सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा सोशल मीडियावरून महिलेशी मैत्री करून अमेरिकेहून पाठविलेले गिफ्ट कस्टममधून सोडवून घेण्याचे आमिष दाखवून एक महिन्यात महिलेची 21 लाख 86 हजार 443 रुपयांची फसवणूक करणार्या तिघांविरुद्ध जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कॅप्टन मॅक्सवेल लुकास, कल्याणी व राहुल कुमार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत एका महिलेने फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणातील महिलेशी इन्स्टाग्रामवर कॅप्टन लुकास याने मैत्री करून चॅटिंग केले व त्या महिलेचा व्हॉटसअप नंबर घेतला. त्यानंतर त्या महिलेचा विश्वास संपादन करून तिच्या व्हॉटस् अॅप् नंबरवर अनेकवेळा संपर्क साधला.
कॅप्टन लुकास याने त्या महिलेला अमेरिकेहून एक गिफ्ट पाठविले असून ते कस्टममध्ये अडकले आहे, ते सोडवून घेण्यासाठी कल्याणी व राहुल कुमार यांच्या बँक खात्यांवर पैसे टाकण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्या महिलेने 20 जून ते 19 जुलै 2022 या कालावधीत युनियन बँकेतील खात्यावर 6 लाख 40 हजार रुपये, एसबीआय बँकेतील खात्यावर 96 हजार रुपये, इंडियन बँकेतील खात्यावर 1 लाख रुपये, कॅनरा बँकेतील खात्यावर 2 लाख 54 हजार रुपये, पंजाब नॅशनल बँकेतील खात्यावर 3 लाख 10 हजार रूपये, कोटक महिंद्रा बँकेतील खात्यावर 6 लाख 90 हजार रुपये असे मिळून 20 लाख 90 हजार रुपये जमा केले.
तसेच राहुल कुमार याने त्याच्या मोबाईलवरून त्या महिलेस फोन करून एनी डेस्क हे अॅप डाऊनलोड करण्यास सांगून त्या महिलेच्या बँकेच्या खात्यातून 96 हजार 443 रुपये डेबीट करून घेतले. अशा प्रकारे वरील तिघांनी मिळून त्या महिलेची 21 लाख 86 हजार 443 रुपये काढून घेऊन तिची फसवणुक केली. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्या महिलेने जेलरोड पोलिस ठाणे गाठून याबाबत फिर्याद दाखल केली. पोलिस निरीक्षक करणकोट पुढील तपास करीत आहेत.