मंगळवेढा-ब्रम्हपुरी महामार्गाला तडे

मंगळवेढा
मंगळवेढा

मंगळवेढा : पुढारी वृत्तसेवा मंगळवेढा ते ब्रम्हपुरी काळ्या शिवारातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर मुरमीकरण योग्य रितीने न केल्यामुळे किरकोळ पडलेल्या पावसातही या सिमेंटचा महामार्ग भिजून अनेक ठिकाणी तडे गेल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. दरम्यान, भविष्यात या महामार्गाचे काय होणार याबाबत वाहनचालकांमधून चिंता व्यक्त करीत महामार्गाचे सोलापूर येथील शासकिय अभियंता यांनी याकामी लक्ष घालून तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

मंगळवेढा ते ब्रम्हपुरी हा भाग निव्वळ काळा शिवार म्हणून ओळखला जातो. या शिवारात 70 ते 80 फूट खोदाई केल्यानंतर काळा पाषाण लागत असल्याने या भागात सहसा बांधकाम करण्याचे धाडस कोणी करत नाही. याच शिवारातून रत्नागिरी-सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. या राष्ट्रीय सिमेंटच्या महामार्गाला काळया शिवारात अनेक ठिकाणी तडे गेल्याचे चित्र येणारे जाणारे वाहन चालक व नागरिक यांना पहावयास मिळत आहे. काळया शिवारातील रस्ते करताना ते मुरमीकरण करून त्याचे मजबुतीकरण करणे अपेक्षित होते.

मात्र सदर ठेकेदाराने मुरमाचे प्रमाण कमी वापरल्यामुळे किरकोळ पावसातही महामार्गाला तडे जात असल्याच्या वाहनचालकांच्या तक्रारी आहेत. या महामार्गाचे काम होत असताना सोलापूरचे महामार्ग अभियंता कदम यांनी जातीने लक्ष घालणे गरजेचे होते. मात्र त्यांची याकडे डोळेझाक झाल्यानेच या सिमेंट रस्त्याला तडे जात असल्याचा आरोप नागरिकांचा आरोप आहे. या कामी सोलापूरच्या राष्ट्रीय महामार्गाच्या अभियंत्यांनी लक्ष घालून या भागातील तडे गेलेले ठिकाण तात्काळ दुरुस्त करून घ्यावे, अशीही मागणी पुढे येत आहे. मागील महिन्यातच केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री ना.नितीन गडकरी यांच्या हस्ते महामार्गाचा लोकार्पण सोहळा पार पडला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news