संत दामाजी कारखान्यात सत्तांतर | पुढारी

संत दामाजी कारखान्यात सत्तांतर

मंगळवेढा : पुढारी वृत्तसेवा श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार समाधान आवताडे यांच्या आघाडीला हादरा देत समविचारी आघाडीने विजय मिळविला. स्वतः समाधान आवताडे यांना या निवडणुकीत पराभूत व्हावे लागले. मंगळवेढा तालुक्यातील विविध पक्षातील राजकीय नेत्यांनी तयार केलेल्या समविचारी आघाडीने मोठ्या फरकाने ही निवडणूक जिंकली आहे. सत्ताधारी गटास 21 पैकी एकाच जागेवर समाधान मानावे लागले, तर एक जागा अपक्ष निवडून आली आहे. श्री संत दामाजी कारखान्यासाठी अत्यंत चुरशीने झालेल्या या निवडणुकीत 24 हजार 521 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. गुरुवारी सकाळी 8 वा. मतमोजणीस प्रारंभ झाला.

चार फेर्‍यात झालेल्या मतमोजणीत प्रत्येक फेरीत सम विचाराचे उमेदवार आघाडीवर राहिले. विद्यमान अध्यक्ष आ.समाधान आवताडे, उपाध्यक्ष अंबादास कुलकर्णी यांच्यासह जवळपास दहा विद्यमान संचालकांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. विद्यमान संचालक अशोक केदार हे पुन्हा बिनविरोध निवडले गेले. तर संस्था मतदार संघातून सिद्धेश्वर अवताडे हे 145 मतांनी विजयी झाले. समविचारी आघाडीमध्ये परिचारक व भालके यांचे समर्थक असून मतमोजणीत तानाजी खरात सर्वाधिक मताने विजयी झाले. समविचारी आघाडी निर्माण करण्यात भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक, जिल्हा नियोजन सदस्य भगीरथ भालके यांनी सक्रियता दाखवली. यामुळे तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी कारखाना निवडणुकीत एकाच दिशेने आलेले पाहायला मिळाले. तर निवडणुकीतील मतदानाच्या तोंडावर बबनराव अवताडे यांनी आपले पुतणे आमदार समाधान आवताडे यांना पाठिंबा जाहीर केला. यामुळे तालुक्यातील राजकीय क्षेत्रातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या.

तानाजी खरात यांनी यापूर्वी कारखान्याच्या निवडणुकीत पराभव स्वीकारला होता तर चरणुकाका पाटील यांचे चिरंजीव राजेंद्र पाटील यांना संधी मिळाली. समविचारी आघाडीमधील बहुतांशी उमेदवारांनी पूर्वी तालुक्यातील विविध राजकीय पदांवर काम पाहिले आहे. यामध्ये पक्षाचे तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सभापती, सरपंच, उपसरपंच अशा पदांवर काम केलेल्या उमेदवारांमुळे तालुकाभर सर्व उमेदवार परिचित होते. याचा फायदा समविचारी आघाडीला झाला आहे.रात्री बारा वाजता चौथ्या फेरीचा निकाल जाहीर झाला. तोपर्यंत कर्मचारी आघाडीतील उमेदवारांचे समर्थक शहरातील दामाजी चौकामध्ये थांबले होते. मात्र निकाल दुपारी चार नंतर कल स्पष्ट झाल्यानंतर गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिशबाजी करत आपला आनंद उत्सव साजरा केला. मतमोजणी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उपभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील व पोलीस निरीक्षक रणजित माने, सपोनि बापूसाहेब पिंगळे, अमोल बामणे, उपनिरीक्षक सौरभ शेटे, सत्यजित आवटे यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

संस्था वाचवण्याच्या दृष्टीने दामाजीची निवडणूक सभासदांनी हातात घेतली. ऊस उत्पादक सभासदांचा ऊस वेळेत गाळप न करणे, कामगारांचा पगार न देणे या सर्वच बाजूंनी सत्ताधार्‍यावर रोष होता. तो रोष त्यांनी मतपेटीतून व्यक्त केला.
– शिवानंद पाटील,
समविचारी आघाडी प्रमुख

लोकशाहीत सभासद सार्वभौम असतात. सभासदांनी दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. यापुढील काळात कारखान्याच्या हितासाठी आमच्या परीने सर्वतोपरी मदत केली जाईल. विजयी उमेदवारांचे अभिनंदन.
समाधान आवताडे
आमदार, पंढरपूर-मंगळवेढा, विधानसभा मतदार संघ

विजयी उमेदवार

मंगळवेढा ऊस उत्पादक गट – विजयी उमेदवार मुरलीधर सखाराम दत्तू 12671, गौरीशंकर बुरकुल 12515 , गोपाळ भगरे 12376, ब्रह्मपुरी ऊस उत्पादक गट – दयानंद सोनगे 12287, राजेंद्र चरणू पाटील 12988,भारत बेदरे 12559, मरवडे ऊस उत्पादक गट- शिवानंद पाटील 13215, रेवणसिद्ध लिगाडे 12454, औदुंबर वाडदेकर 12465, भोसे ऊस उत्पादक गट- भीवा डोलतोडे 12929 ,बसवराज पाटील 12842 , गौडाप्पा बिराजदार 12453, आंधळगाव ऊस उत्पादक गट – प्रकाश भिवाजी पाटील 13025, दिगंबर भाकरे 12726, महादेव लुगडे 12342, महिला राखीव- निर्मला काकडे 13107, लता कोळेकर 12787 मागासवर्गीय मतदार संघ- तानाजी कांबळे 12961, भटक्या विमुक्त जाती मतदार संघ – तानाजी खरात 13506, संस्था व पणन मतदार संघ -सिद्धेश्वर आवताडे 149, इतर मागासवर्गीय प्रवर्ग- अशोक केदार (बिनविरोध).

Back to top button