माळीनगर येथे तुकाराम महाराज पालखीचे उभे रिंगण उत्साहात | पुढारी

माळीनगर येथे तुकाराम महाराज पालखीचे उभे रिंगण उत्साहात

माळीनगर : गोपाळ लावंड

टाळ, मृदुंगाचा ध्वनी ।
गेले आसमंत व्यापुनी ।
नभ आले भरूणी ।
अश्व दौडले रिंगणी ॥

माळीनगर (ता. माळशिरस ) येथे बुधवारी सकाळी 8 वाजता जगत् रू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचे उभे रिंगण मोठ्या भक्तीमय वातावरणात पार पडले. माळीनगर पालखी मैदानात अश्वांनी नेत्रदीपक दौड करून लाखो वैष्णवांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. आसमंत व्यापून टाकणारा चैतन्य स्वरूप टाळ मृदुंगाचा नाद त्यातून निर्माण होणारे ज्ञानबा-तुकाराम नामाचा गजरात सहर्ष स्वागत करण्यात आले.

॥ सावळे सुंदर रूप मनोहर
राहो निरंतर ह्रदयी माझे ॥

टाळ मृदंगाचा नाद , कपाळी अष्टीगंध आणि मुखात हरीनामाचा जयघोष…गेली पंधरा दिवस अखंडितपणे विठुरायाच्या ओढीने निघालेला वारकरी हजारो वैष्णवांच्या साक्षीने माळीनगर नगरीत संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा मानाच्या अश्वाच्या उभ्या रिंगणाने भल्या सकाळी मॉडेल हायस्कूल च्या प्रशस्त प्रांगणात मोठ्या उत्साहाने विसावला .

॥ याची देही याची डोळा
पहावा सोहळा ॥

परिसराला जणू विठ्ठलनामाचे वेड लागले होते. ज्ञानोबा माऊली तुकाराम गजराने आसमंत दुमदुमला. सकाळपासून पालखी स्वागतासाठी ग्रामपंचायत माळीनगर, दि सासवड माळी शुगर फॅक्टरी, महात्मा फुले पतसंस्था, सामाजिक संघटना, स्थानिक प्रतिनिधी सज्ज झाले होते.
उभ्या रिंगणासाठी जमलेला हजारोंचा जनसमुदाय डोळयाचे पारणे फेडत होता. अखेर मानाच्या अश्वाने रिंगणात धाव घेतल्यानंतर दोहोबाजूला उभा असणारा वारकरी भान हरपून गेला होता. याचसाठी केला होता अट्टाहास, म्हणत सोहळा डोळ्यात साठवत होता. ग्रामपंचायत माळीनगर चे सरपंच अभिमान जगताप, उपसरपंच नागेश तुपसौंदर्य, सदस्य महादेव बंडगर, तसेच रमजान इनामदार, शुगर केन सोसायटीचे चेअरमन अमोल ताम्हाणे, काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष आण्णासाहेब शिंदे, तालुका वैद्यकीय रामचंद्र मोहिते, माळीनगर केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संकल्प जाधव, पोलीस निरीक्षक अरूण सुगावकर यांनी माळीनगर पालखी प्रवेश करताना स्वागत केले.

पालखीचे पादुकापूजन सासवड माळी शुगर फॅक्टरीचे संचालक मोहन लांडे व संध्याताई लांडे या उभयंताच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सासवड माळी शुगर फॅक्टरीचे मॅनेजिंग डायरेक्टर राजेंद्र गिरमे, व्हा. चेअरमन परेश राऊत, होलटाईम डायरेक्टर सतीश गिरमे, जनसंपर्क अधिकारी अनिल बनकर, इले.इंजि. अनिल जाधव, अनिल जोशी, मुख्य सुुरक्षा अधिकारी शार्दुल शिंदे, शेतकी अधिकारी सचिन कुदळे, रिंकू राऊत आदी उपस्थित होते. याप्रसंगी पालखी सोहळ्याचे विश्वस्त, अध्यक्ष पदाधिकारी चोपदार आदींचे सत्कार करण्यात आले. पुढे दुपारी पुढील विसाव्यासाठी पालखी माळीनगरकरांचा निरोप घेऊन मार्गस्थ झाली.

Back to top button