सोलापूर : मनपा कर्मचार्‍यांना ‘वायटॅग’मुळे भुर्दंड | पुढारी

सोलापूर : मनपा कर्मचार्‍यांना ‘वायटॅग’मुळे भुर्दंड

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा महापालिका कर्मचार्‍यांवर सध्या ‘वायटॅग’या माध्यमातून नियंत्रण ठेवत जात आहे. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे कर्मचारी नेमून दिलेल्या भागात ‘वायटॅग’वर दिसत नसल्याने अशांना दंड केला जात आहे. नाहक पगाराला कात्री लागत असल्याने हे कर्मचारी वैतागले आहेत. महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी कर्मचार्‍यांवर अंकुश ठेवण्यासाठी गत दोन वर्षांपासून ‘वायटॅग’ची पद्धत सुरू केली आहे. याअंतर्गत मिळकत कर, मंडई, आरोग्य, सफाई आदी विभागांचे कर्मचारी नेमून दिलेल्या भागात वेळेनुसार काम करीत आहेत की नाही याची माहिती ऑनलाईन कळते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या या पद्धतीमुळे कामचुकार, बेशिस्त कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले आहे. जे कर्मचारी कर्तव्यात कसूर करीत आहेत अशांना त्यांच्या वेतनाच्या पाच, दहा किंवा त्याहून अधिक टक्क्यांच्या रूपात दंड केला जात आहे. या शास्तीमुळे कर्मचार्‍यांवर वचक ठेवण्याचा प्रशासनाचा स्तुत्य प्रयत्न आहे.

‘वायटॅग’मुळे एकीकडे कामचुकार कर्मचार्‍यांवर अंकुश ठेवण्याचे काम सुरू असताना दुसरीकडे वायटॅगसंदर्भातील तांत्रिक अडचणींचा फटका कर्मचार्‍यांना बसत आहे. रेंज नसल्याने तसेच अन्य कारणांमुळे कर्मचारी नेमून दिलेल्या भागात काम करीत असूनही तसे ऑनलाईनवर दाखवत नसल्याची अडचण आहे. अशा कर्मचार्‍यांनादेखील दंड होत असल्याने ते वैतागले आहेत.

उद्दिष्ट पूर्ण न करणार्‍यांनाही दंड

‘वायटॅग’बरोबरच जे कर्मचारी त्यांना देण्यात आलेल्या महसुलाचे वसुली उद्दिष्ट पूर्ण करीत नाहीत तसेच त्यांच्याकडील प्रकरणांचा वेळेत निपटारा करीत नाहीत अशांनादेखील दंड केला जात आहे. या शास्तीची कर्मचार्‍यांनी धास्ती घेतली आहे. मिळकत कर बिल वाटपाचे दैनंदिन उद्दिष्ट पूर्ण न करणार्‍यांंदेखील या कारवाईला सामोरे जावे लागत आहे. आयुक्तांच्या या बडग्यामुळे कर्मचारी चांगलेच कामाला लागल्याचे दिसत आहे. एकंदर ‘वायटॅग’मुळे कर्मचार्‍यांवर करडी नजर ही बाब जरी समर्थनीय असली तरी दुसरीकडे तांत्रिक अडचणींचा नाहक फटका कर्मचार्‍यांना बसत आहे. या अडचणी दूर केल्यास वा त्या समजून घेऊन मार्ग काढल्यास कर्मचार्‍यांंना नाहक आर्थिक भुर्दंड बसणार नाही.

झोन कार्यालय दुसर्‍याच झोनच्या हद्दीत
विभागीय (झोन) कार्यालय क्र. 2 चे कार्यालय हे याच कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात असणे अपेक्षित आहे. मात्र हे कार्यालय झोन क्र. 3 च्या कार्यक्षेत्रात असल्याने येथील आरोग्य निरीक्षक तसेच अन्य कर्मचार्‍यांची ‘वायटॅग’संदर्भात तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रात हे कर्मचारी नसल्याचे ऑनलाईन दाखविले जात असल्याने अशा कर्मचार्‍यांना नाहक दंड आकारला जात आहे.

Back to top button