

पुढारी ऑनलाईन डेस्क : विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जूनला निवडणूक होत आहे. आज (दि.१३) अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी भाजप पुरस्कृत व माजी मंत्री सदाभाऊ खोत आणि राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी गर्जे यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. तर दहाव्या जागेसाठी भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेस उमेदवार भाई जगताप यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. भाजपचे ५, महाविकास आघाडीचे ६ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे ही (Legislative Council elections) निवडणूक चुरशी होण्याची शक्यता आहे.
(Legislative Council elections) राज्यसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषद निवडणुकीसाठी भाजप विरुद्ध महाविकास आघाडी आमने-सामने येणार आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे समजते.
विधान परिषदेच्या एकूण १० जगांसाठी महाविकास आघाडीचे प्रत्येकी २ तर भाजपचे ५ असे ११ उमेदवार रिंगणात आहेत. आता या निवडणुकीत भाजपकडून माघार घेतली जाणार का ? मविेआचे नेते फडणवीस यांची भेट घेणार का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
भाजपने आपल्या सहाव्या उमेदवाराची घोषणा केली होती. सदाभाऊ खोत यांचा सहावे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. तर, राष्ट्रवादीकडून शिवाजी गर्जे यांनी डमी उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. परंतु, त्यांनी अनपेक्षितपणे आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
आता १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. राष्ट्रवादीकडून रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे हे रिंगणात आहेत. तर काँग्रेसकडून भाई जगताप, चंद्रकांत हंडोरे यांची उमेदवारी कायम आहे. भाजपकडून प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, राम शिंदे यांना उमेदवारी दिली आहे.
तर शिवसेनेने नंदुरबार जिल्ह्याच्या अक्कलकुवा तालुक्यातील आमशा पाडवी यांना उमेदवारी देऊन नंदुरबार जिल्ह्यातील शिवसैनिकांना सुखद धक्का दिला आहे.
हेही वाचलंत का ?