रंकाळा तलावाच्या संरक्षक भिंती मोजताहेत अखेरच्या घटका !

रंकाळा
रंकाळा

फुलेवाडी : शिवराज सावंत ऐतिहासिक रंकाळा तलावाच्या संरक्षक भिंतींना अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. काही ठिकाणी संरक्षक भिंती कोसळत आहेत. पदपथ ठिकाणाची भिंत दोन ठिकाणी काही दिवसांपूर्वी कोसळली आहे. संरक्षक भिंतीच अखेरच्या घटका मोजत असतानादेखील महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे रंकाळ्याकडे कोण लक्ष देणार, असा प्रश्न रंकाळाप्रेमींना पडला आहे.

मागील महिन्यात रंकाळा तलावाच्या संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळला होता.अजूनही अनेक ठिकाणी भीतीला मोठ्या प्रमाणात तडे गले आहेत. शहरातील नागरिक तसेच पर्यटक मोठ्या प्रमाणात रंकाळा तलावाला दररोज भेट देत असतात. मॉर्निंग वॉकला अनेक नागरिक रंकाळा परिसरात येत असतात. अनेक पर्यटक या संरक्षक भिंतीवर बसून तलावाचे सौंदर्य पाहत असतात.

परिसरातील तसेच बाहेरील अनेक नागरिक बागेत जंगली झाडे लावत असल्याने त्या झाडांच्या मुळांमुळे संरक्षक भिंतीला धोका निर्माण होत आहे. भिंतीला तडे गेल्यामुळे ती कधीही कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी कट्ट्यावर बसणेे धोकादायक बनले आहे. यापूर्वी रंकाळा संवर्धनासाठी लाखो रुपयांचा निधी मंजूर झाला होता. परंतु, तो कोठे खर्च झाला असेल, असा प्रश्न नागरिक व रंकाळाप्रेमींना पडला आहे. यापुढे तरी महापालिकेने रंकाळा तलावाची संरक्षक भिंतीची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news