भुईंज : पुढारी वृतसेवा : सातारा खून प्रकरण : व्याजवाडी (ता. वाई) येथील नराधम संशयिताने पत्नीचा अडीच वर्षांपूर्वी खून करून मृतदेह पुरला होता. तो बाहेर काढण्याचे शर्तीचे प्रयत्न पोलिसांनी केले. मृत महिलेचे काही अवयव सापडले असले तरी कवठी सापडली नाही. दुर्गम ठिकाण, दलदल व पाण्याचा प्रवाह यामुळे अवयव शोधताना पथकाची दमछाक झाली. प्रतिकूल परिस्थितीत शोध पथकाने राबवलेली ही मोहीम थांबवण्यात आली आहे.
सातारा खून प्रकरण मध्ये गेल्या दोन दिवसांपासून हादरवून सोडणार्या प्रेयसी व पत्नीच्या खून प्रकरणाच्या तपासाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. व्याजवाडी (ता. वाई) येथील संशयित आरोपी नितीन गोळे याला भुईंज पोलीस स्टेशनचे सपोनि आशिष कांबळे आणि गुन्हे प्रकटीकरण टीम यांच्या संयुक्त कारवाईत कर्नाटक राज्यातील बेळगाव येथे सिनेस्टाईल पाठलाग करून अटक केली. तदनंतर त्याने पत्नी मनिषा नितीन गोळे (वय 34, रा. व्याजवाडी) व प्रेयसी सौ. संध्या विजय शिंदे (वय 34, रा. कारी, ता. सातारा) यांचा खून केल्याची कबुली दिली.
पत्नी मनिषा हिचा अडीच वर्षापुर्वी गळा दाबून खून केल्याचे सांगून मृतदेह ज्या ठिकाणी पुरला ती जागा दाखवली. त्या जागेवर गेल्या दोन दिवसांपासून शोध मोहीम राबवली. महाबळेश्वर ट्रेकर्स व भुईज पोलिसांनी संयुक्तपणे ही मोहीम पार पाडली.
गुरूवारी दिवसभर उत्खनन करून मानवी हाडे व आवशेष ताब्यात घेण्यात आले होते. घटनास्थळी जिल्हा पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल़, अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील़,वाईच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.शितल जाणवे खराडे आदींसह भुईंज पोलीस स्टेशनचे सपोनि आशिष कांबळे व त्यांच्या सहकारी टीमने गुरूवारी रात्री उशीरापर्यंत शोध मोहिम राबवली होती.
शोध मोहिमेत घटनास्थळी मृत मनिषा गोळे हिची निळया गुलाबी रंगाची साडी स्वेटर व बांगडया आढळून आल्या परंतु खोल दरी, दलदल व त्यातच वाहणारा ओढा यामुळे उत्खनन करताना अनेक अडचणी येत होत्या. शुक्रवारी सकाळी भुईंज पोलीसांनी महाबळेश्वर ट्रेकर्स यांच्या मदतीने पुन्हा शोध मोहीम सुरू केली.
स्वतः सपोनि आशिष कांबळे आपल्या टीम सोबत उत्खनन करण्यासाठी खोल दरीत उतरले होते. पाण्याचा प्रवाह, दलदल असतानाही मानवी हाडे व अन्य साहित्य यांचा शोध सुरू होता.
दरम्यान फॉरेसिंक लॅब तज्ञ व वैद्यकिय पथकाच्या तपासणीनुसार सापडलेल्या अवशेषामध्ये डोक्याची कवटी नव्हती. ती शोधण्यासाठी भुईंज पोलीसांनी शुक्रवारी दिवसभर प्रयत्न केले. मात्र, कवठी शोधण्यात पथकाला यश आले नाही. त्यामुळे हे काम रात्री थांबवण्यात आले.
दरम्यान, शोध पथक व तपासात सहभागी झालेल्या अधिकारी कर्मचारी तसेच महाबळेश्वर ट्रेकर्सच्या गिर्यारोहकांच्यासाठी जागेवर अल्पोपहार, भोजन व पिण्याचे पाणी प्रत्येकाला पोहचवण्याची जबाबदारी भुईंज पोलीस स्टेशनचे हजेरी मेजर तुकाराम पवार, वाहन चालक हवालदार राजकुमार किर्दत यांनी पार पाडली.