सोलापूर : प्राण्यांच्या अवयवांची विक्री करताना कारवाई

सोलापूर : प्राण्यांच्या अवयवांची विक्री करताना कारवाई

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा सोलापूर शहरातील मंगळवार पेठ, मधला मारुती या ठिकाणी दुकानातून वन्य प्राण्यांचे अवयव विक्री होत असल्याची गुप्त माहिती वन विभागाला प्राप्त झाल्यानंतर 18 जुलै रोजी वन विभागाने त्या दुकानात धाड टाकून कारवाई केली आहे. यामध्ये काही साहित्य जप्त करण्यात आले असून, दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील मंगळवार पेठेत मल्‍लिनाथ सिद्रामप्पा बनशेट्टी यांच्या मालकीचे दुकान आहे. या ठिकाणी अनेक आयुर्वेदिक गोष्टींची विक्री केली जाते. त्याचठिकाणी हातजोडे, इंद्रजाल, कस्तुरीमृग तसेच काही वन्यप्राण्यांचे अवयव त्याचबरोबर आवळा, हिरडा, बेहडा यांसारख्या गोष्टी विक्री होत असल्याची गुप्त माहिती वन विभागाला मिळाली होती.

यावर वन विभागाने वनपरिक्षेत्र अधिकारी पी.डी. खलाने यांच्या मार्गदर्शनानुसार त्याठिकाणी धाड टाकली. यावेळी मल्लिनाथ बनशेट्टी
(वय 58) यांच्याकडून हातजोडी 47 नग, इंद्रजाल 12 नग, कस्तुरीमृग 84 नग, तर रवींद्र विरुपाक्ष ओनामे (वय 51) यांच्याकडून 50 नग हातजोडे असे साहित्य जप्त करण्यात आले. त्यामुळे या दोघांविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 2.16, 2.36, 9.39 आर/डब्ल्यू 57, 44, 48 ए 50 व 51 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या हातजोडे, घोरपड या वन्य प्राण्यांच्या अवयवांच्या तस्करीचा गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक डी. एम. पाटील, सहायक वनउपसंरक्षक एस. एल. आवारे, बी. जी. हाके, वनपाल एस. बी. कुताटे, ए. एस. शिंदे, गंगाधर कणबस यांच्या पथकाने केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news