सोलापूर : परीक्षा विभागातील गोंधळ कुलगुरूंना मान्य | पुढारी

सोलापूर : परीक्षा विभागातील गोंधळ कुलगुरूंना मान्य

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील परीक्षा विभागात गोंधळ सुरू असल्याचे कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी मान्य केले. राज्यातील प्रत्येक विद्यापीठात परीक्षेचा गोंधळ असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या काही दिवसांपासून विद्यापीठाच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. या परीक्षेमध्ये कधी प्रश्‍नपत्रिका उशिराने येते, तर कधी पेपर असतो एका विषयाचा आणि प्रश्‍नपत्रिका येते दुसरीच. त्यामुळे एकीकडे विद्यापीठ प्रगतीकडे वाटचाल करीत असताना परीक्षा विभागाकडून मात्र गोंधळाची मालिका सुरूच आहे. यावर विद्यापीठाकडून ठोस उपाययोजना का केल्या जात नाही, असा प्रश्‍नही विद्यार्थ्यांकडून केला जात आहे. या गोंधळामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. त्यांचे अभ्यासातून लक्ष विचलित होत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आल्यानंतर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्‍नांना त्यांनी उत्तरे दिली.

प्रश्‍न ः परीक्षा विभागाचा गोंधळ कशामुळे सुरू आहे?

उत्तर ः काही तांत्रिक कारणांमुळे गोंधळ निर्माण झाला आहे. कारण वारंवार परीक्षेचे नियम बदलावे लागत असल्यामुळे तसे होत आहे.

प्रश्‍न ः गोंधळामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे

उत्तर ः या गोंधळाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिकवर होणार नाही याची आम्ही खबरदारी घेऊ आणि तशा सूचनादेखील दिल्या आहेत.

प्रश्‍न ः परीक्षा विभागाचा वारंवार गोंधळ सुरू आहे?

उत्तर ः राज्यातील प्रत्येक विद्यापीठात काही ना काही गोंधळ सुरू असतो. त्यामुळे विद्यापीठ म्हणते की, चुका होणारच आहेत. तरी या चुका आम्ही सुधारू हे मी प्रॉमीस करते.

गोंधळातही विद्यापीठाचा माध्यमांशी संवाद बंद

एकीकडे परीक्षा विभागाचा गोंधळ सुरू असताना विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्‍त केला जात आहे. अशा स्थितीमध्ये विद्यापीठाचा हा परीक्षेचा गोंधळ नेमके कोणत्या कारणामुळे सुरू आहे याबाबत माध्यमांनी कुलगुरू, परीक्षा विभागाचे नियंत्रक यांच्याशी संपर्क केला तरी माध्यमांशी संवाद साधणेच विद्यापीठाने बंद केले आहे. त्यामुळे सध्या विद्यापीठ हे माध्यमांशी मूक संवाद करीत असल्याबाबत माध्यमांनी नाराजी व्यक्‍त केली.

Back to top button