गुजरात निवडणुक : बदलत्या समीकरणाने लढतींत रंगत

गुजरात निवडणुक : बदलत्या समीकरणाने लढतींत रंगत
Published on
Updated on

गुजरात विधानसभेच्या निवडणुकीला आता मोजकेच दिवस उरले आहेत. सत्तारुढ भाजप, विरोधी काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्यातील त्रिकोणी लढतींत कोणता पक्ष बाजी मारणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. बदलत्या समीकरणांमुळे यातील काही लढती अत्यंत उत्कंठावर्धक होतील असे चित्र दिसत आहे.

गोध्रा : गुजरातमधील गोध्रा शहराचे नाव देशवासीयांना तेथे 2002 साली झालेल्या रेल्वे जळीतकांडामुळे माहीत झाले होते. रेल्वे जळीतकांडानंतरच गुजरातमध्ये जातीय दंगली उसळल्या आणि त्यात असंख्य लोकांना प्राण गमवावे लागले होते. गोध्रा विधानसभा मतदारसंघात यावेळी तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. भाजपकडून विद्यमान आमदार सी. के. राऊलजी मैदानात असून, त्यांची लढत काँग्रेसच्या स्मिताबेन चौहान आणि आम आदमी पक्षाच्या राजेश पटेल यांच्याशी होत आहे. याशिवाय एमआयएमचे मुफ्ती कचाबा हे रिंगणात आहेत. दरवेळीप्रमाणे मुस्लिम मते काँग्रेसच्या बाजूने राहण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत आप आणि एमआयएमच्या पदरी निराशा येऊ शकते. गुजरात दंगलीची झळ बसलेल्या बिल्किस बानोच्या दोषींना संस्कारी असल्याचे सांगितल्यानंतर राऊलजी वादाच्या भोवर्‍यात सापडले होते. गेल्या वेळी राऊलजी यांचा केवळ 258 मतांनी विजय झाला होता. त्यामुळे यावेळीही ते विजय खेचून आणणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वलसाड : वलसाड हा राज्यातला महत्त्वपूर्ण मतदारसंघ आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत येथे भाजपच्या भरतभाई पटेल यांनी काँग्रेसच्या नंदकिशोर तांडेल यांचा 43 हजार मतांनी पराभव केला होता. आम आदमी पक्षाच्या रूपात पहिल्यांदाच येथे प्रस्थापितांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. आपकडून राजू मारचा मैदानात आहेत. राष्ट्रीय मुद्द्यांबरोबरच स्थानिक मुद्द्यांवर येथील निवडणूक केंद्रित झाली आहे.

लिंबायत : सुरत जिल्ह्यातील लिंबायत मतदारसंघात भाजपकडून संगीताबेन पाटील या निवडणूक लढवित आहेत. याठिकाणी त्यांचा मुकाबला काँग्रेसच्या गोपालभाई पाटील आणि आम आदमी पक्षाच्या पंकज तायडे यांच्याशी होत आहे. 2017 साली या मतदारसंघात 16 उमेदवार रिंगणात होते. त्यावेळी संगीताबेन पाटील यांनी काँग्रेसच्या राजेंद्र पाटील यांचा 32 हजार मतांनी पराभव केला होता. गुजरात भाजपचे अध्यक्ष सी. आर. पाटील यांच्या नवसारी कार्यक्षेत्रात हा मतदारसंघ येतो. त्यामुळे येथील लढत महत्त्वपूर्ण ठरली आहे. येथे मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय असून संगीताबेन पाटील यांनी हा भाग संवेदनशील म्हणून जाहीर केला जावा, अशी मागणी केली आहे.

नंदोद : सरदार वल्लभभाईपटेल यांचा सर्वात उंच पुतळा ज्या मतदारसंघात येतो, तो म्हणजे नंदोद. नर्मदा जिल्ह्यातील या मतदारसंघावर सध्या काँंग्रेसचे वर्चस्व आहे. आदिवासी लोकांची संख्या या मतदारसंघात लक्षणीय प्रमाणावर असल्याने अनुसूचित जमातींसाठी हा मतदारसंघ राखीव आहे. गतवेळचे आमदार हर्षद वसावा यांना तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी बंड केले होते. पक्षाने अलीकडेच त्यांची हकालपट्टी केली होती. मात्र, वसावा यांना काँग्रेसने तिकीट दिलेले आहे. त्यांची लढत भाजपच्या दर्शना देशमुख आणि आम आदमी पक्षाच्या प्रफुल्ल वसावा यांच्याशी होत आहे.

जेतपूर : जेतपूर शहर विधानसभा मतदारसंघात 9 उमेदवार रिंगणात आहेत. 2017 साली येथून भाजपच्या जयेशभाई रादडिया यांनी काँग्रेसच्या रविभाई आंबलिया यांचा पराभव केला होता. भाजपने यावेळी जयंतीभाई राठवा यांना, काँग्रेसने सुखराम राठवा, तर आम आदमी पक्षाने राधिका राठवा यांना संधी दिली आहे.

छोटा उदयपूर : मोहनसिंग राठवा यांचा दबदबा असलेल्या छोटा उदयपूर मतदारसंघात यावेळी लक्षवेधी लढत होणार आहे. अकरावेळा निवडणूक लढवून दहावेळा विजय मिळवल्याने आपण निवडणूक लढविणार नाही, असे राठवा यांनी काही महिन्यांपूर्वी सांगितले होते. अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात गतवेळी काँग्रेसकडून लढताना मोहनसिंग राठवा यांनी भाजपच्या जशुभाई राठवा यांचा पराभव केला होता. मोहनसिंग यांनी काँग्रेसला रामराम करीत भाजपमध्ये प्रवेश केल्याने या मतदारसंघात काँग्रेसची वाटचाल कठीण ठरली आहे. काँग्रेसने यावेळी संग्रामसिंग राठवा यांना संधी दिली आहे, तर भाजपकडून राजेंद्रसिंग राठवा हे निवडणुकीच्या मैदानात आहेत. राजेंद्रसिंग हे मोहनसिंग यांचे पुत्र आहेत. काँग्रेसकडून तिकीट नाकारण्यात आल्यानंतर मोहनसिंग व राजेंद्रसिंग यांनी भाजपची वाट धरली होती. आम आदमी पक्षाने या मतदारसंघात प्रा. अर्जुन राठवा यांना तिकीट दिले आहे.

– पार्थ ठक्कर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news