधव, सुभाष बदे, संतोष गोसावी आदी अधिकारी तर कृषी कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक चंद्रकांत सरडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, बाजार समिती चे संचालक देवानंद बागल, युवा नेते सुनिल सावंत, चंद्रशेखर जोगळेकर, अशोक सरडे, वीटचे उदय ढेरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
करमाळा तालुक्यातील रावगाव, पांडे, हिसरे, वीट, कोर्टी, केत्तूर, चिखलठाण, उमरड, जेऊर, वांगी, साडे व केम या पंचायत समीतीच्या या 12 गणांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. करमाळा तालुक्यात अनुसूचित जातीसाठी 2 जागा आरक्षित ठेवल्या आहेत. त्यापैकी उमरड येथील एक महिलांसाठी राखीव असणार आहे. एकुण 12 जागा पैकी स्त्रियांसाठी 6 जागा राखीव असणार आहेत. तर पुरुषांसाठी 6 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ओबीसींसाठी 3 जागा असणार आहेत त्यापैकी 2 जागा महिलांसाठी असणार आहेत. हे आरक्षण चक्रानुक्रमाप्रमाणे काढण्यात आले आहेत. 2002 पासूनच्या निवडणुकीपासून चार निवडणुकीचे आरक्षण पाहुन ही आरक्षण सोडत काढण्यात आली आहे.
अनुसूचित जातीसाठी उमरड व वांगी हे गण आरक्षित असणार आहेत. नागरिकांचा मागास वर्गासाठी जेऊर व केम एका जागेसाठी चिठ्ठी टाकण्यात आली. त्यात जेऊर आरक्षित करण्यात आले आहे. तर वीट व केम नामप्र महिलांसाठी हे गण आरक्षित असणार आहेत. तर रावगाव, पांडे, हिसरे, कोर्टी, केत्तूर, चिखलठाण, साडे सर्वसाधारणसाठी राखीव असणार आहेत. त्यापैकी महिलांसाठी पांडे, कोर्टी व चिखलठाण हे राखीव असणार आहेत. अनुसूचित जागेसाठी उमरड व वांगी या दोन गणांपैकी उमरड हे महिलांसाठी तर वांगी सर्वसाधारणसाठी राखीव असणार आहे. ओबीसीसाठी म्हणजे इतर मागासवर्गीय साठी केम व वीट गणासाठी एखदाही महिलांसाठी आरक्षण देण्यात आलेले नव्हते. त्यामुळे तेथे थेट आरक्षण देण्यात आले आहे.
सर्वसाधारण जागेसाठी आता एकूण 7 गण आहेत. पूर्वी पांडे, कोर्टी, केत्तूर व चिखलठाण येथे महिला आरक्षण देण्यात आले नव्हते. त्यामुळे तेथेही चिट्टी टाकुन आरक्षण काढण्यात आले. त्यात कोर्टी, चिखलठाण व पांडे हे गण महिला सर्वसाधारणसाठी आरक्षित राहणार आहेत. यावेळी करमाळा तालुक्यातील अनेक राजकीय पदाधिकारीनी आरक्षण सोडतीवेळी मोठी गर्दी केली होती. जातीनिहाय आरक्षण अनुसूचित जाती आरक्षणासाठी 31 हजार 682 लोकसंख्या निश्चित करण्यात आली होती. यावरून दोन जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. पंचायत समितीच्या 12 गणांपैकी अनुसूचित जातीसाठी 2 जागा जागा. त्यात एक जागा महिलासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. इतर मागासवर्गीयासाठी 3 जागांपैकी 2 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.