

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथील लोकमंगल कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषिदूत ग्रुप प्रत्यक्ष कृतीतून आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती अन्नदाता बळीराजाच्या दारात जाऊन देत आहेत. कृषी महाविद्यालयातील कृषिदुतांनी प्रत्यक्ष कृतीतून शेतकर्यांना बीजप्रक्रिया व त्याचे फायदे, माती परिक्षण का करावे, नवीन अवजार ओळख, पीक नियोजन व शेतीविषयक शासनाच्या विविध योजना, पाणी व्यवस्थापन, बीज उगवण क्षमता चाचणी, फळबाग तसेच विविध फळ पिकांचे कलम यासाठी प्रात्यक्षिक दाखवत आहेत.
या उपक्रमात कृषिदूत साहिल जावळे, धनेश लोंढे, तेजस देशमुख, विशाल डोंगरे, संकेत फुके, अतिश हंडाळ या कृषिदुतांनी शेतकर्यांना माहिती दिली. या कृषिदुतांना प्राचार्य डॉ. सचिन फुगे, कार्यक्रम समन्वयक कुदळे, विषयतज्ज्ञ प्रा. दळवी, प्रा. बनकर, प्रा. रवींद्र पालकर, प्रा. जाधवर यांचे प्रात्यक्षिकासाठी मदत व मार्गदर्शन लाभले. सुशांत लाडे, बसवराज तुरखे, अर्जुन लाडे, बसवराज लाडे, दुपारगडे, आप्पासाहेब लाडे यांचे या विद्यार्थ्यांना सहकार्य मिळाले.
लोकमंगल कृषी महाविद्यालयाच्या कृषिदुतांच्या मार्गदर्शनाचा फायदा कृषी नियोजनासाठी होणार आहे. या माध्यमातून त्यांनी बरीच माहिती दिली आहे. त्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात आम्ही करणार आहोत.
– चंदूलाल मळेवाडी शेतकरी