सोलापूर : आरोग्य निरीक्षक, कर्मचार्‍यास मारहाणीच्या निषेधार्थ कृती समितीची निदर्शने | पुढारी

सोलापूर : आरोग्य निरीक्षक, कर्मचार्‍यास मारहाणीच्या निषेधार्थ कृती समितीची निदर्शने

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या आरोग्य निरीक्षक व कर्मचार्‍यास झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मनपा कामगार संघटना कृती समितीतर्फे आंदोलन करण्यात आले. आरोग्य निरीक्षक शेरखाने व कर्मचारी अरब हे कर्तव्यावर असताना त्यांना काही जणांकडून विनाकारण बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये शेरखाने यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. ही गंभीर बाब असून यामुळे कामगार व अधिकार्‍यांमध्ये यामुळे घबराट निर्माण झाली आहे. याप्रकरणी संबंधितांवर तत्काळ गुन्हा दाखल करावा व त्यांना अटक करावी, अशी मागणी यावेळी कामगार नेते अशोक जानराव यांनी केली.

मागण्यांचा विचार नाही झाल्यास दिनांक 9 ऑगस्ट रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. मारहाणीत जखमी झालेल्या कर्मचार्‍यांचा वैद्यकीय खर्च महापालिकेने करावा आणि त्यांना अपघाती रजा मंजूर करावी. महापालिकेतील सर्व कर्मचारी व अधिकारी यांना कर्तव्य सूची प्रमाणेच काम द्यावे. गुगल कॅलेंडर वायटॅाग, डब्ल्यूएमएस हे बेकायदेशीर असून त्याची तात्काळ अंमलबजावणी बंद करावी. रोजंदारी आणि घंटागाडीवरील कामगारांना तत्काळ किमान वेतन अदा करावे. कामगार, कर्मचारी, अधिकारी यांना संपूर्ण संरक्षण द्यावे आदी मागण्याही यावेळी करण्यात आल्या.

याप्रसंगी जनार्दन शिंदे, प्रदीप जोशी, चांगदेव सोनवणे, अजय क्षीरसागर, मल्लिकार्जुन हुंजे, आरोग्य निरीक्षक संघटनेचे अध्यक्ष इंगळे, कार्याध्यक्ष शशिकांत शिरसाट, तेजस्विता कासार, जगन्नाथ बनसोडे, बाबासाहेब क्षीरसागर, बाली मंडेपू, शिवाजी कांबळे आदी उपस्थित होते.

Back to top button