

भारतीय सौंदर्य आणि स्किन केअर रूटीनमध्ये हळदीला एक अनमोल स्थान आहे. आपली आई- आज्जी तर शतकानुशतके हळदीचा वापर चेहऱ्याला नैसर्गिक तेज आणि ग्लो देण्यासाठी करत आल्या आहेत. हळदीमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म चेहऱ्यावरील डाग, मुरुमे आणि डलनेस (निस्तेजपणा) दूर करून त्वचेला एक गोल्डन ग्लो देतात. दिवाळीसारख्या सणांदरम्यान तर चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्यासाठी हळदीचा फेस पॅक हा सर्वात उत्तम आणि सुरक्षित पर्याय मानला जातो.
पण, तुम्हाला माहित आहे का? जर हाच हळदीचा फेस पॅक तुम्ही चुकीच्या पद्धतीने चेहऱ्यावर लावला, तर फायद्याऐवजी तुमच्या त्वचेचं मोठं नुकसान होऊ शकतं. अनेकदा नकळतपणे आपण अशा काही चुका करतो, ज्यामुळे त्वचा पिवळी पडते, कोरडी होते किंवा त्वचेवर जळजळही होऊ शकते.
जर तुम्हालाही दिवाळीपूर्वी चेहऱ्यावर नॅचरल गोल्डन ग्लो हवा असेल, तर हळदीचा फेस पॅक (Haldi Face Pack) लावताना 'या' ७ गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी.
1. गरज नसताना जास्त वस्तू मिसळणे:
हळद खूप प्रभावी असते. पण काही लोक यात तेल, क्रीम किंवा इतर अनेक अनावश्यक गोष्टी मिसळतात. यामुळे त्वचेवर अनावश्यक जळजळ (Irritation) किंवा रिअॅक्शन होण्याची शक्यता वाढते. हळदीतील करक्युमिन नावाचा घटक खूप प्रभावी असतो. त्यामुळे सुरक्षित आणि प्रभावी कॉम्बिनेशन म्हणजे हळद फक्त दूध, गुलाबजल किंवा साध्या पाण्यासोबतच मिसळणे.
2. खूप जास्त वेळ पॅक चेहऱ्यावर ठेवणे:
काहींना वाटते की, फेस पॅक जास्त वेळ ठेवल्यास त्वचा जास्त चमकेल. पण हा गैरसमज आहे. हळदीचा फेस पॅक 20मिनिटांपेक्षा जास्त वेळ चेहऱ्यावर ठेवल्यास त्वचा पिवळी पडू शकते (Staining) आणि संवेदनशील त्वचेला हलकी जळजळही होऊ शकते. त्यामुळे, पहिल्यांदा लावताना 10-15मिनिटेच ठेवावा आणि नंतर हळूहळू वेळ वाढवावा.
3. चेहरा व्यवस्थित न धुणे:
पॅक काढताना चेहरा व्यवस्थित न धुतल्यास हळदीचे बारीक कण त्वचेच्या छिद्रांमध्ये (Pores) अडकून राहतात, ज्यामुळे छिद्रे बंद होऊ शकतात. नेहमी थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा आणि मऊ टॉवेलने हलकेच टिपून कोरडा करावा. कोपऱ्याच्या भागाकडे विशेष लक्ष द्या.
4. चेहऱ्यावर प्रमाणात पॅक लावणे:
जर तुम्ही चेहऱ्याच्या काही भागावर जास्त तर काही भागावर कमी पॅक लावला, तर त्या भागांवर त्याचा परिणामही कमी-जास्त दिसतो. त्यामुळे त्वचेवर एकसारखा ग्लो (Uniform Glow) दिसत नाही. नेहमी पॅक चेहऱ्यावर समान प्रमाणात लावावा.
5. मानेवर (Neck) पॅक न लावणे:
अनेक लोक फक्त चेहऱ्याला पॅक लावतात आणि मानेकडे दुर्लक्ष करतात. यामुळे चेहरा चमकीला आणि मान काळवंडलेली किंवा निस्तेज दिसते. हळदीचा फेस पॅक लावताना तो मानेपर्यंत (Neck) नक्की लावा, जेणेकरून चेहरा आणि मान यांच्या रंगात कोणताही फरक दिसणार नाही.
6. चुकीच्या बेसचा वापर करणे:
साधे पाणी, दूध किंवा गुलाबजल हे हळदीच्या फेस पॅकसाठी सर्वात उत्तम बेस (Base) आहेत. कारण हे हळदीचे नैसर्गिक गुणधर्म टिकवून ठेवतात. जास्त गोष्टी मिसळल्यास हळदीचा मूळ प्रभाव कमी होतो.
7. पॅक धुतल्यानंतर लगेच साबण वापरणे:
हळदीचा मास्क धुतल्यानंतर लगेच चेहऱ्यावर साबण (Soap) किंवा फेस वॉश (Face Wash) लावल्यास, त्वचेतील नैसर्गिक ओलावा (Natural Oils) निघून जातो. यामुळे त्वचा लगेच कोरडी (Dry) पडते आणि हळदीचे फायदेही लगेच कमी होतात. पॅक धुतल्यानंतर चेहरा फक्त टॉवेलने टिपून घ्या आणि लगेच हलके मॉइश्चरायझर (Moisturizer) लावा. पुढील 24 तास साबणाचा वापर टाळावा.
हळद ही तुमच्या त्वचेसाठी कोणत्याही नैसर्गिक ब्युटी थेरपीपेक्षा कमी नाही, फक्त तिचा वापर योग्य पद्धतीने करायला हवा. या 7 चुका टाळल्यास, तुम्ही तुमच्या त्वचेला आतून ग्लोइंग, स्वच्छ आणि निरोगी बनवू शकता.