शिवसेना एकसंघच राहील : आ. शहाजी पाटील | पुढारी

शिवसेना एकसंघच राहील : आ. शहाजी पाटील

इस्लामपूर ः पुढारी वृत्तसेवा शिवसेना फुटू नये, ती एकसंघ राहावी, ही आम्हा सर्वांचीच भावना आहे. मनोमीलनासाठी पक्षाचे वरिष्ठ नेतेही प्रयत्न करीत आहेत. यामध्ये यशही येईल, असा आशावाद शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजी पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी शिवसेना आमदारांना दिलेला निधी वाचून दाखविला. त्याचप्रमाणे त्यांनी स्वतः व अजित पवारांनी किती निधी नेला हे स्वतः जाहीर करावे, नाही तर ती यादी आम्ही जाहीर करू, असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले.
येथील शिवसेना कार्यालयाला सदिच्छा भेट दिल्यानंतर आ. शहाजी पाटील पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकार बनत असताना शिवसेनेच्या आमदारांना विचारातच घेण्यात आले नव्हते. त्याचवेळी या आघाडीला आमदारांचा विरोध होता. ज्यांच्याविरोधात निवडणुका लढवून निवडून आलो, त्यांच्याचबरोबर सत्तेत मांडीला मांडी लावून बसणे आमच्या तत्वात बसत नव्हते. प्रचारसभातून ज्यांच्यावर टीका केली ते राष्ट्रवादीचे नेते आम्हाला कसे सांभाळून घेणार होते? आ. पाटील म्हणाले, शिवसेना पक्षात फूट पडावी हे मुख्यमंत्री शिंदे व आम्हालाही मान्य नाही. मात्र आमचाही नाईलाज होता. 50 आमदारांनी दबाव आणल्यामुळेच एकनाथ शिंदेंना हा निर्णय घ्यावा लागला. अजूनही पक्ष एकसंघ रहावा, अशी आमच्या सर्व आमदारांची भावना आहे.

उद्धव ठाकरे व शिंदे यांच्यात मनोमिलन घडवून आणण्यासाठी आमचे वरिष्ठ नेतेही प्रयत्न करीत आहेत. यामध्ये आम्हाला काही अडचण येईल, असे वाटत नाही. शिवसेनेतील उठावाला अनेक पैलू आहेत, असे सांगून आमदार पाटील म्हणाले, महाविकास आघाडीतील इतर पक्ष स्वतःचा पक्ष वाढविण्यासाठी आपल्या परीने प्रयत्न करीत होते. शिवसेनेत मात्र असे काहीच घडत नव्हते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना पक्ष चार नंबरला गेला. त्यामुळेच आमदारांनी पक्ष वाचविण्यासाठी उठावाचा निर्णय घेतला. तालुकाध्यक्ष सागर मलगुंडे, माजी नगरसेवक प्रदीप लोहार, अंकुश माने, सतिश पाटील, सचिन कुचीवाले, योगेश हुबाले, कुंदन पाटील, प्रविण साळुंखे, दीपक माने यावेळी उपस्थित होते.

Back to top button