सत्तांतरानंतर बार्शीला विकासासाठी झुकते माप | पुढारी

सत्तांतरानंतर बार्शीला विकासासाठी झुकते माप

बार्शी : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर राज्यात अनेक घटना, घडामोडी घडताना दिसत आहेत. यातच बार्शी तालुक्याच्या विकासावर याचा सकारात्मक परिणाम होत असून विकासाच्या बाबतीत बार्शी तालुक्याला झुकते माप मिळत आहे. महाराष्ट्रातील राजकीय पटलावर झालेला आमुलाग्र बदल, विद्यमान आमदार राजेंद्र राऊत यांनी जेमतेम एका महिन्याच्या आत शहराच्या विविध भागांतील रस्त्यांच्या क्राँक्रिटीकरणासाठी तब्बल 90 कोटी रुपयांच्या आसपास निधीला मंजुरी मिळविली.

आ. राऊत यांनी यापूर्वी केलेल्या पाठपुराव्याला सत्तांतरानंतर यशाची झालर लागत असल्याचे दिसत आहे. त्यांनी सत्तांतरानंतर अवघ्या काही दिवसातच मंजूर करुन आणलेल्या कोट्यवधींच्या विकास निधीवरुन या विकासाच्या सुखद बाबी दिसून येत आहेत. त्यांनी आणलेल्या विकास निधीवरुन त्यांनी आपले शासनदरबारी किती वजन आहे, हेच एकप्रकारे दाखवून दिले असल्याची चर्चा समर्थकांकडून होत आहे.

आ. राजेंद्र राऊत हे अपक्ष आमदार असले तरीही ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत. माजी मंत्री दिलीप सोपल यांचे समर्थक व नगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते नागेश अक्कलकोटे यांनी सोलापुरातील शिवसेनेच्या बैठकीत माजी मंत्री सोपल हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर असल्याबाबत दिलेले स्पष्टीकरण, आज-उद्या करतकरत गत अनेक महिन्यांपासून लांबणीवर पडत असलेला बारबोले पिता-पुत्राचा राष्ट्रवादी पक्ष प्रवेश, क्राँग्रेस पदाधिकार्‍यांच्या निवडी व यातच होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुका या घटनाक्रमांभोवतीच बार्शीतील राजकारण फिरत होते. बार्शीतील माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले गटाला राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाला अद्यापपर्यंत तरी मुहूर्त मिळालेला नाही. मात्र पक्षप्रवेश निश्चित मानला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर पक्षप्रवेश अजून किती दिवस पुढे जाणार, याची चर्चा होत आहे.

तालुक्यात विकासाचा सपाटा सुरूच

सत्तांतर झाल्यानंतर बार्शी तालुक्यामध्ये अनेक विकासकामांचा आ. राजेंद्र राऊत यांनी सपाटा सुरू केला आहे. नुकताच बार्शीतील विविध विकासकामांसाठी आ. राऊत यांनी 90 कोटींचा निधी मंजूर करून आणला आहे. फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून आ. राऊत यांच्याकडे पाहिले जात आहे.

Back to top button