सोलापूर : कृषी अधीक्षकांनी दिले नमुने तपासण्याचे आदेश | पुढारी

सोलापूर : कृषी अधीक्षकांनी दिले नमुने तपासण्याचे आदेश

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा शेतकर्‍यांच्या पिकांसाठी उपयुक्त असलेल्या विद्राव्य (पाण्यात विरघळणारी) खतांमध्ये भेसळ होत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. खत म्हणून शेतकर्‍यांना चक्क मिठाची विक्री केली जात आहे. याची गंभीर दखल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी घेतली आहे. त्यांनी विद्राव्य खतांचे नमुने तपासण्याचे आदेश अधिकार्‍यांना दिले आहेत. जिल्ह्यात मोहोळ व उत्तर सोलापूर तालुक्यात शेतकर्‍यांना विद्राव्य खत म्हणून मिठाची विक्री होत असल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या दोन्ही तालुक्यात गुन्हे दाखल झाले आहेत.

मात्र, हा प्रकार केवळ या दोन तालुक्यातच होत आहे की जिल्ह्यातील इतर तालुक्यातही याची लागण झाली आहे. याची खात्री करण्यासाठी व शेतकर्‍यांना विद्राव्य खताच्या भेसळीपासून मुक्त करण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्‍यांनी उपविभागीय अधिकार्‍यांना पत्र पाठवून विद्राव्य खताचे नमुने घेण्याचे आदेश दिले आहेत. विद्राव्य खताचे नमुने घेताना ते कोणत्या प्रकारे घ्यायचे याच्याही सूचना त्यांनी दिल्या आहेत. उद्यापर्यंत (शुक्रवार) हे नमुने घेऊन त्याचा अहवाल 30 जुलैपर्यंत पाठवून देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत.

आठ नमुने ठरले फेल

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी 40 नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्यापैकी नऊ नमुने पास झाले तर आठ नमुने फेल ठरले आहेत. अद्यापही 23 नमुन्यांचा अहवाल येणे बाकी आहे. यावरुन जिल्ह्यात खतांमध्ये भेसळ होत असल्याचे दिसून येते.

Back to top button