फोनवर उदयनराजे अन् दारात शिवेंद्रराजे

फोनवर उदयनराजे अन् दारात शिवेंद्रराजे
Published on
Updated on

सातारा : पुढारी वृत्तसेवा : स्थळ : पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांचे घर. वेळ दुपारी 3.15 वाजता. माजी शिक्षण सभापती सुनील काटकर यांनी खा. उदयनराजेंना फोन लावून दिला. त्याचक्षणी आ. शिवेंद्रराजेंनी पालकमंत्र्यांच्या घराचा उंबरा ओलांडला. फोनवर
उदयनराजे अन् दारात शिवेंद्रराजे, अशा परिस्थितीत काय करावे? असा यक्षप्रश्न ना. देसाई यांना पडला. पण चाणाक्ष देसाईंनी दारात आलेल्या पाहुण्याला मान देतात तसा शिवेंद्रराजेंना मान देत फोनवर असलेल्या उदयनराजेंचा फोन 'कट' केला.

नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खा. उदयनराजे भोसले आणि आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत असताना शुक्रवारी दोन्ही राजेंमध्ये 'किस्सा' झाला. पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या सातार्‍यातील 'कोयना दौलत' या निवासस्थानी झालेल्या या किस्स्याची सातार्‍यात खुमासदार चर्चा सुरू होती. त्याचे झाले असे की, सध्या सर्वत्र सहकारातील निवडणुकांचा माहोल सुरू आहे. लवकरच मजूर फेडरेशनची निवडणूक लागणार आहे.

याबाबत चर्चा करण्यासाठी खा. उदयनराजेंचे कट्टर समर्थक व माजी शिक्षण सभापती सुनील काटकर हे माजी पंचायत समिती सदस्य प्रवीण धस्के, बाळासाहेब ननावरे व लक्ष्मण कडव यांना घेऊन दुपारी 3 वाजता पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या सातार्‍यातील कोयना दौलत या निवासस्थानी गेले हेते. यावेळी ना. देसाई आणि काटकर यांच्यात चर्चा झाल्यानंतर काटकर यांनी खा. उदयनराजे यांना फोन लावून तो ना. देसाई यांच्याकडे दिला. उदयनराजे फोनवर असल्याने त्यांनी तो फोन कानाला लावला. मात्र, त्याचवेळी समोरून आ. शिवेंद्रराजे त्यांच्या निवासस्थानी आले.

फोनवर उदयनराजे अन् दारात शिवेंद्रराजे असल्याने ना. देसाई यांना काय करावे? हा प्रश्न पडला. पण शिवेंद्रराजे दारात आल्यामुळे त्यांनी उदयनराजेंचा फोन कट करून शिवेंद्रराजेंचे आदरातिथ्य केले. मात्र, या किस्स्यामुळे दोन्ही राजेंचे पालकमंत्र्यांकडे एकाचवेळी असे काय काम निघाले? असा सवाल यानिमित्ताने सातारकरांना पडला. यावर उदयनराजेंच्या समर्थकांनी मात्र, हा योगायोग समजावा, असे सांगून विषय संपवून टाकला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news