ताडीविरुद्ध मोहिमेत 22 गुन्हे दाखल | पुढारी

ताडीविरुद्ध मोहिमेत 22 गुन्हे दाखल

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोलापूर जिल्ह्यात राबविलेल्या अवैध ताडी व हातभट्टी दारू विरोधात मोहिमेत एकूण 22 गुन्ह्यात 140 लिटर हातभट्टी दारू, 840 लिटर ताडी, एक मोटरसायकल, सहा लिटर देशी दारू व दोन लिटर विदेशी दारू असा एक लाख एक हजार आठशे पंचवीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाभरात अवैध ताडी विक्री करणार्‍या विरोधात धाड सत्र राबविले असून, सदर मोहिमेत अवैध ताडी विक्री करणार्‍या आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याखाली गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. दुय्यम निरीक्षक श्रीमती उषा मिसाळ यांनी सुनील नगर सोलापूर येथे मधुकर लिंगप्पा चिल्लापल्ली याला त्याच्या राहत्या घरी 30 लीटर ताडीसह अटक करून गुन्हा नोंदवला आहे, तसेच लिंगप्पा विठ्ठल जमादार जुना विडी घरकुल त्याच्या ताब्यातून 35 लिटर ताडी जप्त करण्यात आलेली आहे.

नांदणी येथील सीमा तपासणी नाका पथकाने दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे येथे यल्लाप्पा मरेप्पा तुर्भे याचे ताब्यातून 35 लिटर ताडी व सादेपूर गावातून देवराज रावसाहेब राठोड याच्या ताब्यातून 30 लिटर ताडी जप्त केली. कुंभारी येथील सिद्धनाथ भुताळी किळकिळे याच्या ताब्यातून मॅकडॉल नंबर वन व्हिस्कीच्या 180 मिली क्षमतेच्या सहा बाटल्या व इम्पेरियल ब्लू व्हिस्की च्या 180 मिली क्षमतेच्या सहा बाटल्या अशी विदेशी दारू जप्त केली. तसेच निरीक्षक माळशिरस संदीप कदम यांनी अकलूज येथील इराण्णा नरसय्या गुत्तेदार त्याच्या राहत्या घरातून 35 लिटर ताडी जप्त केली. करमाळा दुय्यम निरीक्षक शंकर पाटील यांनी माढा तालुक्यातील शुक्रवार पेठ येथे सर्जेराव लक्ष्मण कांबळे यांच्या ताब्यातून देशी दारू ढोकी संत्रा 180 मिली क्षमतेच्या 24 बाटल्या जप्त केल्या तसेच कुर्डूवाडी येथील टिळक चौक येथून विजय नारायण शिंदे यांच्या ताब्यातून 60 लिटर ताडी जप्त केली.

दुय्यम निरीक्षक सांगोला यांनी सांगोला तालुक्यातील कमलापूर गावात बाळासो गोविंद भजनावळे याच्या ताब्यातून 85 लिटर ताडी जप्त केली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सोलापूर शहरातील थोरली इरण्णा वस्ती येथून शांतप्पा वीरप्पा पदपल्लीवार याच्या ताब्यातून वीस लिटर ताडी जप्त केली तसेच विजापूर नाका येथील बहादूर सुभाष जाधव हा इसम मोटरसायकल वरून दोन रबरी ट्यूब मध्ये 140 लिटर हातभट्टी दारू वाहतूक करत असताना आढळून आल्याने त्याला अटक केली असून त्याचे विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

निरीक्षक ब विभाग सदानंद मस्कर यांनी त्यांच्या पथकासह उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा गावात बाळू कुंडलिक कोळेकर याच्या ताब्यातून 35 लिटर ताडी तसेच रानमसले गावात हॉटेल कॉर्नर पॉईंट येथे गणपत चंदू काळे याच्या ताब्यातून 25 लिटर ताडी जप्त केली तसेच त्यांनी बार्शी तालुक्यातील हॉटेल अभिजीत येथे बालाजी सर्जेराव मांजरे हा इसम देशी दारूची विक्री करताना आढळून आल्याने त्याच्या ताब्यातून 90 मिली क्षमतेच्या 25 बाटल्या जप्त केल्या.

30 जुलै रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षक फडतर, मस्करे व भरारी पथकाने संयुक्तपणे सिताराम तांड्याच्या पूर्वेस बक्षी हिप्परगाप येथे हातभट्टी सुरू असल्याचे आढळून आल्याने त्या ठिकाणाहून 900 लिटर रसायन जपृत करून जागीच नाश केले, सदर गुन्ह्यातील आरोपी हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे. निरीक्षक माळशिरस संदीप कदम यांनी 30 जुलै रोजी माळशिरस तालुक्यातील तांबवे गावात मलय्या बसय्या तेलंग याच्या ताब्यातून 50 लिटर ताडी जप्त केली.

मोडनिंब, येवती, पापरी, टेंभुर्णीत कारवाई

निरीक्षक पंढरपूर यांनी 29 जुलै रोजी माढा तालुक्यातील मोडनिंब गावात अयण्णा हनमय्या गुत्तेदार याच्या ताब्यातून 39 लिटर ताडी, शुक्रवार पेठ येथील शंकर यल्लाप्पा नलगोपीलवार याच्या ताब्यातून 30 लिटर ताडी , मोहोळ तालुक्यातील येवती गावातील किरण जनार्दन तेलंग याच्या ताब्यातून 150 लिटर ताडी , पापरी गावातील राहुल वसंत तेलंग याच्या ताब्यातून 50 लिटर ताडी तसेच 30 जुलै रोजी टेंभुर्णी येथील साठे नगर परिसरातील अनिल भवानी पवार याच्या ताब्यातून 60 लिटर ताडी जप्त केली.

Back to top button