

कॉफी शौकिनांसाठी सकाळची सुरुवात गरमागरम कॉफीच्या कपाशिवाय अपूर्णच असते, तर कामाच्या वेळी तरतरी येण्यासाठी कॉफी हवीच. हॉट कॉफीमध्ये तुम्ही एस्प्रेसो, लाटे, कॅप्युचिनो असे अनेक प्रकार ट्राय केले असतील, पण कडाक्याच्या उन्हाळ्यात किंवा मूड फ्रेश करण्यासाठी थंडगार कोल्ड कॉफीची मजा काही औरच!
पण नेहमी तीच ती मिक्सरमधली कोल्ड कॉफी पिऊन कंटाळा आलाय का? कॅफेमध्ये मिळणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या कॉफी पाहून तुम्हालाही त्या घरी बनवण्याची इच्छा होते का? चला तर मग, आज जाणून घेऊया कॅफेमध्ये मिळणाऱ्या ५ वेगवेगळ्या प्रकारच्या कोल्ड कॉफी, ज्या तुम्ही सहज घरी बनवू शकता.
ही क्रीमी आणि दाटसर कॉफी अनेकांची आवडती आहे. बनवायला अगदी सोपी!
कशी बनवाल: एका कपात एक चमचा कॉफी पावडर आणि पाव कप गरम पाणी घालून चांगले एकत्र करा. आता मिक्सरच्या भांड्यात चवीनुसार साखर, चॉकलेटचे काही तुकडे, थंड दूध आणि भरपूर बर्फाचे तुकडे टाकून छान फिरवून घ्या. यात तयार केलेले कॉफीचे मिश्रण घालून पुन्हा एकदा मिक्सर चालवा. एका उंच ग्लासमध्ये तुमच्या आवडत्या आईस्क्रीमसोबत किंवा वरून थोडे चॉकलेट स्प्रिंकल करून सर्व्ह करा.
या कॉफीची चव अप्रतिम लागते, पण ती बनवण्यासाठी थोडा वेळ लागतो. सकाळी प्यायची असेल तर आदल्या रात्रीच तयारी करून ठेवा.
कशी बनवाल: कॉफीच्या बिया जाडसर दळून घ्या. एका काचेच्या बरणीत (मेसन जार) ही कॉफी पावडर आणि फिल्टर केलेले थंड पाणी एकत्र करा. ही बरणी किमान १२ तास तशीच भिजत ठेवा, यामुळे कॉफीचा सुगंध आणि चव पाण्यात पूर्णपणे उतरते. त्यानंतर, हे मिश्रण एका मलमलच्या कापडाने किंवा बारीक गाळणीने गाळून घ्या. आता एका ग्लासमध्ये बर्फ आणि तयार कॉफीचे मिश्रण घ्या, चवीनुसार दूध आणि साखर घालून थंडगार कोल्ड ब्रूचा आनंद घ्या.
लॉकडाऊनमध्ये प्रसिद्ध झालेली ही क्रीमी आणि स्टायलिश कॉफी बनवायला खूपच मजेशीर आहे.
कशी बनवाल: एका भांड्यात दोन चमचे कॉफी पावडर, चवीनुसार साखर आणि थोडे गरम पाणी घ्या. कॉफी पूर्णपणे क्रीमी आणि घट्ट होईपर्यंत, साधारण १० ते १५ मिनिटे चमच्याने किंवा हँड बिटरने सतत फेटत राहा. आता एका ग्लासमध्ये थंड दूध आणि बर्फाचे तुकडे घ्या. त्यावर तयार झालेला कॉफीचा क्रीमी फेस हळूवारपणे ठेवा. वरून कोको पावडर किंवा चॉकलेट सॉस घालून सर्व्ह करा.
ज्यांना स्ट्रॉंग पण थंडगार कॉफी आवडते, त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. यात दुधाचा वापर नसतो.
कशी बनवाल: एका ग्लासमध्ये दोन चमचे कॉफी पावडर आणि ३० मिली (साधारण २-३ चमचे) गरम पाणी घालून चांगले एकत्र करा. त्यात चवीनुसार ब्राऊन शुगर घालून विरघळवून घ्या. आता एका उंच ग्लासमध्ये भरपूर बर्फ आणि थंड पाणी घ्या. त्यावर तयार केलेले कॉफीचे मिश्रण ओता. तुमची आईस्ड अमेरिकानो तयार आहे!
ही एक वेगळ्या चवीची, गोड आणि क्रीमी कॉफी आहे. कंडेन्स्ड मिल्कमुळे याला एक खास चव येते.
कशी बनवाल: एका ग्लासमध्ये कॉफी पावडर आणि थोडे गरम पाणी घालून एकत्र करा. आता त्यात २ ते ३ चमचे 'कंडेन्स्ड मिल्क' घालून पुन्हा चांगले मिसळा. भरपूर बर्फाचे तुकडे टाका आणि ग्लासचा उरलेला भाग थंड दुधाने भरून घ्या. तुमची चविष्ट व्हिएतनामी आईस्ड कॉफी तयार आहे.