मंगळवेढ्याचा राजकीय खेळखंडोबा | पुढारी

मंगळवेढ्याचा राजकीय खेळखंडोबा

मंगळवेढा : सचिन इंगळे तालुक्या-तील प्रत्येक गटाच्या वाढत चाललेल्या महत्त्वाकांक्षा व पक्षीय राजकारणाला दुय्यम स्थान असल्यामुळे राजकारणाचा खेळखंडोबा झाला आहे. भाजपचे आ. समाधान आवताडे यांना पक्षाच्या राजकारणावर आगामी काळातील निवडणुकांना सामोरे जावे लागणार असून, या निवडणुका त्यांची कसोटी पाहणार्‍या ठरणार आहेत. मंगळवेढा तालुक्याच्यादृष्टीने आर्थिक वरदायिनी असणार्‍या दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीनिमित्ताने तालुक्यातील विविध गट एकत्रित आवताडे यांच्या विरोधामध्ये लढायला तयार झाले. त्यात त्यांनी यश मिळविले. त्या निवडणुकीतील यशानंतर आता आगामीकाळातील नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये समविचारीच्या नावाखाली आ. समाधान आवताडे यांच्या विरोधामध्ये राजकारण होणार असल्याचे सध्याचे चित्र आहे.

परिचारक समर्थक आणि कार्यकर्ते यांना आ. आवताडे यांच्यासोबत तालुक्यात राजकारण करताना अडचणी ठरत आहेत. त्यामुळे त्यांना आवताडे यांच्या सोबतीपेक्षा अन्य गटा-तटांसोबत एकत्रित राहून राजकारणातील मोकळा श्‍वास घ्यायला सोयीचे ठरते, असे धोरण आगामी काळात कायम राहिले. नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या पदाधिकार्‍यांना राजीनामे द्यावे लागतील. कारण तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष हे संत दामाजी कारखान्याच्या निवडणुकीत आ. आवताडे यांच्याविरोधात निवडून आले आहेत. तसेच काहीसे चित्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात आहे. आ. भारत भालके यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीला एक खांबी तंबू राहिला नाही आणि पक्षावर पकड असलेले नेतृत्व नाही. राहुल शहा, लतीफ तांबोळी, रामेश्‍वर मासाळ, पी.बी. पाटील, तानाजी खरात यांच्यावर भिस्त असेल. कारण सध्या भालके गटातील कार्यकर्त्यांनी भारत भालके फौंडेशन उभारणी हाती घेतली असून त्यांचा मार्ग वेगळा असल्याचे निदर्शनास येते.

पण, मुख्य अडचण आवताडे यांच्यासमोर परिचारक गटाची आहे. गतवेळी नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या वेळी परिचारक-आवताडे-भालके हे भिन्न होते. आता आवताडे यांना सत्ताकेंद्र मिळू द्यायचे नाही म्हणून समविचारी आघाडी बनत आहे. अशात सिद्धेश्‍वर आवताडे यांचा गट त्यांचे उमेदवार आ. समाधान आवताडे यांना प्रत्येक निवडणुकीत सामावून घेण्याचे आव्हान वेगळेच आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सिद्धेश्‍वर आवताडे यांनी मोर्चेबांधणी केलेली आहे. मग त्यांना जागा देण्याशिवाय परिचारक गट सोबत ठेवायचा असेल तर त्यांना जागा वाटपाचा फॉर्म्युला मान्य झाला पाहिजे. एकंदरीत आ. आवताडे यांच्या राजकीय कारकिर्दीचा कस लागणारा हा काळ असणार आहे.

राजकीय हालचाली सुरू

ओबीसी आरक्षणाशिवाय नगरपालिका निवडणूक घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने नगरपालिका निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे. त्यामुळे मंगळवेढा शहरातील राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. पालिका निवडणुकीत दामाजी कारखाना निवडणुकीप्रमाणे समविचारांचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. शहरापुरती राजकीय ओळख असलेल्या अजित जगताप यांनी समविचारी गटाची निर्मिती करण्यापासून ते आ. आवताडे विरोधात रान उठविले आहे. दामाजीच्या सत्ताबदलात जगताप यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे पालिकेची रंगीत तालीम समजून दामाजीत यशस्वी ठरल्याने पालिकेसाठी सत्ताधारी गटाचा आत्मविश्‍वास वाढला आहे. सत्तांतरानंतर नव्याने सरकारने नगराध्यक्ष पुन्हा जनतेतून निवडण्याचा निर्णय घेतला. गत निवडणुकीत आवताडे यांनी शिवसेनेतून नगरसेवक निवडून आणले होते. यंदा ते भाजपबरोबर आहेत. दामाजीप्रमाणे समविचारी त्यांना नगरपालिकेतही आव्हान देऊ शकतात.

Back to top button