बार्शीत दुचाकी अडवून शेतकर्‍यास लुटले | पुढारी

बार्शीत दुचाकी अडवून शेतकर्‍यास लुटले

बार्शी : पुढारी वृत्तसेवा शेतातील भाजीपाला लिलावासाठी घेऊण जाणार्‍या शेतकर्‍याची दुचाकी बार्शीतील संतोषीमाता चौकात तिघांनी अडवली. तिघांनी शेतकर्‍याचा उपरण्याने गळा आवळून, चाकूने वार करून मारहाण करून रोख रक्कम व मोबाईल हॅण्डसेट असा 7 हजारांचा ऐवज लुटला. हा प्रकार बुधवारी पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास घडला.

दरम्यान पोलिस निरीक्षक रामदास शेळके, सपोनि ज्ञानेश्वर उदार, हवालदार रेवनाथ भोंग यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत शहरातुन पवन इटकर (वय 25, रा. शुभाषनगर) व अजय सुपेकर (वय 20, दुध डेअरी चौक, बार्शी) या दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. सुहारा रमेश शेळके (वय 32, रा. बेलगाव, ता. बार्शी) या शेतकर्‍याने याबाबत शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीत म्हटले आहे की नेहमीप्रमाणे शेतात लावलेली भेंडी बार्शी बाजार समितीत लिलावाकरीता घेऊन पहाटे तीनच्या सुमारास दुचाकीवरून एकटेच निघाले.

साधारणत पहाटे साडेतीनच्या सुमारास ते बार्शीतील जय संतोषीमाता चौकात आले असता तेथे 18 ते 30 वयोगटातील तीन अनोळखी इसमांनी रस्त्यात आडवे उभे राहून दुचाकी आडवली. एकाने ए थांब तु कुठला आहे, असे फिर्यादीला म्हणत गळ्यात असलेल्या उपरण्याने गळा आवळला व दुसर्‍याने ओरडू नको ओरडलास तर तुला खलास करेन, असे म्हणून त्याचे हातातील चाकू गळ्याला लावला, जीव वाचविण्यासाठी तेथुन चाकु लावलेल्या इसमाचे हातास हिसका मारला. त्यावेळी त्याने फिर्यादीच्या अंगावर चाकुने वार केला.

तिसर्‍या इसमाने पॅन्टचे खिशात हात घालून दोन हजार रोख रक्कम व शर्टाच्या डाव्या बाजूच्या वरच्या खिशात ठेवलेला मोबाईल काढून घेतला. शेळके तेथून पळत असताना चोरट्यानी लाकडी दांडके पाठीवर फेकून मारले. याबाबत शहर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार रेवनाथ भोंग हे करत आहेत.

Back to top button