ओबीसी आरक्षणाने समीकरणे बदलली | पुढारी

ओबीसी आरक्षणाने समीकरणे बदलली

सोलापूर पुढारी वृत्तसेवा सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण मान्य केल्याने आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासहित होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. ओबीसीसह अनुसूचित जाती, जमाती, महिला आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी येत्या 28 जूनला आरक्षण सोडत होत आहे. यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी ही आरक्षण सोडत होणार आहे. यावर 29 जुलै ते 2 ऑगस्टपर्यंत हरकती मागविण्यात येतील. या आरक्षण सोडतीचे अंतिम प्रसिद्धीकरण 5 ऑगस्टला होईल. त्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. आता कोणता गट कोणत्या प्रवर्गासाठी राखीव होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

आपल्या सोयीचे आरक्षण पडावे यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेसाठी 77 जिल्हा परिषद गट आहेत, तर पंचायत समितीसाठी 154 पंचायत समिती गण आहेत. यामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात 77 जिल्हा परिषद गटांपैकी 39 जागा महिला प्रवर्गासाठी राखीव असणार आहेत. 67 जागा सर्वसाधारण असणार आहेत. त्यामध्येही पुन्हा महिला प्रवर्गासाठी 32 जागा राखीव असणार आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी असलेल्या 12 जागांपैकी पुन्हा सहा जागा या महिला प्रवर्गासाठी राखीव असणार आहेत. एसटी अर्थात अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 1 जागा राखीव असून ती एकमेव जागा आता महिला प्रवर्गासाठी राखीव असणार आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण 68 जागांपैकी आणि 27 टक्के आरक्षणानुसार 16 ते 17 जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखी होणार आहेत. त्या सोळा जागांपैकी पुन्हा 8 जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत. तीच परिस्थिती पंचायत समितीमध्येही आहे. त्या ठिकाणी आता जवळपास 75 ते 80 जागा वाढणार आहेत. त्यामुळे ओबीसी प्रवर्गातील अनेक कार्यकर्ते जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. त्यासाठी येत्या 28 जुलै रोजी आरक्षण सोडत होणार आहे.

सोडतीचे ठिकाण आणि वेळ लवकरच
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या एससी, एसटी महिला सर्वसाधारण आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी येत्या 28 जुलै रोजी आरक्षण सोडत होणार असून त्यासाठीची वेळ आणि ठिकाण लवकरच जाहीर करणार असल्याची महिती महसूल उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले यांनी दिली.

Back to top button