निरामय आयुष्याचा ‘योग’

निरामय आयुष्याचा ‘योग’
निरामय आयुष्याचा ‘योग’

आठ वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदींनी 'युनो'च्या व्यासपीठावरून आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्याचे आवाहन केले होते. गेली 8 वर्षे 21 जून हा दिवस 'आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून साजरा केला जात आहे. हा दिवस साजरा करताना त्याचे महत्त्व समजून घेणे व त्याला दैनंदिन जीवनात स्थान देणेही आवश्यक आहे. योग शब्दाचा सोपा अर्थ जोडणे. सर्व विश्वात भरून राहिलेल्या ईश्वरी शक्तीशी व्यक्तीने जोडून घेण्याचे शास्त्र म्हणजे योग. गेल्या काही वर्षांत रामदेव बाबा यांनी योगाचा मोठ्या प्रमाणावर प्रचार केल्याचा परिणाम असा झाला की, हा प्रत्येकाला करता येण्याजोगा विषय आहे आणि आरोग्य उत्तम राखण्यासाठी योगाइतके प्रभावी साधन नाही, ही जाणीव देशभरातल्या लक्षावधी लोकांना झाली.

परदेशातही अनेक योगशिक्षण संस्था स्थापन होत आहेत. लाखोंच्या संख्येने युरोपियन व अमेरिकन नागरिक सध्या या उपचार पद्धतीचा लाभ घेत आहेत. दीड हजार वर्षांपासून भगवान पाणिनींनी योगशास्त्रावरील पहिला ग्रंथ लिहिला, जो आजही प्रमाण मानला जातो. पाणिनींनी आपल्या योगसूत्रामध्ये असे वर्णन केले आहे की, या अभ्यासाने विश्वाचे समग्र ज्ञान प्राप्त करू घेता येते. इतकेच नव्हे तर मानवी जीवनाचे अंतिम उद्दिष्ट म्हणजे परमेश्वराशी सायुज्जता, तीही प्राप्त होते. त्यासाठी साधनेच्या आठ पायर्‍या पाणिनींनी सांगितल्या. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी. समाधी अवस्थेत मानवाला परमोच्च सुखाची प्राप्ती होते; पण या अंतिम पायरीपर्यंत प्रवास करताना साधकाला अनेक सिद्धी प्राप्त होतात.

स्वामी विवेकानंदांनी 'राजयोग' या पुस्तकात या सर्व प्रवासाचे फार सुंदर वर्णन केले आहे. या सर्व सिद्धी प्राप्त झालेल्या योग्यास जगात अशक्य असे काही नाही, हे त्यांनी स्पष्ट केले आहे. या सर्वच पायर्‍या मानवी जीवनाच्या उन्नयनाचा मार्ग आहे. प्रत्येक जण आठ पायर्‍यांची साधना पूर्ण करू शकेल असे नाही; पण तो जेवढी प्रगती करेल तेवढी त्याची शारीरिक, मानसिक, बौद्धिक व आत्मिक प्रगती होत जाते. पहिल्या काही पायर्‍या थोड्याशा मार्गदर्शनाने साध्य होतात; पण पुढच्या पायर्‍या मात्र तज्ज्ञ मार्गदर्शक किंवा गुरूच्या आशीर्वादानेच साध्य होतात. यम व नियम हे शरीर व मनाच्या शुद्धीचे प्रयोग आहेत. अधिक कठीण योगिकक्रिया करण्यासाठी शरीर व मन सक्षम असले पाहिजे. म्हणून या पायरीचा आग्रह असतो. 'योगः चित्तवृत्ती निरोधः' असे एक सूत्रच पाणिनींनी सांगून ठेवले आहे.

संयम, मनाची एकाग्रता साध्य होण्यासाठी पुष्कळ प्रयत्न करावे लागतात. ही एकाग्रता जीवनाच्या इतरही सर्व क्षेत्रांत आवश्यक असतेच.
योगासने सांधे, स्नायू व मज्जा या तिन्हींस कार्यक्षम करतात. शरीर सुदृढ, लवचिक होते, अनावश्यक चरबी झडून जाते. योगासनांमुळे अनेक अंतस्त्रावी ग्रंथी कार्यक्षम होतात. डायबेटिस, ब्लड प्रेशरसारखे दुर्धर आजार योगासनांच्या नियमित अभ्यासाने नियंत्रणात येतात. योगशास्त्र तर असे सांगते की, असलेल्या व्याधी तर योगासनांच्या अभ्यासाने दूर होतातच; पण नियमित योगासने करणारा साधक सहजपणे सर्व व्याधींपासून मुक्त होतो.

शरीर आणि मनाची शक्ती वाढवण्याचा हा अभ्यास लहानपणापासूनच केला पाहिजे. कारण, या वयात या सर्व यौगिक क्रिया अगदी सहज शिकून घेता येतात. भावी आयुष्यातील मोठमोठ्या जबाबदार्‍या पेलण्याची क्षमता या अभ्यासातूनच प्राप्त होते. पाठांतर, स्मरणशक्ती, निरीक्षण शक्ती, आकलन शक्ती यांत वाढ होते. या योगिक क्रिया कुठल्याच धर्मतत्त्वाच्या विरोधी नाहीत. त्यामुळे सर्वांनीच त्यांचा लाभ घेण्याची आवश्यकता आहे.

– डॉ. शरद कुंटे,
ज्येष्ठ विचारवंत

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news