सोलापूर : मेल, एक्स्प्रेस रेल्वेगाड्या रद्द झाल्याने प्रवाशांचे हाल | पुढारी

सोलापूर : मेल, एक्स्प्रेस रेल्वेगाड्या रद्द झाल्याने प्रवाशांचे हाल

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा मध्य रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा फटका लांब पल्ल्याच्या प्रवाशांना बसला आहे. सोलापूर विभागाच्या दौंड, कुर्डूवाडी विभागादरम्यान 25 जुलैपासून तांत्रिक कामानिमित्त ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आला आहे. मात्र, या कामासाठी मुंबईसह सोलापूर तसेच अन्य काही विभागातील मेल, एक्स्प्रेस रेल्वे गाड्या रद्द कराव्या लागल्या आहेत. परिणामी, चार महिन्यांपूर्वी आरक्षण करूनही अचानक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप झाला आहे.

हा ब्लॉक 25 जुलैपासून सुरू झाला असून 9 ऑगस्ट 2022 पर्यंत सुरु राहणार आहे. 30 जुलै आणि 1 ऑगस्टची दादर-पंढरपूर एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. तर गदग एक्स्प्रेससह अन्य काही गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. एलटीटी-विशाखापट्टणम ही गाडी अन्य मार्गान वळवण्यात आली आहे. सुमारे 25 हून अधिक गाड्या रद्द करतानाच काहींचे मार्गही बदलण्यात आले आहेत.

Back to top button