प्रश्न एकल मातांचा

प्रश्न एकल मातांचा
Published on
Updated on

आपली सामाजिक, आर्थिक आणि राजकीय व्यवस्थाच अशी तयार झाली आहे की, ज्यामध्ये एकल मातांकडे नेहमीच संशयातूनच पाहिले जाते. या मातांनी आपले संपूर्ण आयुष्य, ऊर्जा, वेळ हा आपल्या मुलांचा सांभाळ करण्यातच व्यतीत करावा, असे समाजाला वाटत असते. मे महिन्याचा दुसरा रविवार हा जगातील आयांसाठी उत्सवापेक्षा कमी नसतो. नुकताच हा 'मदर्स डे' जगभरात साजरा झाला; पण आई प्रेमाला आलेले हे भरते एकल मातांबाबत दिसून येत नाही.

एकल मातांवरून असणारी समाजमान्यता ही वास्तवात एक देखावा म्हणूनच आहे. कारण, महानगरापासून ग्रामीण भागापर्यंत असणार्‍या एकल मातांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यांना भाड्याने घर दिले जात नाही आणि दिले तर प्रश्नांची सरबत्ती केली जाते. या अडचणी पाहता महाराष्ट्रात पहिल्या सिंगल वुमेन सोसायटीची स्थापना करण्यात आली. या सोसायटीमध्ये 19 हजार महिलांचा समावेश आहे. या सोसायटीमार्फत कोणत्याही हमीविना एकल मातांना घर खरेदीसाठी कर्ज दिले जात आहे.

आई-वडिलांच्या संबंधात कटुता आल्यानंतर दोघेही वेगळे होतात आणि बाळाचे संगोपन करण्याची जबाबदारी आईवर येते. असे नाही की, वडील मुलाची जबाबदारी नाकारतात; परंतु आईला नैसर्गिकरीत्या पालक म्हणून मानले आहे. म्हणूनच न्यायालयाकडून बहुतांश वेळा मुलाची जबाबदारी आईकडेच दिली जाते. भारतातच नाही, तर जगातील अनेक देशांत एकल पित्यांची संख्यादेखील वाढली आहे. परंतु, एकल मातांबाबत समाजाचा पाहण्याचा द़ृष्टिकोन हा कठोर असताना एकल पित्याकडे पाहण्याचा द़ृष्टिकोन मात्र उदारतेचा असतो.

'जनरल ऑफ फेमिनिस्ट फॅमिली थेरेपी'त प्रकाशित एका अभ्यासानुसार जेव्हा वडील पाल्याची जबाबदारी एकट्याने स्वीकारण्याचा निर्णय घेतात तेव्हा त्याला महान म्हटले जाते. यालट बाळाचा सांभाळ करणे ही आईची पहिली आणि मूलभूत जबाबदारी असल्याचे ठसवले जाते. या अभ्यासात असेही म्हटले आहे की, एकल मातांचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व हे प्रत्येक क्षणी तपासले जाते. नाते सांभाळण्यास अपयश आल्याचे खापर फोडण्यापासून अहंकारी, जिद्दी, हटवादी अशा नकारात्मक उपमा एकल मातांना दिल्या जातात. एकल पित्याकडे मात्र अडचणीच्या काळातही मुलाचे पालनपोषण करणारा आणि सर्वप्रकारच्या जबाबदार्‍या पार पाडताना संतुलन राखणारा व्यक्ती म्हणून पाहतात.

मानसोपचारतज्ज्ञ जेफ्री गाडेरे यांनी यासंदर्भात म्हटले की, परिस्थिती कशीही असली, तरी महिलांना त्यांंच्या मातृत्वाच्या जबाबदारीतून कोणतीही ढिल दिली जात नाही. एखाद्या वेळी शारीरिक, आर्थिक किंवा अन्य कारणांमुळे मुलांच्या इच्छा-आकांक्षांची पूर्तता केली नाही, तर तिच्या मातृत्वावर प्रश्नांच्या फैरी झाडल्या जातात. दुसरीकडे एकल पित्याच्या प्राथमिक जबाबदारीत मुलांचा सांभाळ करण्याचा समावेश नसला, तरी आणि अशा स्थितीत त्याने मुलांकडे लक्ष दिले नाही, तरी सहानुभूती ही वडिलांना अधिक मिळते. एका सामान्य कुटुंबामध्ये आई-वडिलांचा मुलगा एखाद्या सामाजिक नियमांचे उल्लंघन करत असेल, तर त्याची चूक समजून त्याला माफ केले जाते.

परंतु, एकल मातेसोबत राहणार्‍या मुलांकडून एखादे कृत्य घडले, तर आईच्या मातृत्वावर शंका उपस्थित केल्या जातात आणि लाच्छनांस्पद आरोप-प्रत्यारोप केले जातात. ब्रिटनचे विद्यमान पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी 1995 मध्ये 'द स्पेक्टेटर मॅगेझिन'मध्ये एकल मातांच्या वाढत्या संख्येवर टीका केली होती. त्यांनी एकल मातांच्या पाल्यांना अडाणी, आक्रमक आणि बेकायदा असा उल्लेख केला होता. 2019 मध्ये पंतप्रधानपदाच्या काळात त्यांना या मतावर प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी हा विचार राजकारणात येण्यापूर्वीचा होता

, असे उत्तर दिले. वास्तवात, आपली सामाजिक, आर्थिक आणि राजकीय व्यवस्थाच अशी तयार झाली आहे की, एकल मातांकडे नेहमीच संशयातूनच पाहिले जाते. शेरॉन हेज यांनी 'द कल्चरल काँट्रिडिक्शन ऑफ मदरहूड' या पुस्तकामध्ये लिहिले आहे की, समाज हा एकल मातांचे करिअर, आरोग्य या गोष्टींना महत्त्व देत नाही. फक्त चांगली आई होण्याची अपेक्षा केली जाते. म्हणजेच या मातांनी आपले संपूर्ण आयुष्य, ऊर्जा, वेळ हा आपल्या मुलांचा सांभाळ करण्यातच व्यतीत करावा, असे समाजाला वाटत असते; पण ही बाब खरोखरच संयुक्तिक आहे का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news