सेंद्रिय शेती काळाची गरज

सेंद्रिय शेती काळाची गरज
Published on
Updated on

आजच्या बदलत्या शेती पद्धतीमध्ये नवनवीन प्रयोग होत आहेत. अनेकदा संकरित बियाणे, रासायनिक कीडनाशके तसेच खतांची निर्मिती झाल्याने उत्पादन वाढविण्यासाठी खतांचा व कीडनाशकांचा अमर्याद वापर होत आहे. खतांचा व औषधांचा अमर्याद वापर झाल्यामुळे दिवसेंदिवस शेती नापिक बनत चाललेली आहे. यासाठी सेंद्रिय शेतीकडे वळण्याची गरज आहे. आधुनिकीकरण संकरित बियाण्यांचा वापर वाढलेला असून पारंपरिक बियाणे नष्ट होत चालली आहेत. संकरित वाणांची निर्मिती करीत असताना बर्‍याच रासायनिक संजीवकांचा वापर केला जातो. त्यामुळे उत्पादित होणार्‍या मालातून रसायनाचा अंश असतो. त्यातून मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होत चालला आहे. हे दुष्परिणाम टाळण्यासाठी सध्या सेंद्रीय शेतीचा पर्याय पुढे येत आहे. सध्या काळाची गरज आहे. विचार केला तर संयुक्‍त पुरोगामी राष्ट्र सेंद्रिय शेतीचा पर्याय पुढे आणत चाललेले आहेत.

भारत देश कृषीप्रधान देश आहे. भारतीय शेती ही भारतातील 80 टक्के लोकांच्या उपजीविकेचे प्रमुख साधन आहे. शेती व्यवसाय हा भारताचा आत्मा आहे, असे महात्मा गांधी यांनी सांगितले होते. सध्या शेती क्षेत्रातील वाढता भार, रासायनिक खतांचा अतिरेकी वापर, त्यातून मिळणारे उत्पादन कमी यामुळे शेतजमिनीचा कस कमी होत चालला आहे. त्यासाठी एकमेव पर्याय 'सेंद्रिय शेती' पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. भारत देशात ज्यावेळी अन्नधान्याची कमतरता भासू लागली त्यावेळी 1966 नंतर देशात 'हरितक्रांती' उदयास आली. त्यामुळे नवनवीन वाण, रासायनिक खतांचा वापर करून शेती उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ घडवून आणली. हरितक्रांतीच्या तंत्रज्ञानातून शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात रसायनांचा आणि आधुनिक शेती पद्धतीचा शिरकाव झाला. 1990-91 पासून शेतीतील अन्नधान्य उत्पादनातील स्थिरता आली.

सन 2000 नंतर शेतीतील उत्पादन खर्च जास्त, उत्पन्न कमी ही प्रचिती येऊ लागली. कितीही रासायनिक खतांचा व औषधांचा वापर करूनही उत्पन्नात वाढ होण्याऐवजी घट होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे शेतकर्‍यांनी जास्तीत जास्त रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर करुन उत्पादन घेण्यास सुरुवात केली. या रसायनांचा व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे मानवावर अनेक दुष्परिणाम होऊ लागले. मोठ्या प्रमाणात कॅन्सर, आतड्यांचे रोग, विविध अशा रोगांनी मनुष्यहानी होऊ लागली आहे. मनुष्यहानीबरोबर जमिनीची सुपिकता, जमिनीचा कस कमी होऊ लागला आहे. त्यामुळे सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे. स्थानिक संसाधनाचा वापर करणारी, कमी भांडवली खर्चाची मूलतत्त्वावर आधारलेली, सेंद्रिय पदार्थांच्या सुयोग्य वापराने जमिनीची उत्पादन क्षमता वाढवून ती टिकवून धरण्यावर भर देणारी, जैविक विविधता जोपासणारी, शेतकरी कुटुंबाच्या पोषणविषयक व इतर मूलभूत गरजा पूर्ण करणारी निसर्गपूरक स्वयंपूर्ण शेती पद्धती म्हणजेच 'सेेंद्रिय शेती' होय.

सेंद्रिय शेतीची उद्दिष्ट्ये

1) मातीची शाश्‍वत उत्पादकता व उत्पादनातील सातत्य टिकवणे.
2) नैसर्गिक व स्थानिक संसाधनांची जोपासना करणे व वापर करणे. उत्पादनावरील खर्च कमी करणे.
3) खर्चाची बचत आणि मूल्यवृद्धी.
4) शेताबाहेरील निविष्ठांचा (खतांचा + औषधांचा) कमीत कमी वापर.
5) मिश्र शेती पद्धतीतून जैविक विविधता टिकवून ठेवणे.
6) विषमुक्‍त अन्नाची शाश्‍वती, आर्थिक सुरक्षितता.
7) स्थानिक गरजांचे निवारण.
8) नैसर्गिक संतुलन आणि शुद्ध पाणी.
9) सामाजिक मूल्यांची जोपासना.
सेंद्रिय शेतीचे फायदे
1) जमिनीची नैसर्गिक व जैविक सुपिकता टिकून राहाते. पर्यावरणाचा समतोल राखला जातो.
2) शेती उत्पादनाची प्रत उंचावून साठवणूक क्षमतेत वाढ होते.
3) मित्र किडी, उपयुक्‍त जीवजंतू यांची वाढ भरपूर प्रमाणात होऊन हानिकारक किडींचा प्रादुर्भाव टाळला जाऊ शकतो.
4) जमिनीच्या धुपाचे प्रमाण कमी होते.
5) पशुधनाचा शेती मशागतीमध्ये भरपूर प्रमाणात उपयोग करता येतो.
6) सेंद्रीय शेती पद्धतीपासून मिळणार्‍या कृषी मालात किटक व बुरशीनाशकांच्या अवशेषांच्या विषाचे प्रमाण नसते.
7) जमिनीची पाणीधारण क्षमता वाढून जमीन सच्छिद्र होते.
8) प्रदूषण कमी होऊन पर्यावरणाचा समतोल राखला जातो.

भविष्यात जर आपली शेती टिकवायची असेल, तर सेंद्रिय शेतीकडे वळण्याची गरज आहे. सेंद्रिय शेती पद्धतीच्या माध्यमातून खत मात्रेत शेणखत, गांडूळ खत, हिवळीचे खत वापरणे गरजेचे आहे. या सेंद्रिय खतांमुळे जमिनीचा पोत टिकून राहतोच याशिवाय दिवसेंदिवस वाढणार्‍या खतांच्या किमतीवर मात करून शेतीवरील खर्च कमी करता येतो. कृषी विभागांच्या माध्यमातून 'महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी' योजनेतून गांडूळ प्रकल्प उभा करता येतो. शेतकर्‍यांकडे उपलब्ध असलेल्या अर्धवट कुजलेल्या खतांपासून चांगल्या पद्धतीने गांडूळ खत तयार करता येते.

गांडूळ खताच्या वापरामुळे –

1) जमिनीची सुपिकता वाढते. 2) जमीन भुसभुशीत होते, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. 3) जमिनीतील काडीकचर्‍याचे रुपांतर खतात होते. 4) जमीन सतत वाफसा स्थितीत राहू शकते. गांडुळ हे शेतकर्‍यांचे मित्र आहेत. शेतकर्‍यांनी गांडूळ खताचा वापर करणे गरजेचे आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news