सिंहायन आत्मचरित्र : ‘टोमॅटो एफ.एम.’सह ‘पुढारी’चे उपक्रम

सिंहायन आत्मचरित्र : ‘टोमॅटो एफ.एम.’सह ‘पुढारी’चे उपक्रम
सिंहायन आत्मचरित्र : ‘टोमॅटो एफ.एम.’सह ‘पुढारी’चे उपक्रम
Published on
Updated on

डॉ. प्रतापसिंह ऊर्फ बाळासाहेब ग. जाधव
मुख्य संपादक, दैनिक पुढारी

पाच नोव्हेंबर 2020 रोजी 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी पंचाहत्तर वर्षे पूर्ण केली. तसेच त्यांनी 'पुढारी'ची सूत्रे 1969 साली हाती घेतली. त्यांच्या पत्रकारितेलाही 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. 'पुढारी' हे विविध चळवळींचे प्रथमपासूनचे व्यासपीठ. साहजिकच, संयुक्त महाराष्ट्र लढ्यापासून अनेक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटनांचे ते साक्षीदार आहेत. केवळ साक्षीदार नव्हे, तर सीमाप्रश्नासह अनेक आंदोलनांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. पाऊण शतकाचा हा प्रवास; त्यात कितीतरी आव्हाने, नाट्यमय घडामोडी, संघर्षाचे प्रसंग! हे सारे त्यांनी शब्दबद्ध केले आहेत, ते या आत्मचरित्रात. या आत्मचरित्रातील काही निवडक प्रकरणे 'बहार'मध्ये क्रमशः प्रसिद्ध करण्यात येत आहेत. – संपादक, बहार पुरवणी

'जयातें कामधेनु माये। तयासी अप्राप्य काही आहे॥' 'ज्याची माताच कामधेनू आहे, त्याला अप्राप्य असं काहीच नसतं,' असं ज्ञानेश्वर म्हणतात. कामधेनू म्हणजे गाय. देव आणि असुरांनी केलेल्या समुद्र मंथनातून एकूण चौदा रत्नं निघाली. पैकी कामधेनू हे सहावं रत्न होय. कामधेनू आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करते, असं म्हणतात. परंतु, माझी कामधेनू वेगळीच आहे. नेहमीच सतर्क असलेलं माझं मन आणि मी ठामपणे घेतलेले निर्णय हेच माझ्या यशाचं गमक आहे. या दोन गोष्टी जर का तुमच्या ठायी असतील, तर कामधेनू स्वतःहूनच दुग्धामृताचा कुंभ घेऊन तुमच्या दारी उभी असते. माझे सद्सद्विवेकबुद्धीनं घेतलेले निर्णय, हे नेहमीच काळाच्या कसोटीवर खरे ठरत आलेले आहेत आणि 'पुढारी'ला नेहमीच प्रगतिपथावर नेऊन ठेवण्यास ते कारणीभूत ठरलेले आहेत, यात शंकाच नाही. तोच वसावारसा डॉ. योगेशही चालवत आहेत, हे सांगताना मला चौदा रत्नं सापडल्याचा आनंद होत आहे.

या जागतिकीकरणाच्या मंथनातून जन्माला आली ती आणखी दोन रत्नं. पंधरावं नि सोळावं रत्न. एकविसाव्या शतकानं मानवजातीला दिलेली ही सर्वात अनमोल भेट आहे. ती दोन रत्नं म्हणजे तंत्रज्ञान आणि संगणकीय क्रांती! त्याचप्रमाणं दळणवळणाच्या अत्याधुनिक साधनांनी मानवाला सुखसोयींनी इतकं समृद्ध करून टाकलं आहे की, जणू सारं जग आपल्या हाताच्या तर्जनीवरच येऊन बसलंय! खरं तर हे सारं जगच एक नवं जग आहे. जुनं ते मागं पडत गेलं आणि नव्या पिढीला नव्याचा ध्यासच लागला. त्याची प्रचिती आज आपण एकविसाव्या शतकात घेत आहोत आणि याच नव्या पिढीचे शिलेदार म्हणून डॉ. योगेश यांचा नव्या मनूच्या नव्या क्षितिजावर उदय झाला, असं म्हटलं तर ते मुळीच अतिशयोक्तीचं होणार नाही.

डॉ. योगेश यांची प्रसार माध्यमांच्या विविध क्षेत्रांत काम करण्याची मुळातच महत्त्वाकांक्षा. परंतु, ते केवळ महत्त्वाकांक्षा बाळगून थांबले नाहीत, तर त्यांनी त्या मार्गावरून आपली घोडदौड सुरू केली. योगेश यांचा विचार करताना किंवा त्यांची घोडदौड पाहत असताना, मला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल यांच्या एका विधानाची आठवण येते. मिशेल या प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ शिवाय लेखिका म्हणूनही प्रसिद्ध. त्यामुळे त्यांच्या विधानाला अधिक महत्त्व प्राप्त होते. त्या एके ठिकाणी म्हणाल्या होत्या, 'Becoming isn't about arriving somewhere or achieving a certain aim. I see it instead as forward motion, a means of evolving a way to reach continuously toward a better self. The journey doesn't end.'

'आपल्या ध्येयापर्यंत पोहोचणं किंवा ते साध्य करण्यात जीवनाची परिपूर्णता मुळीच नसते. तर मला असं वाटतं की, माणसाचं प्रत्येक पुढं पडणारं पाऊल, हे त्याला अधिक प्रगल्भ करण्याच्या दिशेनंच नेत असतं आणि हा कधीही न संपणारा प्रवास असतो.' योगेश यांच्याबाबतीत मिशेल यांचं हे विधान तंतोतंत लागू पडतं. माझ्या मार्गदर्शनाखाली त्यांचा हा जीवनप्रवास अखंडितपणे सुरू असून तो पुढेही असाच सुरू राहील, याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. योगेशकडे पाहताना कधी कधी मला असंही वाटतं की, पित्याच्या जीवनग्रंथाची पुत्र ही पुढची सुधारित आवृत्ती असते. कारण पित्याचं जगणं हे पुत्राचं घडणं असतं. ही जडणघडण अखंडपणे चालूच असते. पित्याला बदलत्या नव्या तांत्रिक जगात जेव्हा मर्यादा पडायला सुरुवात होते, तेव्हा पुत्र त्या पित्याचीच आधुनिक आवृत्ती बनून नव्या जगाला सामोरा जातो. डॉ. योगेशनी नेमकं हेच केलं. 2007 च्या दरम्यान लघुलहरी रेडिओ केंद्रांना परवाना देण्याचं धोरण केंद्र सरकारनं जाहीर केलं होतं. ही बाब योगेश यांनी माझ्या निदर्शनास आणली. त्यावर सांगोपांग चर्चा होऊन माझ्याकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर त्यांनी केंद्र सरकारकडे रीतसर परवान्यासाठी अर्ज केला. अर्थातच परवाना मिळाला. तोपर्यंत सर्व साधनसुविधा सिद्ध करून ठेवण्यात आल्याच होत्या.

मग 21 सप्टेंबर 2007 रोजी आम्ही '94.3 टोमॅटो एफ.एम.'ची स्थापना मोठ्या थाटामाटात केली. जे करायचं ते दणक्यात. या आमच्या परंपरेला अनुसरूनच 'टोमॅटो'चाही शुभारंभ झाला. ज्यांच्या सुरेल सुराशिवाय आकाशवाणीची सकाळ उजाडतच नाही आणि ज्यांची ध्वनिमुद्रिका काढल्याशिवाय एच.एम.व्ही.च्या वैभवाला चार चाँद लागत नाहीत, त्या भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या शुभस्वरांनी 'टोमॅटो एफ.एम.'चा धुमधडाक्यात प्रारंभ झाला. यावेळी स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर म्हणाल्या, "पुढारीच्या टोमॅटो एफ.एम.चा शुभारंभ करताना मला आनंद होत आहे. 'सोनिया सुगंधु' यावा असा हा अमृतमय प्रसंग आहे. कोल्हापूर आणि सांगलीशी माझा अंतरीच्या जिव्हाळ्याचा अनुबंध आहे. 'पुढारी' परिवार आणि मंगेशकर घराण्याचे अतूट नाते आहे. जगदंबेच्या वास्तव्याने पवित्र झालेल्या कलानगरीत माझ्या गायकीचा आरंभ झाला. माझ्या बहरलेल्या कल्पवृक्षाची पाळंमुळं या इथल्या संस्कृतील रुजली. या संस्कृतीच्या जीवनरसातून माझी साधना बहराला आली. कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांनी विविध ललितकलांचा संपन्न वारसा जपलेला आहे. या भूमीतील कलेचा परिमळ जगभर पसरलेला आहे. येथूनच आज हा टोमॅटो एफ.एम. सुरू होत आहे. रेडिओच्या माध्यमाशी माझं अतूट नातं आहे. या रेडिओनं माझा स्वर घरोघरी आणि कानोकानी पोहोचवलेला आहे. आता हे ध्वनीचं माध्यम घेऊन 'पुढारी' आपल्याला भेटत आहे. मुद्रित अक्षरांतून लोकांना भेटणार्‍या 'पुढारी'चं हे स्वरमयी भावंड तितकंच लोकप्रिय होईल, असा विश्वास मला वाटतो. या सुरेल माध्यमाचा वेलू गगनापर्यंत जावो, त्याच्या कळ्याफुलांचा सुगंध दशदिशांत दरवळो, ही सदिच्छा!"

'मोगरा फुलला… मोगरा फुलला…
फुले वेचिता बहरू कळियासी आला…
इवलेसे रोप लावियेले द्वारी
तयाचा वेलू गेला गगनावेरी
मोगरा फुलला… मोगरा फुलला…
मनाचिये गुंती गुंफियेला शेला
बाप रखुमादेवीवरू विठ्ठले अर्पिला…
मोगरा फुलला… मोगरा फुलला…'

70 कि.मी. त्रिज्येच्या क्षेत्रात 'टोमॅटो'ची व्याप्ती आहे. 'पुढारी' प्रथमपासूनच विविध उपक्रमांत अग्रेसर. मग 'टोमॅटो' तर 'पुढारी'चंच अपत्य. ते मागं कसं राहील? 'टोमॅटो'नंही 'पुढारी'चाच कित्ता गिरवला. या उपक्रमात लोकांचा थेट सहभाग असल्यामुळे 'टोमॅटो' अल्पावधीतच लोकप्रिय झाला. 'टोमॅटो'वरून अनेक श्रवणीय, तितकेच बोधप्रद आणि सामाजिक समस्यांना हात घालणारे कार्यक्रम सादर केले जातात. 'टोमॅटो'वर नुसतेच मनोरंजनाचे कार्यक्रम सादर केले जात नाहीत, तर योगेश यांच्या सूचना आणि मार्गदर्शनानुसार विविध सण किंवा दिनांच्या निमित्तानं अनेक सामाजिक उपक्रमही राबवले जात असतात. हुतात्मा दिन, क्रांती दिनानिमित्त विशेष कॅण्डल लाईट हा कार्यक्रम सादर केला जातो. तसेच जागतिक वसुंधरा दिनानिमित्त 'झाडे लावा, झाडे जगवा' हा खास उपक्रम 'टोमॅटो'नं राबवला. रोजच्या कार्यक्रमातूनही 'निसर्ग वाचवा, पाणी वाचवा, वीज वाचवा' यासारखे संदेश दिले जातात.

वाहतूक सुरक्षा सप्ताहात सुरक्षित वाहतूक करण्याच्या टिप्स दिल्या जातात. तसेच सीपीआर बचाव अशी एक मोहीमही 'टोमॅटो'नं हाती घेतली होती. महापुराच्या वेळी तर कोल्हापूर आणि सांगली परिसरातील सर्वच पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी, महत्त्वाचे संदेश पोहोचवण्यासाठी तसेच अडकलेल्या, हरवलेल्या व्यक्तींना सुखरूप स्थळी नेण्यासाठी एक विशेष मोहीम राबवली होती. त्याचा फायदा हजारो नागरिकांना आणि पूरग्रस्तांना योग्य वेळी मदत मिळाली. इतकेच नव्हे, तर गरजू व्यक्तींना रक्ताची गरज असल्यास त्यांना त्याचा पुरवठा करण्याचं कामही केलं तसेच दिव्यांगांनाही सुरक्षित स्थळी जाण्यास मदत केली. अर्थातच 'टोमॅटो' हे केवळ गाणी वाजवणारं रेडिओ स्टेशन नाही, तर ते एक सामाजिक जाण आणि भान असलेलं व्यासपीठही आहे. 'टोमॅटो'नं याबाबतीत 'पुढारी'च्याच पावलावर पाऊल टाकलेलं असून, त्यामागची प्रेरणा अर्थातच डॉ. योगेश प्रतापसिंह जाधव या द्रष्ट्या आणि विजिगीषू तरुणाची आहे, हे वेगळं सांगायलाच नको.

विशेष म्हणजे, 'टोमॅटो एफ.एम.'वरून आता न्यूज बुलेटिनही प्रसारित केलं जातं. त्यामुळे अगदी निवडणुकीच्या बातम्यांपासून, निकालापासून देशात-विदेशात घडणार्‍या खास घटनांचाही आढावा घेतला जातो. त्याचबरोबर स्थानिक बातम्यांना अधिक महत्त्व दिलं जातं. त्यामुळे 'टोमॅटो' आता समाचार पत्र प्रसारित करणारं वार्ताकेंद्रही बनलं आहे. मनोरंजनाबरोबरच ज्ञान आणि सामाजिक भान ठेवून असंख्य श्रोत्यांची करमणूक करण्याचा विडा 'टोमॅटो एफ.एम.'नं उचललेला आहे. 'पुढारी'च्याही विविध उपक्रमांत 'टोमॅटो एफ.एम.'चा महत्त्वाचा सहभाग असतो. मधल्या काळात मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून कोल्हापुरात एक विराट मोर्चा निघाला होता. त्यावेळी योगेश यांच्या मार्गदर्शनाखाली 'टोमॅटो एफ.एम.'वरून लोकांना वेळोवेळी सूचना देण्याचं महत्त्वाचं काम करण्यात आलं. तसेच मोर्चातील सर्व घडामोडींचं प्रत्यक्ष प्रसारणही करण्यात आलं. यावरून 'टोमॅटो'हे एक उत्कृष्ट मार्गदर्शकही आहे. दिशादर्शक आहे, असं म्हटलं तर ते मुळीच अतिशयोक्तीचं होणार नाही.

योगेश यांनी सुरू केलेल्या 'मॉर्निंग मंत्रा', 'नमस्कार मंडळी', 'राम राम पाव्हणं', 'खट्टी-मिठी', 'चल सटक यार', 'दिल से', 'सोना मना है', यांसारख्या कार्यक्रमांनी श्रोत्यांची मनं जिंकली आहेत, तर 'मी बाबुराव बोलतोय', 'ओकेच भावा', 'लाऊड स्पीकर', 'मसकल्ली', 'बोलबच्चन' हे कार्यक्रमही कमालीचे गाजले. तसेच 'टोमॅटो'वरून रक्तदात्यांसाठीही आवाहन केलं जातं. नेत्रदानाची माहितीही पुरवली जाते. त्यामुळेच सर्वसामान्यांचा ओढा 'टोमॅटो'कडे आहे. बदलणारे शैक्षणिक नियम, विविध सरकारी धोरणं, शेअर मार्केटची माहिती असे विविध जीवनोपयोगी उपक्रमही वेळोवेळी राबवले जातात. इतकेच नव्हे, तर श्रोत्यांच्या माहितीसाठी म्हणून जी.एस.टी.सारख्या महत्त्वाच्या विषयावर एक मालिकाच प्रक्षेपित करण्यात आली. त्याचं खास करून व्यापारी वर्गातून जोरदार स्वागत करण्यात आलं. तसेच 'मेड फॉर इच अदर' या मालिकेतून मान्यवरांचं दाम्पत्य जीवन उलगडून दाखवण्यात आलं. त्याशिवाय 'भक्ती-भजन' या वैशिष्ट्यपूर्ण अशा भक्तिरसपूर्ण कार्यक्रमातून ग्रामीण आणि दुर्गम भागातील मंडळांना संधी देण्यात आली.

शून्यातून विश्व निर्माण करणार्‍या कर्तबगार व्यक्तींवरील 'उडान' पुस्तक प्रकाशन, गरीब विद्यार्थ्यांना रजई, शाल, स्वेटर्स यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंचं वाटप, इको फ्रेंडली गणपतीच्या मूर्तींचं वाटप तसेच 'भजनसंध्या' यांसारखे विविध उपक्रम 'टोमॅटो'नं राबवले. त्याशिवाय विविध स्पर्धांचं आयोजनही वेळोवेळी करून 'टोमॅटो'नं आपलं नाव एफ.एम.च्या क्षेत्रात आघाडीवर ठेवलेलं आहे. 'टोमॅटो'चं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे इतर एफ.एम.च्या तुलनेत 'टोमॅटो'नं मराठी गाण्यांना जास्तीत जास्त प्राधान्य दिलेलं आहे. यातून 'टोमॅटो'चा मराठी बाणा दिसून आल्याशिवाय राहात नाही. त्यामुळेच 'टोमॅटो'ची लोकप्रियता आता सार्‍या पंचक्रोशीत आभाळाला भिडली आहे.

'पुढारी' हे आबांच्यापासूनच एक लोकविद्यापीठच बनून गेलेलं होतं. तीच परंपरा 'टोमॅटो'नंही पुढे नेली असून, 'टोमॅटो'आता एक लोकविद्यापीठ होण्याच्या मार्गावर आहे. 'टोमॅटो'वर कार्यक्रम सादर करणारे आमचे आर.जे.सुद्धा इतके लोकप्रिय झालेले आहेत की, त्यांना अधिक पगाराची लालूच दाखवून अन्यत्र घेऊन जाण्याचे प्रयत्नही होत असतात. मार्किंगच्या बाबतीतही 'टोमॅटो एफ.एम.' राज्यात पहिल्या क्रमांकावर असून, अर्थातच हे सर्व योगेश यांच्या कष्टाचंच फळ आहे. मी योगेश यांचं काम नेहमीच कौतुकानं न्याहाळीत असतो. तेव्हा त्यांच्याकडे असलेला एक महत्त्वाचा गुण माझ्या मनाला मनापासून भावला. जे जे चांगलं आहे, ते ते निवडा आणि ते श्रोत्यांसमोर ठेवा. त्यामध्ये कोणतीही खोट न राहता, श्रोत्यांना त्याचा आनंद घेता आला पाहिजे, याकडे त्यांचा कटाक्ष असतो. आपल्या कामावरची हीच निष्ठा डॉ. योगेश यांना दिवसेंदिवस प्रगतिपथावर घेऊन जात आहे, यात मुळीच शंका नाही.

जेव्हा जीवनाच्या प्रवासात पती घोडदौड करीत असतो, तेव्हा त्याची पत्नी तरी कशी बरं मागे राहील? ती तर त्याची अर्धांगी असते. सेकंड हाफ! पती जर दौडत असेल, तर आपण किमान चाललं तरी पाहिजे, या भूमिकेतून माझ्या सूनबाई डॉ. योगेश यांच्या सुविद्य पत्नी डॉ. स्मितादेवी यांनी 5 जुलै 2007 रोजी 'पुढारी कस्तुरी क्लब'ची स्थापना केली. हा 'कस्तुरी क्लब'ही वटवृक्षाप्रमाणे विस्तारत चालला आहे. 'पुढारी कस्तुरी क्लब'ची व्याप्ती आता कोल्हापूरबरोबरच सांगली, सातारा, कराड आणि पुणे इतक्या ठिकाणी वाढलेली आहे. 'कस्तुरी क्लब'चे सभासदच आता 25000 हून अधिक झालेले आहेत.

महिलांच्या हक्काचं व्यासपीठ म्हणून 'कस्तुरी क्लब'ची ओळख बनलेली आहे. 'कस्तुरी क्लब' म्हणजे मनोरंजनाचा खजिनाच. मनोरंजनासोबतच सभासदांना योगासनं आणि प्राणायाम यांचं शास्त्रोक्त शिक्षण देण्यात येतं. शिवाय शारीरिक सक्षमीकरणाबरोबरच स्वसंरक्षणाचंही ट्रेनिंग दिलं जातं. इथं स्त्रियांना आर्थिक सबलीकरणाची दीक्षा दिली जाते. तसेच त्यांचं मानसिक आरोग्य सुद़ृढ राहावं, याचीही दक्षता घेतली जाते. इतकेच नव्हे, तर महिलांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी 'कस्तुरी क्लब' मदत करीत असतो आणि क्लबतर्फे अनेक मनोरंजनात्मक कार्यक्रमांचं वर्षभर आयोजन केलं जातं.

तसेच पालकांचं त्यांच्या पाल्यांशी असलेलं नातं अधिक द़ृढ आणि निरोगी होण्यासाठी दरवर्षी समुपदेशनाच्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात येत असतं. त्यांच्या कुटुंबाचं आर्थिक नियोजन, सकस आहार नियोजन, तसेच नेतृत्वगुण विकास कार्यशाळा असे विविध उपक्रम सातत्यानं राबवले जातात. अशा उपक्रमांतूनच 'कस्तुरी क्लब' महिलावर्गात अतिशय लोकप्रिय झाला आहे. 'कस्तुरी क्लब' सभासद असणं, हा आता 'प्रेस्टिज पॉईंट'च झाला आहे.

डॉ. योगेश यांच्या एफ.एम.ची व्याप्तीही वाढू लागली आहे. योगेशना कोल्हापूरपुरतं मर्यादित राहायचं नव्हतं. याबाबतही ते दूरद़ृष्टीने पावलं टाकत आहेत. म्हणूनच कोल्हापूरपाठोपाठ सांगलीच्या सांस्कृतिक, सामाजिक, वैद्यकीय क्षेत्रांत माहिती आणि मनोरंजनामधील दै. 'पुढारी' ग्रुपचं एक यशस्वी पदार्पण म्हणजे '91.9 आपलं एफ.एम.!' 'टोमॅटो एफ.एम.' पाठोपाठ 2009 साली 'आपलं एफ.एम.'ची औपचारिक सुरुवात झाली. तेव्हापासून एकापेक्षा एक दर्जेदार कार्यक्रमांनी 'आपलं एफ.एम.'ने सांगलीकरांच्या मनावर अधिराज्य केलं आहे. सांगलीला नाट्यपंढरी म्हणून समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे.त्याचबरोबर सांगली आणि मिरज ही संपूर्ण भारतभर वैद्यकीय पंढरी म्हणून पूर्वापार प्रसिद्ध आहेत. सांगलीचं सहकार क्षेत्र असो वा राजकीय घडामोडी, क्रीडा क्षेत्र असो वा शेती क्षेत्रातील प्रगती. सर्वच क्षेत्रातील प्रगतीची माहिती 'आपलं एफ.एम.'नं श्रोत्यांपर्यंत तत्परतेनं पोहोचवलेली आहे.

'यात्रा एक्स्प्रेस'सारख्या कार्यक्रमातून गावोगावची देवस्थानं, त्यांचं महत्त्व तसेच त्यांचं माहात्म्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम 'आपलं एफ.एम.'नं केलेलं आहे. सांगलीतील नामांकित डॉक्टर्सना घेऊन साजरा केलेला डॉक्टर्स डे आजही श्रोत्यांच्या स्मरणात राहिलेला आहे. तसेच 'बोला बिनधास्त' या कार्यक्रमातून 'आपलं एफ.एम.'नं सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचंही काम केलं आहे. योगेश यांच्याच मार्गदर्शनाखाली दै.'पुढारी'नं 1999 मध्ये वेबसाईट सुरू करून डिजिटल विश्वात आपलं पहिलं पाऊल ठेवलं आणि बघता बघता 'पुढारी'च्या ई-पेपरला वाचकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. ई-पेपरला मिळणारी वाचकांची वाढती पसंती लक्षात घेऊन, 'पुढारी'नं त्याहीपुढे आणखी एक महत्त्वाचं पाऊल टाकलं. 'पुढारी'ची वेब आवृत्ती सुरू करण्याचा योगेशनी निर्णय घेतला. अर्थातच याबाबत डॉ. योगेश यांचाच पुढाकार होता, हे वेगळं सांगायला नकोच. नवीन तंत्रज्ञान वापरून 2015 पासून वेबपोर्टल आणि ई-पेपर नवं अंगडंटोपडं घालून ई-वाचकांच्या समोर आला.

'आकाशी झेप घे रे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा' जणू हा मंत्र ओठी घेऊनच डॉ. योगेश यांनी ही गगनभरारी घेतली, असं म्हटलं तर ते अतिशयोक्तीचं मुळीच होणार नाही. कारण अल्पावधीतच वाचकांनी 'पुढारी'च्या वेब आवृत्तीलाही भरभरून प्रतिसाद दिला. सुरुवातीला 'पुढारी'ची वेब आवृत्ती पाहून वाचकांनी काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या. त्या सूचनांचा आदर करून या आवृत्तीला आधुनिक स्वरूप देण्याचा निर्णय योगेशनी घेतला. त्यानुसार 'पुढारी'च्या वेब आवृत्तीमध्ये ले आऊटसह अनेक आधुनिक बदल करून 'वेब पुढारी' अपडेट करण्यात आला. 2015 पासूनच 'पुढारी' विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. या प्लॅटफॉर्मवरील 'पुढारी'चे फॉलोअर्स लाखांच्या घरात आहेत. 2017 मध्ये 'पुढारी'चे अँड्रॉईड आणि आयओएस अ‍ॅप लाँच करण्यात आले.

जुलै 2020 मध्ये वेब आवृत्तीमध्ये डिझाईन आणि तंत्रज्ञान अशा दोन्ही पातळ्यांवर मोठे बदल केले. वाचकांनी या बदलांचे मोठे स्वागत केले असून, वेब आवृत्तीच्या वाचकांत 10 पट वाढ झालेली आहे. काही बहुराष्ट्रीय कंपन्यांशी दै.'पुढारी'चा परस्पर सहकार्य करार असल्याने वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर 'पुढारी'च्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचतात. दै. 'पुढारी' डिजिटल व्हिडीओच्या माध्यामातून महिन्याला कोटीपेक्षा जास्त वाचकांपर्यंत पोहोचतो. यामध्ये तरुण आणि महिला दर्शकांची संख्या वेगाने वाढत आहे. टीव्ही आणि डिजिटल व्हिडीओ यात फरक आहे आणि डिजिटल व्हिडीओ वेगळ्या प्रकारे दाखवावे लागतील, हा विचार डॉ. योगेश यांनी केला होता. त्यातून मोबाईलवर फेसबुक, युट्यूब पाहणार्‍या दर्शकांना सोयीचे ठरतील अशा प्रकारे व्हिडीओंचे प्रेझेंटेशन ठेवण्यात आले. अगदीच नवा बदल म्हणजे इन्स्टा रिल्स आणि युट्यूब शॉर्टस् अशा प्रकारातही व्हिडीओ देण्यास 'पुढारी'ने सुरू केले आहे. सततचे बदल हाच डिजिटलचा प्राण आहे. हे बदल वेगाने आत्मसात करण्यात दै. 'पुढारी'च्या व्यवस्थापनाने दाखवलेल्या कुशलतेच्या मागे डॉ. योगेश यांचे व्हिजन कारणीभूत आहे.
डिजिटलमध्ये येत्या काही वर्षांत फार मोठे बदल घडतील. मेटाव्हर्स आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे मोठे स्थित्यंतर घडणार आहे. या बदलांना सामोरे जाण्याची तयारी दै. 'पुढारी' डॉ. योगेश प्रतापसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखाली आतापासूनच करत आहे.

काळाची गरज ओळखून 'पुढारी'नं आता आपलं स्वतःचं युट्यूब चॅनेलही सुरू केलेलं आहे. वेब आवृत्तीच्या बातम्यांबरोबरच युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून बातम्यांच्या व्हिडीओबरोबरच गडकोट किल्ल्यांचेही विशेष वृत्तांत 'पुढारी'नं देण्यास सुरुवात केली आहे. त्यालाही वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. 'पुढारी'च्या युट्यूब चॅनेलवर नित्यनियमानं बातम्यांचे उत्तमोत्तम व्हिडीओ पाहण्याची संधी 'पुढारी'च्या वाचक, प्रेक्षकांना मिळत आहे. सारांश, व्हिडीओ न्यूजच्या क्षेत्रातही 'पुढारी'नं मानाचं पान हस्तगत केलेलं आहे. किंबहुना तो मानाचा फेटा वाचकांनीच 'पुढारी'च्या शिरी बांधला आहे, यात शंकाच नाही.

इंटरनेटच्या या जमान्यात डिजिटल माध्यम म्हणून 'पुढारी'नं वेबसाईटच्या माध्यमातून जिल्हा, विभाग, राज्य आणि देशच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर इतिवृत्त देण्यात मानाचं स्थान मिळवलं आहे. 'पुढारी'च्या सर्वच आवृत्त्यांमधील महत्त्वाच्या बातम्या तसेच सतत घडणार्‍या घडामोडी 'रियल टाईम'मध्ये अपडेट माहितीसह 'पुढारी'च्या वेबसाईटवर देण्यात येतात. हाही योगेश यांच्याच कल्पनेतून साकारलेला उपक्रम. अल्पावधीतच लोकप्रिय झालेली 'पुढारी'ची वेबसाईट नियमितपणे निरनिराळे प्रयोग करीतच असते. युट्यूब लाईव्ह, फेसबुक लाईव्ह, न्यूज रूम, चर्चा यांची मेजवानी वेळोवेळी 'पुढारी'ची वेबसाईट वाचक-प्रेक्षकांना देत असते. निवडणुकीचं वृत्तांकन करताना नियमितपणे तज्ज्ञांचं विश्लेषणही व्हिडीओच्या माध्यमातून वाचक, प्रेक्षकांसाठी देण्यात येत असते. युट्यूब, फेसबुकच्या माध्यमातून हे व्हिडीओ प्रसारित करण्यात येतात. 'पुढारी'नं आता ऑडिओ बुलेटिन देण्यासही सुरुवात केली आहे. तसेच व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून वाचक-प्रेक्षकांपर्यंत हे बुलेटिन नियमितपणे सादर करण्यात येतं.

'पुढारी'च्या वेबसाईटला असणारा प्रतिसाद पाहता, यापुढेही काळाची पावलं ओळखून त्यानुसार 'पुढारी'च्या वेबसाईटमध्ये वेळोवेळी विविध बदल करण्याचा योगेश यांचा मनोदय आहे. वाचकाभिमुखतेला प्राधान्य देऊन जगाच्या पाठीवरील सर्वच मराठी वाचक-प्रेक्षकांना 'पुढारी'ची वेबसाईट पाहताना जणू ज्ञानेशांच्या शब्दांत, 'जो जे वांछिल, तो ते लाहो' असा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही.
डॉ. योगेश यांचा आणखी एक कौतुकास्पद उपक्रम म्हणजे 'प्रयोग सोशल फौंडेशन'ची स्थापना हा होय. अर्थातच ही संकल्पना शंभर टक्के त्यांच्याच डोक्यातून जन्माला आलेली. 'पुढारी'चे सर्वच सामाजिक उपक्रम या 'प्रयोग'मार्फतच राबवले जातात. 10 जानेवारी 2018 रोजी 'प्रयोग'ची स्थापना करण्यात आली असली, तरी अवघ्या दोन-तीन वर्षांच्या काळातच 'प्रयोग'नं डोंगराएवढं काम करून ठेवलेलं आहे.

समाजातील वंचित आणि उपेक्षित घटक गरीब आणि गरजू विद्यार्थी, तरुण वर्ग यांच्यासाठी प्रामुख्यानं 'प्रयोग'तर्फे विविध उपक्रम राबवण्यात येतात. अगदी सुरुवातीलाच 'प्रयोग'मार्फत महिला सबलीकरणाला प्राधान्य देऊन, विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यासाठी कोल्हापुरात ठिकठिकाणी शाळा आणि महाविद्यालयातून ताराराणी आत्मसंरक्षण प्रशिक्षण ही योजना राबविण्यात आली. सुमारे 3000 युवती आणि महिलांनी या प्रशिक्षणात भाग घेतला, हे विशेष. शिवाय आरोग्य, व्यक्तिमत्त्व विकास आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अशा विविध विषयांवर 'प्रयोग'तर्फे मार्गदर्शनपर सत्रं घेण्यात आली.

वर्षभरातच सुमारे 15 हजारांवर महिला, पुरुष आणि युवक-युवतींनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. इतकेच नव्हे, तर शाळांमधून सॅनिटरी पॅड डिस्पोझल मशिनसुद्धा देणगीदाखल देण्यात आली. तसेच विविध बालसंकुलांतून आरोग्य तपासणी शिबिरांचं आयोजन केलं गेलं. तसेच गणेशोत्सवाच्या काळात अ‍ॅनिमिया तपासणी शिबिरही घेण्यात आलं होतं. शिवाय सुमारे 1500 विद्यार्थ्यांना गणवेशासह शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं. इतकेच नव्हे, तर एच.आय.व्ही. बाधित अनाथ मुलांनाही दिवाळीचं औचित्य साधून त्यांना कपडे, खेळणी आणि शालोपयोगी वस्तूंचं वाटप करण्यात आलं. अंध मुलांचा ऑर्केस्ट्रा आयोजित करून त्यांना मदतीचा हात देण्यात आला.

शिवाय मतदार जागृतीचा एक अनोखा उपक्रम घेऊन मतदारांना त्यांच्या हक्क आणि कर्तव्याची जाणीव करून देण्याचं राष्ट्रीय कार्यही पार पाडण्यात आलं. कोल्हापुरातील वाहतूक व्यवस्था हा पारंपरिक डोकेदुखीचा विषय. ते लक्षात घेऊन, त्याबाबतीत जनजागृती करण्यासाठी 'वाहतुकीचे नियम आणि आपली जबाबदारी' या विषयावर एक मार्गदर्शनपर शिबिर आयोजित केलं. पर्यावरणपूरक सीडबॉलची कार्यशाळाही घेण्यात आली. कोल्हापुरात हा नवाच प्रयोग होता. लोप पावत चाललेल्या पारंपरिक खेळांची प्रात्यक्षिकं हा नव्या पिढीसाठी मोठा कुतूहलाचाच विषय ठरला होता. त्याचबरोबर बुद्धिबळासारख्या बुद्धीवर जोर द्यायला लावणार्‍या बैठ्या खेळाचीही कार्यशाळा घेण्यात आली, हे विशेष. वेळोवेळी पर्यावरण दिन, योगदिन यांसारख्या विविध विशेष दिवसांचेही उपक्रम साजरे केले गेले. 'प्रयोग'नं अशा विविध उपक्रमांतून आपली ओळख निर्माण केलेली आहे.

'टोमॅटो एफ.एम.', 'वेब आवृत्ती', 'प्रयोग फाऊंडेशन' आणि 'कस्तुरी क्लब' यांसारख्या विविध आणि वैशिष्ट्यपूर्ण माध्यमांतून 'पुढारी'चा सामाजिक परीघ अधिकाधिक व्यापक आणि विस्तृत झाला आहे, यात वादच नाही. आबांच्यापासून विचार केला, तर आमच्या तिसर्‍या पिढीनेही सामाजिक बांधिलकीचा वसा-वारसा जोपासला आहे, याचा मला अभिमान वाटतो. विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे 'पुढारी'नं वेब पोर्टलचं अँड्रॉईड अ‍ॅप 2017 मध्येच बाजारात आणून जणू आयफेल टॉवरवरच 'पुढारी'चा झेंडा फडकावला आणि आता लवकरच 'पुढारी'चं 'आयओएस' अ‍ॅपही लाँच होत आहे. अर्थातच ही सारी करामत डॉ. योगेश प्रतापसिंह जाधव नावाच्या बुद्धिमान माणसाचीच आहे, हे वेगळं सांगायलाच नको!

2018 मध्ये महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेच्या युती सरकारची चार वर्षे पूर्ण होत होती. त्यानिमित्तानं 'पुढारी'च्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममार्फत सरकारच्या कामकाजाविषयी पंचवीस हजारांहून अधिक लोकांना प्रत्यक्ष भेटून आणि प्रश्न विचारून त्यांची मतं जाणून घेतली होती. त्या कंटेंटचं पृथक्करण करून लोकांच्या मनातील सरकारच्या कामकाजाविषयी असणार्‍या भावना, स्टार माझाच्या माध्यमातून तमाम मराठी भाषिकांपर्यंत पोहोचवल्या. आतापर्यंतचा हा सर्वाधिक लोकांना भेटून केलेला सर्व्हे होता. त्याचं सर्वच स्तरातून कौतुक झालं. त्याचप्रमाणे 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं 'पुढारी'नं महाराष्ट्रातील 24 मतदार संघांत एक्झिट पोल घेतले होते. अतिशय तंत्रशुद्धद़ृष्ट्या केलेल्या या एक्झिट पोलचे निष्कर्ष जवळपास तंतोतंत सही निघाले. मतदारांचे लोकमानस जाणून घेण्याचा 'पुढारी'चा हा प्रयत्नही अत्यंत यशस्वी ठरला.

जॉन वुल्फगँग वॉन गोथे हे 18-19 व्या शतकातील अत्यंत प्रसिद्ध जर्मन व्यक्तिमत्त्व. त्यांच्या लेखणीने त्या काळात प्रचंड खळबळ उडवून दिली होती. ते एक शास्त्रज्ञही होते. या गोथेंचं एक प्रसिद्ध विधान आहे, The greatest thing in this world is not so much where we stand as in what direction we are moving?'' 'आपण कुठे उभे आहोत, हे महत्त्वाचं असलं तरी आपण पकडलेली दिशा ही अधिक महत्त्वाची असते.' म्हणूनच मला ठामपणे वाटतं की, योगेश यांनी पकडलेली दिशा अत्यंत योग्य आणि स्पृहणीय आहे. या मार्गावरची त्यांची वाटचाल तरुण पिढीसाठी दीपस्तंभासारखी दिशादर्शक ठरेल, यात मुळीच संदेह नाही. कारण त्यांच्या हृदयात गोरगरिबांविषयी एक प्रकारची सहृदयता आहे. रंजल्या गांजल्यांविषयी कणव आहे. एक संवेदनशील पिता म्हणून मी त्यांच्या वाटचालीवर मनापासून प्रसन्न आहे.

किंबहुना माझीच सावली म्हणून योगेश समाजात वावरत आहेत, असं मला वाटतं आणि सावली ही बहुधा प्रतिमेपेक्षा मोठीच पडत असते. कधी कधी तर मी त्यांची सावली असून, ते माझी प्रतिमा आहेत, अशीही मला शंका येते. पित्याच्या जिवंतपणीच, त्याचा होणारा पुनर्जन्म म्हणजेच त्याचा पुत्र होय. योगेशकडे पाहताना मला तसंच वाटतं. माझाच पुनर्जन्म जणू माझ्यासमोर उभा आहे, या कल्पनेनंच मी रोमांचित होतो. काही असो; पण योगेश ही माझी आधुनिक प्रतिकृती आहे, यात मुळीच संशय नाही!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news