पंढरपूर : पालखी मार्गावर साकारले विठ्ठलाचे शब्दशिल्प

पालखी
पालखी

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, या संत तुकाराम महाराज यांच्या वचनाचे मूर्तरूप म्हणून श्री विठ्ठलाचे त्रिमितीतील 20 फुट उंचीचे शब्दशिल्प पालखी मार्गावरील चिंचणी (ता.पंढरपूर) येथे उभारणी करण्यात येत आहे. हे शब्दशिल्प संगम व सांस्कृतिक समृद्धतेचे प्रतीक आहे येणार्‍या भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.

शब्दशिल्पाची संकल्पना छायाचित्रकार व वारी परंपरेचे अभ्यासक व आत्मभान ट्रस्टचे अध्यक्ष संदेश भंडारे यांचे आहे. हे शब्दशिल्प संगम व सांस्कृतिक समृध्दतेचे प्रतीक आहे. हे शब्दशिल्प उभारण्यात मोहन अनपट यांचाही मोलाचा वाटा आहे. हे शब्दशिल्प उभारण्याची जबाबदारी आत्मभान ट्रस्टची असून चिंचणी ग्रामस्थदेखील आर्थिक जबाबदारी स्वीकारत आहेत. तसेच राज्यातील संवेदनशील नागरिकही आर्थिकतेची जबाबदारी घेत आहेत. या शिल्पात मराठी, कानडी, हिंदी, उर्दू, फारसी, अरबी, तेलगू अशा अनेक भाषांतील मराठीमध्ये स्थान मिळवलेले शब्द विठ्ठलरुपात साकारले आहेत.

मराठीत रुजलेल्या अन्य भाषेतील समानार्थी शब्दांची रेखाटने या शिल्पात आहेत. विविध भाषेतील शब्दांनी लिपी व आकार बदलेला असला तरी त्यांचा अर्थ मात्र तोच राहील, याची खबरदारी घेण्यात आली आहे. भाषा व शब्द कोणतेही असो त्याचा अर्थ विठ्ठल हाच राहिला आहे. त्यामुळे ही प्रतिकृती पालखी मार्गावरुन येणार्‍या बहुभाषिक भाविकांना आकर्षण ठरणार आहे.

या शब्द शिल्पावर पालखी, मंदिर, मृंदग, ऐरण, कुस्ती, मोट, इमारत, हात तमाशा, जीभ, अग्नी, कापळ, टोपी, येळकोट, बाजार, पोळी, झडप, वारंवार, गरीब, दुकान अशा विविध शब्दांचे विविध भाषेत रेखाटन करण्यात आले असल्याचे संदेश भंडारे व मोहन अनपट यांनी सांगीतले. येत्या 10 जुलै रोजी आषाढी यात्रा सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम, संत मुक्‍ताताई, संत एकनाथ, संत निवृत्ती यांच्यासह शेकडो पालखी पंढरीकडे येत आहेत. या पालखीतील भाविकांना या शब्दशिल्पातील भावनिकता तसेच शब्दमाहात्म्य दिसून येणार आहे.

भाविक विठ्ठल भक्तीत अधिक तल्लीन
कोरोनामुळे दोन वर्षे बंद झालेली पंढरीची वारी पुन्हा निर्बंधमुक्तपणे साजरी होत आहे. या आषाढी वारीला लाखोंच्या संख्येने बहुभाषिक भाविक येत आहेत. या भाविकांना संगम व सांस्कृतिक समृद्धतेचे प्रतीक असलेल्या श्री विठ्ठलासह मृदंग, मंदिर, ऐरण, तमाशा, हात, टोपी असे साकारण्यात आलेले शब्द शिल्प पाहून भाविक विठ्ठल भक्तीत अधिक तल्लीन होतील.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news