सोलापूर : जिल्ह्यात येण्यासाठी 720 झेडपी शिक्षक इच्छुक | पुढारी

सोलापूर : जिल्ह्यात येण्यासाठी 720 झेडपी शिक्षक इच्छुक

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. मूळचे सोलापूर जिल्ह्यातील असलेले पण नोकरीसाठी अन्य जिल्ह्यांमध्ये वास्तव्यास असलेले 720 शिक्षक बदली घेऊन सोलापूरला येण्यासाठी इच्छुक आहेत. त्यासाठी त्यांनी ऑनलाईन प्रणालीने विनंती अर्ज सादर केला आहे.

जिल्हा परिषद कर्मचार्‍यांना आंतरजिल्हा बदलीने अन्य जिल्हा परिषदेमध्ये नेमणूक करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. या आंतरजिल्हा बदलीसाठी कर्मचार्‍यास किमान 5 वर्षे सलग सेवा होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे पक्षाघात, दिव्यांग कर्मचारी, शस्त्रक्रिया झालेले, विधवा, कुमारिका शिक्षक, परित्यक्ता तसेच वयाने 53 वर्षे पूर्ण झालेले कर्मचारी त्याचबरोबर पती-पत्नी एकत्रिकरण आदींची विशेष संवर्ग शिक्षकांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्हांतर्गत बदली करताना ज्या शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रात 10 वर्षे पूर्ण आणि विद्यमान शाळेत 5 वर्षे पूर्ण झाली आहेत, अशा शिक्षकांची तरतूद करण्यात आली आहे.

बदलीस पात्र शिक्षकांना जिल्ह्यातील 30 शाळांचा पसंतीक्रम द्यावा लागणार आहे. त्याचप्रमाणे पक्षाघाताने आजारी शिक्षक, दिव्यांग शिक्षक, शस्त्रक्रिया झालेले शिक्षक, विधवा शिक्षक, कुमारिका शिक्षक, परित्यक्ता-घटस्फोटीत महिला शिक्षक तसेच व्याधिग्रस्त शिक्षकांबरोबरच पती-पत्नी एकत्रिकरण आदी या विशेष संवर्ग शिक्षकांना बदली हवी असल्यास किंवा बदली नको असल्यास अर्ज करावा लागणार आहे.

महाराष्ट्रभर आहेत सोलापूरचे शिक्षक
शिक्षकांच्या बदल्या प्रक्रियांमध्ये पारदर्शकता राहावी, यासाठी ऑनलाईन प्रक्रियेद्वारे शिक्षकांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. सध्या सोलापूर जिल्ह्यातून ठाणे जिल्ह्यामध्ये 25, पालघर जिल्ह्यामध्ये 85, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 60, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 50, नंदुरबार जिल्ह्यामध्ये 35 व इतर ठिकाणी पाचशे असे एकूण 720 शिक्षक कार्यरत आहेत.

Back to top button