इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : आपल्या भागाला विकास निधी देण्यासाठी मी कमी पडणार नाही. मात्र, तुम्हीही मतदान करायला गेल्यावर मशिनमध्येदेखील आमच्या उमेदवाराच्या समोरचं बटन दाबा कचा कचा कचा म्हणजे मलाही निधी द्यायला बरे वाटेल, नाही तर माझाही हात आखडता होईल, असा दमच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूरमधील डॉक्टर, व्यापारी, वकील संघटनेच्या सभेत दिला.
मंगळवारी शरद पवार यांनी इंदापुरात जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी थेट सकाळी इंदापूर गाठले. डॉक्टर, वकील, व्यापारी यांच्या भेटीगाठी घेतल्या.
डॉक्टरांना सल्ला
यावेळी ते म्हणाले, तुमच्याकडे अनेक रुग्ण येतात आणि रुग्ण हा डॉक्टरांशीच खरे बोलतो. त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर योग्य उपचार करता. हे करत असताना जरा आमचं विचारा. चाचपणी करा. कसं काय जर त्यांनी आमचं नाव सांगितलं तर चांगली वागणूक द्या आणि दुसरं नाव घेतलं की असं इंजेक्शन टोचा, असं म्हणताच एकच हशा पिकला.
…तर द्रौपदीचा विचार करावा लागेल!
इंदापुरात डॉक्टरांच्या बैठकीत डॉक्टरांनी सरकारी यंत्रणेमधील काही जाचक अटी कमी करण्याची मागणी केली. यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, काही ठिकाणी सोनोग्राफी सेंटरला त्रास दिला जात असेल; परंतु बीडच्या घटना आणि मागील काळात हजार मुलांच्या मागे 850 मुलींचा जन्म दर पाहता पुढे पुढे तर द्रौपदीचा विचार करावा लागेल की काय, असा प्रश्न पडतो, अशी मिश्कील टिपणी केली.