

पुढारी वृत्तसेवा
थंडीच्या हंगामात अनेक लोक सकाळी उठताच थकवा जाणवते. काही लोकांना असं वाटतं की रात्री नीट झोप नाही झाली, त्यामुळे सकाळी शरीर सुस्त आणि थकलेले वाटतं. मात्र, हे फक्त थकवा नाही, तर शरीरात काही आरोग्यसंबंधी लपलेल्या कारणांमुळे असे होते, या लपलेल्या कारणांवर लक्ष दिल्यास थकवा कमी होऊ शकतो आणि शरीर अधिक तंदुरुस्त राहते.
थंडीच्या हंगामात लोक जास्त वेळ आंगणात किंवा घरात बसतात. यामुळे शरीराचे नैसर्गिक झोपेचे चक्र बिघडते. उशिरा झोपणे, सतत मोबाईल किंवा टीव्हीवर रात्री वेळ घालवणे, किंवा दिवसभर थंड वातावरणात कमी हालचाल केल्याने झोपेची गुणवत्ता कमी होते. नीट झोप न झाल्यामुळे सकाळी उठल्यावर शरीर थकलेले वाटते.
थंडीमध्ये लोक पाणी कमी पितात. शरीराला नैसर्गिकरित्या हायड्रेशनची गरज असते. पाणी कमी घेतल्यास शरीरात थकवा आणि सुस्ती जाणवते. सकाळी उठल्यावर लगेच एक ग्लास पाणी प्यायल्यास थकवा कमी होण्यास मदत होते.
हिवाळ्यात सूर्यप्रकाश कमी होतो, ज्यामुळे शरीरात व्हिटॅमिन डी कमी होऊ शकते. तसेच, लोखंड, मॅग्नेशियम आणि झिंक यांसारखी खनिजे शरीरात कमी झाल्यास ऊर्जा कमी होते आणि उठल्यावर शरीर सुस्त वाटते. या पोषक तत्त्वांची कमतरता थकवा, दुर्बलता आणि सतत झोपेची भावना निर्माण करू शकते.
थंड वातावरणात रक्ताभिसरण (Blood Circulation) कमी होते. त्यामुळे शरीरातील पेशींना योग्य प्रमाणात ऑक्सिजन आणि पोषक घटक मिळत नाहीत. यामुळे स्नायू सुस्त होतात आणि सकाळी उठल्यावर शरीर थकलेले वाटते. नियमित व्यायाम आणि हलके स्ट्रेचिंग केल्यास रक्ताभिसरण सुधारते आणि थकवा कमी होतो.
थंडीच्या हंगामात अनेक लोक घरात जास्त वेळ घालवतात. यामुळे मानसिक ताण, चिंता आणि उदासी निर्माण होऊ शकते. मानसिक तणावामुळे झोपेची गुणवत्ता खराब होते आणि शरीर सतत थकलेले वाटते. ध्यान, योगा किंवा शांत संगीत ऐकण्याने मानसिक तणाव कमी करून ऊर्जा वाढवता येते.
सकाळी उठताच पाणी प्यावे आणि हलकी व्यायाम किंवा स्ट्रेचिंग करावी.
थंडीतही सूर्यप्रकाश मिळवण्याचा प्रयत्न करावा, ज्यामुळे व्हिटॅमिन डी मिळेल.
संतुलित आहार घेणे आवश्यक आहे; ताजे फळे, भाज्या, प्रोटीन आणि आवश्यक खनिजांचा समावेश असावा.
झोपेची नियमित वेळ पाळावी; रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल किंवा टीव्हीपासून दूर राहावे.
मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यान, योग किंवा हलका संगीत ऐकणे फायदेशीर आहे.
सकाळी उठल्यावर थकवा जाणवणे ही सामान्य गोष्ट वाटू शकते, पण यावर दुर्लक्ष केल्यास शरीरातील इतर समस्या निर्माण होऊ शकतात. हिवाळ्यात थोडी काळजी घेऊन थकवा कमी करता येऊ शकतो आणि सकाळचे दिवस उर्जेने भरलेले करता येतात.