जिल्हाध्यक्ष पदासाठी धैर्यशील मोहिते-पाटील यांचे नाव आघाडीवर | पुढारी

जिल्हाध्यक्ष पदासाठी धैर्यशील मोहिते-पाटील यांचे नाव आघाडीवर

माळशिरस : पुढारी वृत्तसेवा सोलापूर जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदावर कोणाची वर्णी लागणार, याची चर्चा संध्या जिल्ह्यासह तालुक्यात भाजपच्या वर्तुळात चालू आहे. भाजपचे सरचिटणीस धैर्यशील मोहिते-पाटील यांचे नाव आघाडीवर असल्याचे संकेत मिळत आहे. त्यांच्या निवडीने जिल्ह्यासह माळशिरस तालुका भाजपला त्यांच्या संघटनकौशल्याचा फायदा होणार आहे.
धैर्यशील मोहिते-पाटील यांच्याशिवाय माळशिरस तालुक्यालाच हे पद मिळ्याल्यास माळशिरस तालुक्यात असलेले धनगर समाजाचे प्राबल्य पाहून माळशिरसचे नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख व भाजपच्या किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब सरगर यांच्या नावांची चर्चा होऊ शकते, असे भाजपच्या कार्यकर्त्यांतून बोलले जात आहे.

आगामी काळात सोलापूर जिल्ह्यासह माळशिरस तालुक्यात अकलूज नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. या निवडणुका भाजपच्या दृष्टीने फार महत्त्वाच्या आहेत. माळशिरस तालुक्यात भाजपचे दोन आमदार आहेत. आता भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी लवकरच निवड होणार आहे. जर धैर्यशील मोहिते-पाटील यांना अध्यक्ष पदाची संधी मिळाली. तर आगामी निवडणुकीत जिल्ह्यात भाजपचे पारडे जड राहणार आहे. त्यांच्याकडे युवकांची फळी मोठी आहे तसेच डॉटर मॉम फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांचे काम मोठे आहे. जर धैर्यशील मोहिते-पाटील यांना संधी जरी मिळाली नाही, तरी मोहिते-पाटील गटाकडून ज्यांचे नाव श्रेष्ठींकडे जाईल, त्या उमेदवाराला पक्षश्रेष्ठींकडून सहानुभूती मिळण्याची शक्यता आहे. त्यातच तालुक्यातच अध्यक्षपद देण्याचे ठरले तर तालुक्यात धनगर समाजाचे प्राबल्य असल्याने माळशिरसचे नगराध्यक्ष व भाजप ओबीसी सेलचे राज्य उपाध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख यांना आपल्या राजकीय व सामाजिक कामांमुळे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

भाजप किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब सरगर यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. त्यांनी तालुक्यात किसान सेलच्या माध्यमातून पक्ष संघटना वाढविण्याचे चांगले काम केले आहे, अशी भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे. तरीही भाजप श्रेष्ठींनी काही धक्कातंत्र वापरले तर ज्या कार्यकर्त्याचे नाव कुठेही चर्चेत नाही, त्याच्या गळ्यात जिल्हाध्यक्षपदाची माळ पडू शकते. डॉ. आप्पासाहेब देशमुख हे नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष व आता नगराध्यक्ष आहेत, तर बाळासाहेब सरगर हे भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष आहेत. याआधी 1996 साली माळशिरसचे अ‍ॅड. सुभाष पाटील यांना जिल्हाध्यक्षपद मिळाले होते. भाजपचे जिल्हाध्यक्षपद तालुक्यात येणार की जिल्ह्यात इतरत्र जाणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांना आहे.

… तर यांना मिळू शकते संधी

धैर्यशील मोहिते-पाटील यांच्याशिवाय माळशिरस तालुक्यालाच हे पद मिळाल्यास माळशिरस तालुक्यात असलेले धनगर समाजाचे प्राबल्य पाहून माळशिरसचे नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख व भाजपच्या किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब सरगर यांच्या नावांची चर्चा होऊ शकते, असे भाजपच्या कार्यकर्त्यांतून बोलले जात आहे.

Back to top button