सोलापूर : तिसर्‍या विकास आराखड्याचे काम प्रगतीपथावर | पुढारी

सोलापूर : तिसर्‍या विकास आराखड्याचे काम प्रगतीपथावर

सोलापूर : वेणुगोपाळ गाडी शहराच्या पुढील 20 वर्षांच्या विकासाचे नियोजन करण्याच्या अनुषंगाने महापालिकेकडून तिसर्‍या विकास आराखड्याबाबत सुरू असलेले काम प्रगतीपथावर आहे. यासंदर्भात जी. आय. (भौगोलिक माहिती) प्रणालीअंतर्गत ड्रोन सर्व्हेचे काम पूर्ण झाले असून ते पडताळणीसाठी भूमी अभिलेख विभागाकडे पाठविण्यात आले आहे. दर 20 वर्षांनी शहराचा विकास आराखडा तयार करण्याचा नियम आहे. सोलापूर शहराचा पहिला विकास आराखडा 1978 साली तयार करण्यात आला होता. तद्नंतर 20 वर्षांनी तयार केलेल्या दुसर्‍या आराखड्याला शासनाने 2004 मध्ये मंजुरी दिली.

याच्या 20 वर्षांचा कालावधी 2024 मध्ये संपणार आहे. या पार्श्वभूमीवर नवीन अर्थात तिसर्‍या आराखड्याच्या नियोजनाचे काम 3 वर्षे अगोदरपासून सुरू झाले आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना 1966 च्या कलम 154 अन्वये शासनाने दिलेल्या निर्देशानुसार हे काम होत आहे. विकास आराखड्याचे काम पूर्वी मॅन्युअली करण्यात येत असे. पण आता शासनाच्या नव्या धोरणानुसार जी.आय. प्रणालीद्वारे आराखड्याबाबत सर्व्हे करण्यात आले आहे.

सर्व्हेचा 1.42 कोटींचा मक्ता

जी.आय. प्रणालीअंतर्गत सर्व्हे करण्याचा1.42 कोटींचा मक्ता हैदराबादच्या रिमाट सेन्सिंग इन्स्ट्रूमेंट कंपनीला देण्यात आला आहे. या कंपनीने गत एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत जी.आय. प्रणालीअंतर्गत ड्रोनद्वारे सर्व्हे करण्याचे काम पूर्ण केले आहे. सर्व्हेचा अहवाल पडताळणीसाठी भूमी अभिलेख विभागाकडे पाठविण्यात आला आहे. जागेचा वापर नकाशा तयार करुन ते अंतिम करण्याकामी या कंपनीने मनपाला मदत करावयाची आहे.

लवकरच इरादा जाहीर करणार

शहराचे क्षेत्रफळ 178.56 चौरस किलोमीटर इतके आहे. सर्व्हेच्या पडताळणीचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. दरम्यान आराखड्याबाबत मनपाकडून हद्दीबाबत लवकरच इरादा जाहीर करण्यात येणार आहे. तद्नंतर नागरिकांच्या सूचना व हरकती मागवून त्यावर निर्णय घेण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.आराखड्याचे काम पूर्ण व्हायला दोन ते तीन वर्षांचा अवधी लागणार आहे. लोकसंख्या नियोजन मानांकनानुसार आराखडा तयार केल्यावर मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात सोपस्कार करण्यात येतील. एकंदर आगामी 20 वर्षांचा विचार करुन विकास आराखडा करण्याचे काम सुरू आहे. शासनाची मंजुरी मिळून त्याची अंमलबजावणी करेपर्यंत किती वर्षांचा कालावधी लागणार याविषयीदेखील उत्कंठा आहे.

आरक्षणाविषयी उत्सुकता

दुसर्‍या विकास आराखड्यात शहरातील 829 जागांवर विविध प्रकारचे आरक्षणे होती. तिसर्‍या आराखड्यात हे आरक्षण कमी जास्त होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे नेमके किती जागांवर आरक्षण राहील याविषयी उत्सुकता आहे.

Back to top button