सांगली ः पुढारी वृत्तसेवा : वसंतनगर येथे राहणार्या एका वृद्धाला हनीट्रॅप मध्ये अडकवून तरुणीशी व्हिडिओ कॉलिंगवर बोलायला भाग पाडून अपहरण केले. तसेच त्यांच्याकडून पाच लाख 20 हजारांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी फिर्यादीने संजयनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी तातडीने तपास करून खंडणी मागणार्या स्वप्निल तरसे, स्वप्निल पवार, लखन गोसावी यांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती पोलिसांनी सांगितले, फिर्यादी हे सेवानिवृत्त आहेत. त्यांची तरसे याच्याशी ओळख झाली. चार महिन्यांपूर्वी एका मुलीचा फिर्यादीच्या मोबाईलवर फोन आला. त्यावेळी तिच्याशी त्यांचे बोलणे झाले.
त्यांनतर परत दि. 1 नोव्हेंबर 2021 रोजी त्या मुलीने फिर्यादीशी व्हिडिओ कॉलिंगद्वारे संवाद साधला. त्याच दिवशी सायंकाळी परत त्या मुलीचा फोन आला. त्यावेळी एक पुरुष म्हणाला की, तुम्ही माझ्या मुलीसोबत व्हिडिओ कॉलिंग करून बोलता ते माझ्याकडे शुटींग आहे. तुम्हाला पोलिस स्टेशनला यावे लागेल.
फिर्यादीनी घडलेला सर्व प्रकार तरसे यांना सांगितला. "मी मिटवतो तुम्ही माझ्या सोबत चला", असे तरसे म्हणाल्याने ते एका येथील हॉटेलजवळ दोघे गेले. त्याठिकाणी एका कारमधून चार ते पाच मुले आली. या मुलांनी "आमच्या बहिणीबरोबर व्हिडिओ कॉलवर का बोलला, तिच्याशी आता कोण लग्न करणार, तिची बदनामी झाली आहे", असे म्हणून त्यांना "पाच लाख रुपये दे", असे म्हणून चाकूचा धाक दाखवून मारहाण केली. त्यावेळी फिर्यादी यांनी त्यांना 20 हजार रुपये दिले. (हनीट्रॅप)
त्यानंतर पुन्हा 12 जानेवारी 2022 रोजी फिर्यादीला यांना अडवून मोटारसायकल काढून घेतली. त्यानंतर त्यांचे अपहरण करीत माधवनगर कॉटनमील समोरील झुडूपात नेवून तरसेला त्यांनी फोन केला. तरसे त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी 20 लाखांची मागणी केली. फिर्यादी यांनी त्यांना पाच लाखांचा चेक दिला. या प्रकारानंतर त्यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली.