मोदी, शहा यांच्याकडे ईडी-सीबीआयच्या चाव्या : मल्लिकार्जुन खर्गे

मोदी, शहा यांच्याकडे ईडी-सीबीआयच्या चाव्या : मल्लिकार्जुन खर्गे
Published on
Updated on

धुळे, पुढारी वृत्तसेवा : भारतीय जनता पार्टीचे नेते वेगवेगळ्या राज्यात निवडून आलेले सरकार पाडण्याचे काम करत आहेत. त्यांच्याकडे ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाच्या चौकशीची चाव्या आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याकडे या चाव्या आहेत. नेत्यांच्या मागे चौकशा लावून ते सरकार पाडतात, पण आपल्या पक्षातून पळून गेलेले नेते देशाचे कधीच भले करणार नाहीत. त्यांना कोणतीच विचारसरणी आणि विचार नसताना ते देश आणि राज्याचे काय भले करणार, असा प्रश्न काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी धुळे येथे झालेल्या प्रचार सभेत उपस्थित केला. धुळे लोकसभेतील शिंदखेडा येथे महाविकास आघाडीची सभा पार पडली.

  • नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याकडे  ईडीची चावी
  • महाराष्ट्र ही समाजसुधारकांची भूमी आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खोटे बोलतात.

यावेळी बोलताना खर्गे यांनी भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. ही निवडणूक महत्त्वाची आहे. देशाचे भवितव्य ठरवणाऱ्या या निवडणुकीत प्रत्येकाने मतदान केले पाहिजे. देशातील संविधान आणि लोकशाही टिकवण्यासाठी प्रत्येकाने जागरूक राहिले पाहिजे. या देशात संविधान नसेल तर कुणीही सुरक्षित राहू शकत नाही. जनतेकडे मतदानाचा अधिकार आहे. या मतदानातून सत्ता मिळते म्हणूनच नेते तुमच्या दाराशी येतात. मतदानाच्या या महत्त्वाच्या माध्यमातून आपण लोकशाही टिकवण्यासाठी पुढे आले पाहिजे. महाराष्ट्र ही समाजसुधारकांची भूमी आहे. या समाजसुधारकांनी देशासह जगाला मार्गदर्शक ठरेल, असे कार्य केलेले आहेत. त्यांचे कार्य टिकवण्याची जबाबदारी आज प्रत्येकाची आहे. या समाज सुधारकांनी गुलामगिरी नष्ट करण्यासाठी बलिदान दिले. पुढील काळात गुलामगिरीत जायचे नसेल तर परिवर्तनाबरोबर जनतेला राहावे लागेल. भारतीय जनता पार्टीला मतदान केल्यास लोकशाही धोक्यात येऊन पुढील पिढी गुलामगिरीत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा टोला देखील त्यांनी लावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या पक्षाला 400 पार जागा मिळतील, असे सांगतात. मात्र ते एकट्याच्या बळावर असे सांगू शकत नाहीत. कारण कोणताही लोकप्रतिनिधी आणि पक्षाला यश देण्याचे अधिकार या देशातील मतदारांना आहेत. जनता ठरवेल तोच पक्ष विजयी होऊ शकतो. 400 पार जागा म्हणजे ही काही मोदीची गॅरंटी नव्हे, असा टोला देखील त्यांनी लावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटे बोलतात

विदेशातील काळा पैसा आणून जनतेला 15 लाख रुपये देणे, तसेच दोन करोड युवकांना नोकरी देणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न डबल करणे अशी आश्वासने मोदींनी दिली आहेत. यातील एकही आश्वासन त्यांनी पाळले नाही, अशी टीका देखील त्यांनी केली. या देशाच्या विकासात शेतकऱ्यांचा फार मोठा हातभार आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतीच्या मशागतीसाठी लागणाऱ्या फर्टीलायझरवर कर लावतात. तर शेती करण्यासाठी लागणाऱ्या यंत्रसामग्रीचे दर वाढवतात. दुसऱ्या बाजूला शेतीमालाला भाव देत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत येतो आहे. जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी अडचणीत आणण्याचे काम मोदी यांनी केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

तर तुम्हाला पंतप्रधान होताच आले नसते…

भारतीय जनता पार्टी कडून काँग्रेसने 70 वर्षात काय केले, असा आरोप केला जातो. आम्ही काहीच केले नसते तर तुम्हाला पंतप्रधान होताच आले नसते. आम्ही देश सुरक्षित ठेवला. पाकिस्तान तोडून बांगलादेशची निर्मिती केली, पण तुम्ही पहाड खोदून त्यातून उंदीर काढतात आणि त्याचा प्रचार करतात, असा टोला देखील त्यांनी लावला. भारतात भारतीय जनता पार्टी दडपशाही करते. आता सुमारे 800 नेत्यांच्या मागे वेगवेगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून चौकशी करून त्यांना जेलमध्ये टाकले जाते. शरण येणाऱ्यांना मात्र पायघड्या टाकल्या जातात. पण महाराष्ट्र हा शूरांचे राज्य आहे. त्यामुळे आपला स्वाभिमान गहाण टाकून भाजपा समोर शरणागती पत्करणे योग्य नाही, असे देखील त्यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news