स्पर्धा परीक्षा : सामाजिक बदलांचं सुचिन्ह

सामाजिक बदलांचं सुचिन्ह
सामाजिक बदलांचं सुचिन्ह
Published on
Updated on

स्पर्धा परीक्षांतून उत्तम यश मिळवून अनेक मराठी मुले-मुली देशभर आणि जगभरसुद्धा विविध प्रशासकीय सेवांमध्ये काम करून स्वतःचा उत्तम ठसा उमटवत आहेत. या परीक्षांमध्ये यश मिळवणारे तरुण केवळ महानगरांपुरते मर्यादित नाहीत. निमशहरी आणि ग्रामीण भागातील, आर्थिकद़ृष्ट्या दुर्बल कुटुंबातील तरुणदेखील लक्षणीय यश मिळवत आहेत, हे बदलाचं सुचिन्ह मानलं पाहिजे. त्याचप्रमाणे मुलींचं वाढतं यश हा पण एक आनंददायी सामाजिक बदल आहे.

देशाचा कारभार चालवणार्‍या ज्या अनेक घटनात्मक यंत्रणा आहेत, त्यातील एक विश्वासार्ह आणि शिस्तीनं कारभार करणारी यंत्रणा म्हणजे यूपीएससी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोग. या यूपीएससीचं घटनात्मक काम आहे, देशाचा कारभार चालवण्यासाठी उत्तम व्यक्तींची निवड करून ती यादी सरकारकडे सोपवणं. हे काम करण्यासाठी यूपीएससीकडून नागरी सेवा परीक्षा ही संकल्पना वर्षानुवर्षे राबवली जाते. ही परीक्षा देशातील सर्वात अवघड परीक्षा समजली जाते आणि ती असलीच पाहिजे. कारण शेवटी त्यातून देशाचा कारभार पाहणार्‍या अधिकार्‍यांची निवड करायची असते. नागरी सेवा परीक्षा 2022 ची प्रक्रिया पूर्ण करून यूपीएससीने नुकताच आपला निकाल जाहीर केला. यामध्ये एकूण 685 जणांची निवड यूपीएससीनं केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील सुमारे 60 ते 70 जण आहेत. म्हणजेच सबंध देशाच्या पातळीवरील या परीक्षेच्या निकालामध्ये महाराष्ट्राचे योगदान सुमारे 10 टक्के आहे.

एक वेळ अशी होती की, दरवर्षी महाराष्ट्रातून एखाददुसरा मुलगा यूपीएससीची परीक्षा पार करत असे. पण आता महाराष्ट्रासाठी हा काळ मागे पडला आहे. अलीकडील काळात महाराष्ट्राला यशाची सवय झाली आहे आणि उत्तम यश मिळवून अनेक मराठी मुले-मुली देशभर आणि जगभरसुद्धा आयएएस, आयएफएस, आयआरएस अशा सेवांमध्ये काम करून उत्तम ठसा उमटवत आहेत. यंदाच्या निकालांमध्ये असलेला 10 टक्के वाटाही निश्चितच आश्वासक आहे. परंतु काही जणांना असं वाटतंय की, यंदा महाराष्ट्राचा निकाल कमी लागला की काय? पण वस्तुस्थिती तशी नाही. यंदाच्या वर्षी देशातील निवडच थोड्या जागांसाठी आहे. त्यामुळे त्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राचे प्रमाण केवळ आकडा पाहून नेहमीपेक्षा कमी असल्याचे वाटते. टक्केवारीच्या भाषेत पाहिल्यास महाराष्ट्राचे योगदान सुमारे 10 टक्क्यांच्या आसपास आहे. ते आणखी वाढायला हवे याबाबत कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही. यासाठी येणार्‍या काळात महाराष्ट्राला अधिक प्रयत्न करावे लागतील.

महाराष्ट्राच्या या निकालामधून काही वेगवेगळी वैशिष्ट्ये व्यक्त होताहेत. आज या परीक्षांना बसणारे आणि त्यात यश मिळवणारे केवळ पुणे, मुंबई किंवा शहरी क्षेत्रापुरते मर्यादित नाहीत. आता निमशहरी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थीदेखील उत्तम अभ्यास करून देशपातळीवर यश मिळवताहेत. यामध्ये आर्थिकद़ृष्ट्या दुर्बल असणारेही काही विद्यार्थी आहेत. हे असलेल्या बदलांचं एक सुचिन्ह मानलं पाहिजे. आणखी एक सकारात्मक बदल म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये या परीक्षेला बसणार्‍या मुलींचं प्रमाण आणि त्याप्रमाणात त्यांना मिळणारं यशही वाढतं आहे. हाही एक आनंददायी सामाजिक बदल आहे. पूर्वीच्या तुलनेत यशस्वी विद्यार्थ्यांचं प्रमाण वाढत असलं तरी अभ्यासाची खोली-विस्तार हे पूर्वीप्रमाणेच कायम आहे, हेही लक्षात घ्यायला हवं. म्हणजेच काठिण्यपातळी कमी झाल्यामुळं यशाचा आलेख उंचावत आहे अशी स्थिती नाही.

अर्थात, हे म्हणताना मला सतत जाणवतं की, अजूनही देशाच्या पातळीवर तुलना केल्यास मराठी तरुण-तरुणींचं इंग्रजीवरचं प्रभुत्व वाढण्याची गरज आहे. मुख्य परीक्षेची उत्तरं बहुसंख्य मराठी मुलं इंग्रजीमध्ये लिहितात आणि पुढं जी मुलाखत असते तीही इंग्रजीमधून देतात; पण तिथे मराठी मुलं काहीशी कमी पडताना दिसतात. या मुद्द्यावर आणखी काम केल्यास महाराष्ट्राचं यश अधिक वाढलेलं दिसू शकेल.

निकालांमध्ये यशवानांच्या यादीत महाराष्ट्राचा आकडा किती आहे, हा तुलनेने कमी महत्त्वाचा मुद्दा आहे. महाराष्ट्रातून उत्तीर्ण झालेल्यांचे चारित्र्य, देशाप्रती असणारं त्यांचं समर्पण अधिक महत्त्वाचं आहे. म्हणजेच देशाची राज्यघटना ही भगवद्गीता आणि त्या राज्यघटनेनं सांगितलेली 'लोकांप्रती निष्ठा' हा आपला धर्म, असं मानून स्वच्छ आणि कार्यक्षम म्हणजेच कार्यकर्ता अधिकारी म्हणून कितीजण यश मिळवतात हे पाहणं सर्वात महत्त्वाचं आहे.

देशाच्या पातळीवर सुमारे 13 लाख जण या परीक्षेसाठी फॉर्म भरतात, तेव्हा त्यातून 685 जणांची निवड केली जाते. यावरून या परीक्षेतील स्पर्धात्मकता किती मोठी आहे, हे लक्षात येईल. त्यामुळं या क्षेत्रात पाऊल टाकताना याचा विचार करून मगच आलं पाहिजे. त्याला माझी नेहमी सूचना असते की, स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाबरोबरीनेच स्वतःचं व्यक्तिमत्त्व किमान एका पर्यायी करिअरसाठी तरी तयार ठेवायला हवं. थोडक्यात, 'आल्टरनेटिव्ह करिअर प्लॅन' किंवा 'प्लॅन बी' हा प्रत्येक विद्यार्थ्याकडे तयार असला पाहिजे. तो असेल तर प्रसंगी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळालं नाही, तर काही आकाश कोसळणार नाही. पण दुर्दैवानं मी काही वेळा पाहतो की, ऐन उमेदीच्या काळामध्ये काही मुलं-मुली आठ-आठ ते दहा-दहा वर्षं स्पर्धा परीक्षा एके स्पर्धा परीक्षा करत असतात. हा जीवनाचा किंवा करिअरचा प्लॅन योग्य नाही. कारण अशी आयुष्यातील उमेदीची दहा वर्षं खर्ची घालून हाती काही पडलं नाही, तर मग प्रचंड निराशा येते, खचून जायला होतं. या वर्षांमध्ये आपल्या बरोबरीचे कुठल्या कुठे निघून गेले, सेटल झाले, त्यांची लग्नं झाली आणि आपण अजून स्पर्धा परीक्षाच करतो आहोत, अशी एक भीषण भावना तयार होते. ती व्हायला नको असेल, तर आल्टरनेटिव्ह करिअर प्लॅन तयार करून त्यासाठीची तयारी करता करता स्पर्धा परीक्षेची तयारी करणे हा 'विन विन फॉर्म्युला' ठरतो.

अलीकडील काळात स्पर्धा परीक्षांचं मृगजळ, स्पर्धा परीक्षांचा भुलभुलय्या अशी एक हवा तयार होताना दिसत आहे. पण मी तिला निगेटिव्हिटी म्हणतो. कारण काही वर्षांपूर्वीचा कालखंड पाहिल्यास, स्पर्धा परीक्षांना बसणार्‍या मुला-मुलींचं प्रमाण नगण्य होतं. साहजिकच, निकालातील यशामध्येही मराठी टक्का अत्यल्प असायचा. अलीकडील काळात याबाबतची जाणीव मोठ्या प्रमाणावर वाढीस लागली आहे. स्पर्धा परीक्षा हे एक पिरॅमिड स्ट्रक्चर आहे. बेसिक, प्रीलियम, मेन्स, इंटरव्ह्यू, सिलेक्शन अशी याची रचना आहे. त्यामुळं त्यातील आव्हानं, जोखीम लक्षात घेऊनच स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात आलं पाहिजे.

उद्याच्या भविष्यात स्पर्धा परीक्षांमधील मराठी टक्का वाढण्यासाठी काय करायला हवं, याची बरीच चर्चा होत असते. विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये या परीक्षांसाठीच्या तयारीबाबत कुतूहल-संभ्रम असतो. याबाबतच्या सूत्राला मी म्हणतो, 'शुभश्च शीघ्रम..! अँड इट इज नेव्हर टू लेट.' थोडक्यात, जितक्या लवकर याची तयारी सुरू करता येईल तितके चांगले. अनेक पालकांशी असलेल्या संपर्कातून मला दिसून आलं आहे की, आपल्याला स्पर्धा परीक्षांमधून करिअर करायचं आहे, हे शाळेत असतानाच मुला-मुलींचं ठरलेलं आहे. त्यामुळं याबाबत असा कोणताही नियम नाही; परंतु ढोबळ मानाने सांगायचं झाल्यास, दहावीनंतर या परीक्षांची तयारी सुरू करावी. अर्थात, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यापूर्वी स्वत:ला ओळखण्याची गरज आहे. एकदा आपण स्वत:ला ओळखले की, त्यानंतर स्पर्धा परीक्षा देण्याचा विचार करा. परीक्षा देण्याचा विचार पक्का झाला की, अभ्यासाला सुरुवात करा. अभ्यासाच्या प्रक्रियेचा कंटाळा येऊ देऊ नका. अभ्यासाची प्रक्रिया एन्जॉय करा. अभ्यास करताना जिद्द, चिकाटी, मेहनत आणि सातत्य या गोष्टींची कास धरा. या गोष्टी व्यवस्थित केल्यानंतर तुमचे लक काम करते. या संपूर्ण प्रक्रियेनंतर मिळणारे यश हे तुमचेच असते. ज्ञानार्जनाची प्रक्रिया ही निरंतर सुरू असते. त्यामुळे यश मिळल्यानंतरदेखील ही प्रक्रिया सुरू ठेवा. परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या डोक्यात यशाची हवा जाता कामा नये. यशस्वी विद्यार्थ्यांनी प्रशासनात स्वच्छ आणि कार्यक्षम कारभार करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. समाजासाठी आपल्याकडून जे करणे शक्य आहे, त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्रशासनाला पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी सदैव प्रयत्न हवेत.

समारोप करताना अत्यंत आनंदानं मी यंदाचं एक उदाहरण सांगेन. यावर्षी निवड झालेल्यांमध्ये कर्नल अमोल आवटे या 42 वर्षांच्या आर्मी ऑफिसरचा समावेश आहे. लष्करामध्ये सेवा करत असताना तो जखमी झाला आणि दोन्ही पाय कायमस्वरूपी अधू झाले. त्यामुळं साहजिकच आर्मीची सेवा संपुष्टात आली. त्यानंतर त्यानं अभ्यास करून यावर्षी यूपीएससीमध्ये यश मिळवलं आहे. विशेष म्हणजे वयामुळे त्याच्यासाठी ही एकच आणि शेवटचीच संधी होती. परंतु अफाट जिद्द, परिश्रम यांच्या जोरावर त्यानं यश मिळवलं.
(शब्दांकन ः हेमचंद्र फडके)

अविनाश धर्माधिकारी,
माजी सनदी अधिकारी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news