ऊस बिलाचा प्रतिटन 250 प्रमाणे दुसरा हप्ता खात्यावर वर्ग : आ. बबनदादा शिंदे | पुढारी

ऊस बिलाचा प्रतिटन 250 प्रमाणे दुसरा हप्ता खात्यावर वर्ग : आ. बबनदादा शिंदे

टेंभुर्णी : पुढारी वृत्तसेवा विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने ऊस गाळप हंगाम 2021-22 मध्ये युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2येथे गाळप केलेल्या ऊसासाठी प्र.मे.टन रू.250 प्रमाणे दूसरा हप्ता ऊस पुरवठादार शेतक-यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याची माहीती कारखान्याचे संस्थापक चेअरमन आ. बबनराव शिंदे यांनी दिली. गळीत हंगाम सन 2021-22 मध्ये विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर येथे 24 लाख 78 हजार 922 मे.टन ऊसाचे गाळप करून 11.52 टक्के (बी.हेव्ही व सिरप सह) साखर उता-याने 23 लाख 45 हजार क्विंटल साखर उत्पादित केलेली आहे.

तसेच युनिट नं.2 करकंब येथे 6 लाख 55 हजार 564 मे.टन ऊसाचे गाळप करून 10.53 टक्के (बी.हेव्ही सह) साखर उता-याने 6 लाख 60 हजार 050 क्विंटल साखर उत्पादित केलेली आहे.दोन्ही युनिटचे मिळून 31 लाख 34 हजार मे.टनाचे देशामध्ये विक्रमी गाळप केलेले आहे. ऊस गाळप हंगाम 2021-22 साठी युनिट नं.1 व 2 कडे गाळप झालेल्या ऊसास यापुर्वी प्र.मे.टन रु.2100 प्रमाणे पहिला अ‍ॅडव्हान्स हप्ता अदा करण्यात आलेला आहे. सध्या ऊस पुरवठादार शेतकर्‍यांना ऊस पीक मशागत, जोपासणीसाठी पैशाची गरज आहे. त्यामुळे कारखान्याने येणार्‍या बैलपोळासणासाठी ऊस पुरवठादार शेतक-यांना उर्वरित देय ऊस बिलापैकी प्र.मे.टन रू250 प्रमाणे दुसरा हप्ता सर्व संबंधित ऊस पुरवठादार सभासद,बिगर सभासद शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आला आहे.

युनिट नं.1 व 2 कडे गाळप झालेल्या ऊसाचे दुसर्‍या हप्त्यापोटी कारखान्याने 78 कोटी 76 लाख 23 हजार रुपये बँकेत वर्ग केलेली आहे. उर्वरित तिसरा हप्त्यापोटी देय ऊस बीलाची रक्कम धोरणाप्रमाणे ऊस पुरवठादार शेतकर्‍यांना अदा करणार आहोत. तसेच कारखान्याने ऊस गळीत हंगाम 2021-22 चे संपूर्ण कमिशन डिपाँझीट रक्कम ऊस वाहतुकदारांना यापूर्वीच अदा केले असल्याचे आ. शिंदे यांनी सांगितले.

Back to top button