जिल्हाध्यक्षपदासाठी दोन सभापतींमध्ये रस्सीखेच | पुढारी

जिल्हाध्यक्षपदासाठी दोन सभापतींमध्ये रस्सीखेच

सोलापूर ः महेश पांढरे सोलापूर जिल्हा ग्रामीण भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी जिल्ह्यातून अनेक इच्छुकांनी आपापल्या गॉडफादरकडे मोर्चेबांधणी सुरू केली आहे, तर जिल्हा परिषदेच्या दोन माजी सभापतींमध्ये रस्सीखेच सुरू आहे. अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे यांनी पक्षश्रेष्ठींकडे शक्‍तिप्रदर्शन करण्याची तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे, समाजकल्याण समितीचे सभापती शिवाजी कांबळे यांनी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली तर ताकदीने काम करू, असा विश्‍वास व्यक्त केला आहे. त्यामुळे आता जिल्हाध्यक्षपदाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ग्रामीण भागात पक्ष तळागाळापर्यंत पोहोचविण्याची महत्त्वपूर्ण जाबाबदारी असलेल्या या जिल्हाध्यक्ष पदावर अनेकांनी दावा केला आहे. हे पद ग्रामीण भागात काम करणार्‍या आणि ग्रामीण भागाची संपूर्ण माहिती असणार्‍या कार्यकर्त्यालाच द्यावे, अशी भूमिका भाजपच्या नेत्यांनी घेतली आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या पदाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

भाजप हा शिस्तीचा आणि संघटनात्मक बांधणीचा पक्ष असल्याने या ध्येयधोरणात बसणाराच अध्यक्ष असावा, असेही भाजप श्रेष्ठींना वाटतेे. त्यामुळे सर्वसाधारण अटी आणि निकषांत बसणारे दोनच चेहरे सध्या पुढे येत आहेत. जिल्हा परिषद समाजकल्याण समितीचे माजी सभापती शिवाजी कांबळे आणि अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती विजयराज डोंगरे यांनी या जिल्हाध्यक्ष पदासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. या दोघांनाही जिल्ह्यातील राजकारणाचा चांगला अभ्यास असून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ही दोन्ही नावे सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावात वाड्यावस्त्यांवर पोहोचली आहेत. विजयराज डोंगरे हे मोहोळ तालुक्यातून, तर शिवाजी कांबळे हे माढा तालुक्यातून आहेत. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांतील राष्ट्रवादीला शह द्यायचा असेल तर भाजपला यापैकी एकाला जिल्हाध्यक्षपद देऊन ती संधी साधता येणार आहे.

दुसरीकडे, कांबळे आणि डोंगरे यांनी प्रदीर्घ काळ जिल्हा परिषदेत काम केले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाबरोबरच ग्रामीण राजकारणाची अचूक माहिती त्यांना आहे. त्यामुळे त्याचा फायदा येणार्‍या निवडणुकीत त्यांना होण्याची शक्यता आहे. माढा, करमाळा, माळशिरस, पंढरपूर या भागांत शिवाजी कांबळे यांच्या समर्थकांची संख्याही अधिक आहे, तर दुसरीकडे मोहोळ, पंढरपूर, सांगोला, दक्षिण आणि उत्तर सेालापूर तालुक्यात विजयराज डोंगरे यांना मानणारा मोठा गट आहे. त्यामुळे भाजपश्रेष्ठी आता जिल्हाध्यक्ष पदासाठी काय निकष लावणार आणि कोणाच्या गळ्यात जिल्हाध्यक्षपदाची माळ घालणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

विजयराज डोंगरे यांची बलस्थाने

विजयराज डोंगरे यांनीही जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समितीचे सभापती म्हणून सलग पाच वषेर्र् काम केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागाशी त्यांची नाळ जोडली गेेली आहे. मोहोळ तालुका पंचायत समितीचे सभापती म्हणूनही त्यांनी पाच वर्षे काम केले आहे. त्यामुळे ग्रामीण भागाच्या योजना आणि राजकारण यांचाही अभ्यास डोंगरे यांना चांगला आहे. गेल्या पाच वर्षांपासून त्यांचे भाजपमध्ये सक्रिय काम सुरू आहे.

शिवाजी कांबळे यांची बलस्थाने

शिवाजी कांबळे यांनी माढा तालुक्यातील विविध जिल्हा परिषद गटांतून चारवेळा निवडून येण्याचा विक्रम केला. जिल्हा परिषद समाजकल्याण समितीचे सलग पाच वर्षे सभापती म्हणून काम केले आहे. त्यांच्याकडे जनसंपर्क आणि भाषण कला उत्तम आहे. माढ्याचे आ. बबनदादा शिंदे यांना सलग चारवेळा विधानसभेवर निवडून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता.त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा त्यांना चांगला अभ्यास आहे.

Back to top button