हिवाळ्याच्या दिवसांमध्ये हार्टअॅटॅक येण्याचे प्रमाण अधिक असते. काही विशिष्ट प्रकारचा आहार या काळात हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मदत करू शकतो असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. अशा पदार्थांची ही माहिती…
हळद ः हळदीत अनेक औषधी गुणधर्म असतात हे आपण जाणतोच. हळद ही एक नैसर्गिक 'ब्लड थिनर' म्हणजे रक्त पातळ करणारा पदार्थ आहे. हळदीत 'करक्युमिन' हा पोषक घटक असतो जो रक्ताला पातळ बनवतो. कर्करोग दूर ठेवण्यासाठीही हा घटक महत्त्वाचा ठरतो. हळदीच्या सेवनाने रक्ताच्या गुठळ्या होणे टाळले जाते. त्यामुळे रोज गरम दुधात हळद मिसळून पिणे लाभदायक ठरू शकते.
लसूण ः लसणातही रक्त पातळ करणारे पोषक घटक असतात. त्यामुळे हिवाळ्यात हार्ट अॅटॅक व स्ट्रोकपासून बचाव करण्यासाठी लसणाचे सेवन हितावह ठरते. लसणाच्या कच्च्या पाकळ्या खाल्ल्यास अधिक लाभ मिळतो.
आंबट फळे ः सर्व प्रकारची फळे व हिरव्या भाज्या या आरोग्यासाठी लाभदायक असतातच; पण हिवाळ्यात हार्टअॅटॅक टाळण्यासाठी विशेषत्वाने आंबट फळे अधिक लाभदायक ठरतात. त्यामध्ये द्राक्षे, मोसंबी, संत्री, बेरीज यासारख्या फळांचा समावेश होतो.
आले ः आल्यात अनेक औषधी गुणधर्म असतात. त्यामध्ये सेलिसिलेटस् आढळते जे रक्त पातळ करण्याचे कार्य करते. त्यामुळे हिवाळ्यात गंभीर आजारांपासून बचाव करण्यासाठी आल्याचे सेवन लाभदायक ठरते.
दालचिनी ः दालचिनीत 'कॉमरिन' नावाचा घटक असतो. हा घटक रक्त पातळ करण्यासाठी मदत करतो. दालचिनीच्या सेवनाने रक्त घट्ट होण्यापासून बचाव होतो. दालचिनीचा काढा बनवून त्याचे सेवन करणे लाभदायक ठरते.