सोलापूर : श्री संत तुकाराम महाराज पालखी आज जिल्ह्यात | पुढारी

सोलापूर : श्री संत तुकाराम महाराज पालखी आज जिल्ह्यात

अकलूज : रवी शिरढोणे जगद‍्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आज मंगळवार दि. 5 जुलै रोजी सकाळी सात वाजता सोलापूर जिल्ह्यात आगमन होत आहे. पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी अकलूज नगरी सज्ज झाली आहे. दिनांक 4 जुलै रोजीचा पुणे जिल्ह्यातील सराटी येथील शेवटचा मुक्काम आटोपून पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत नीरा नदी ओलांडून अकलूज येथे प्रवेश करीत आहे. तत्पूर्वी सकाळी निरा नदी पात्रात श्री संत तुकोबारायांच्या पालखीतील पादुकांना परंपरेनुसार निरास्नान घालण्यात येणार आहे.

पुणे जिल्ह्यातील सराटी व सोलापूर जिल्ह्यातील अकलूज हे अंतर केवळ तीन किलोमीटर असून नीरा नदी ओलांडून हा पालखी सोहळा जिल्ह्यात आगमन करत असतो. सोलापूर हद्दीत नीरा नदी तीरावर या पालखी सोहळ्याचे जिल्ह्यातील शासकीय प्रशासनाच्या वतीने स्वागत होणार आहे. यावेळी तोफांची सलामी ही दिली जाणार आहे. सदर पालखी सोहळ्याचा दि. 5 रोजी अकलूज येथे मुक्काम आहे. त्याचबरोबर अकलूज च्या गांधी चौकात अकलूज करांच्या वतीने पालखी सोहळ्याचे स्वागत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते होणार आहे. तर सदुभाऊ चौकात पालखी सोहळ्याचे शिक्षण प्रसारक मंडळ हे स्वागत करणार आहे. पालखी सोहळ्यातील तिसरे व सोलापूर जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण हे सदाशिवराव माने विद्यालयाच्या मैदानावर होणार आहे.

संस्थेचे मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लाखो भाविकांना हा नेत्रदीपक रिंगण सोहळा अनुभवयास मिळणार आहे. या सोहळ्यासाठी अकलूज नगर परिषदेच्या वतीने पूर्ण तयारी करण्यात आली आहे. परिसरातील विविध सामाजिक, स्वराज्य संस्था, सामाजिक मंडळे यांनी देखील पालखी सोहळ्याच्या सुविधेसाठी पुढाकार घेतलेला आहे. चौका चौकात पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून आरोग्य यंत्रनाही कार्यरत आहे. पालखी सोहळ्यासाठी निवास व्यवस्था, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य व सुरक्षा व्यवस्था ही प्रशासनाच्यावतीने करण्यात आली आहे. अकलूज परिसरातील चौका चौकात नगर परिषदेच्या वतीने वैष्णवांना मार्गदर्शक असणार्‍या नकाशाचे व आवश्यक स्थळांची माहिती देणारे डिजिटल फलक उभारण्यात आलेले आहेत.

अकलूज परिसरातील विविध मंडळांच्या वतीने पालखी सोहळ्यातील वैष्णवांना अल्पोपहार, भोजनाची व्यवस्था करण्याची तयारी सुरू झाली आहे. तर परिसरातील विविध मंदिरे व समाज मंदिरामध्ये भजन, भारुड, कीर्तनासाठी ही व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ठिकठिकाणी पोलीस चौकी, आरोग्य तपासणी चौक्या ही उभारण्यात आल्या आहेत. सदाशिवराव माने विद्यालयाच्या मैदानावर दिवसभर पालखी भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात येते. त्याचबरोबर पालखी सोहळ्यातील देवस्थानचे मान्यवर, उपस्थित मान्यवर यांचा सन्मान ही रिंगण सोहळ्याच्या मैदानावरच केला जाणार आहे.

Back to top button