लवंगी मिरची : मराठी माणूस

लवंगी मिरची : मराठी माणूस
Published on
Updated on

प्रथम त्याचे आणि आमचे खिडकीकडील जागेवरून भांडण झाले. प्रथम आम्ही इंग्रजीतून भांडलो, ते इतर प्रवाशांना कळेना म्हणून राष्ट्रभाषेतून म्हणजे हिंदीतून भांडलो आणि नंतर जेव्हा आम्हाला आम्ही दोघे मराठी आहोत हे समजले तेव्हा नाईलाजास्तव मराठीतून भांडलो.नंतर आमचा समेट झाला. अर्थात, बस सुरू झाल्यानंतर काही काळ शीतयुद्ध सुरू होते. थोड्या वेळाने आम्ही चांगले स्नेही झालो होतो. आम्ही ओळखले की, हाच तो आम्हाला हवा असलेला मराठी माणूस. आम्ही त्याला मुलाखत देण्याविषयी विनंती केली. असा झाला हा संवाद.

प्रकाश : आपली मुलाखत घेऊ इच्छितो.

विजय : जरूर, जरूर. फुकट पब्लिसिटी देताय तर मी सोडेन की काय? मुलाखत द्यायला आपण घाबरत नाही; पण तेवढे माझे नाव कुठेही देऊ नका म्हणजे झाले.

प्रकाश ः मराठी माणूस, मराठी माणूस म्हणजे नेमके काय आहे? आपल्या काय संकल्पना आहेत?

विजय : मराठी माणसाची मी एक व्याख्या केली आहे, ती अशी. मराठी संस्कृती आणि मराठी भाषा सोडून अनुक्रमे इतर संस्कृती आणि इतर भाषा यांच्याशी जवळीक साधणारा आणि या प्रयत्नामध्ये एका निराळ्याच मराठी संस्कृतीची निर्मिती करणारा महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेर राहणारा मराठी बोलणारा माणूस म्हणजे मराठी माणूस.

प्रकाश : आमच्या वाचकांसाठी ही व्याख्या जरा स्पष्ट कराल काय?

विजय : हा प्रश्न तुम्ही याचे मुद्देसूद तपशीलवार विवेचन होईल तर बरे, असा विचारावयास हवा होता. ते असो, ते महत्त्वाचे नाही. उत्तर महत्त्वाचे आहे. पहिला मुद्दा संस्कृतीचा. आम्ही आपली संस्कृती सोडून इतर संस्कृतीवर अधिक प्रेम करतो, होय करतो आणि निष्ठापूर्वक करत राहू. कारण, मराठी माणूस प्रत्येक गोष्ट निष्ठापूर्वकच करतो. आता ही उदाहरणे पाहा. गुजराती ढोकळा आम्हाला प्रिय, बिहारी पाणीपुरी आमचा वीक पॉईंट, राजस्थानी भैयाचे आइस्क्रीम पाहिले की, आमच्या तोंडाला पाणी सुटते, घरी आलेल्या पाहुण्यांसाठी आम्ही कानडी उपमा करतो, हॉटेलमध्ये गेलो तर पंजाबी डीशेस मागवतो किंवा मद्रासी इडली, वडासांबर चापतो. स्वीट डीशमध्ये बंगाली रसगुल्ला प्राधान्य, एवढेच नाहीतर भरपेट जेवण केल्यानंतर आम्हाला लागते ते पान बनारस किंवा कलकत्ता असते. मराठी माणूस दुसर्‍या संस्कृतीवर प्रेम करतो की नाही ?

प्रकाश : अहो, हे खाण्यापिण्याचे झाले. इतर क्षेत्रांचे काय ?

विजय : येतोय, तिकडेच येतोय. आमचा मराठी पालक मुलींना लहानपणापासून भरतनाट्यम्, कथ्थक, कुचीपुडी, मणिपुरी शिकवतो. मला सांगा, अस्सल मराठी लावणी नृत्य असताना मुलीला लावणी शिकायला पाठवणारा मराठी माणूस महाराष्ट्रात सापडेल का हो? आमच्या मराठी युवती पंजाबी ड्रेस वापरतात, उलट्या पदराची गुजराती साडी नेसतात. आम्ही पुरुष मंडळी तर साहेबाचीच नक्कल करतो.
प्रकाश : हा साहेब कोण ?

विजय : अहो साहेब, एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत सोडून गेलेला इंग्रज हा एकमेव साहेब. बाकी सारी त्याची भुतावळ.

प्रकाश : मराठी माणसाचा सुवर्णकाळ येऊन गेला की, अद्याप येणे बाकी आहे?

विजय : हे बघा 92-93 हे वर्ष सुवर्णकाळ होते. सर्व भारतात मराठी माणसाचा डंका वाजत होता. संरक्षणमंत्री मराठी, अंतर्गत संरक्षणमंत्री मराठी, सिनेक्षेत्रात दीक्षितांची माधुरी आपल्या पदन्यासाने तमाम भारतीयांच्या हृदयावर राज्य करत होती. नायकांमध्ये नाना पाटेकरला सर्वांनी डोक्यावर घेतले होते. क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये सचिनची तळपणारी बॅट मराठी पाणी सार्‍या जगाला पाजत होती. असा काळ पुन्हा होणे नाही, ही अशी मुलाखत पुढे रंगत गेली.

-झटका 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news