निक्की हेली ’यूएस प्रेसिडंट’?

निक्की हेली ’यूएस प्रेसिडंट’?
Published on
Updated on

'निम—ता रंधवा' असे मूळ नाव असलेली एखादी व्यक्ती जर अमेरिकेसारख्या महासत्तेच्या राष्ट्राध्यक्षपदावर पोहोचली तर..? अर्थातच या 'जर-तर'च्या गोष्टींना वर्तमानकाळात काहीच अर्थ नसतो. मात्र, निम—ता रंधवा ऊर्फ निक्की हेली यांनी त्यादृष्टीने आता प्रवास सुरू केला आहे. 2024 मध्ये त्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवार होऊ शकतात. त्यासाठीच्या पक्षांतर्गत प्राथमिक निवडणुकीसाठी त्यांनी आपली उमेदवारी घोषित केली असून, त्यांचा मुकाबला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी आहे.
साऊथ कॅरोलिनामधील बॅम्बर्ग येथे पंजाबमधून स्थलांतरित झालेल्या भारतीय दाम्पत्याच्या पोटी निक्की यांचा जन्म झाला. याच साऊथ कॅरोलिनाच्या पहिल्या महिला गव्हर्नर बनण्याचा मान निक्की यांनी पटकावला.

2011 ते 2017 या काळात त्या साऊथ कॅरोलिनाच्या गव्हर्नर होत्या. 2004 मध्ये त्या सर्वप्रथम साऊथ कॅरोलिनाच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्हमध्ये निवडून गेल्या होत्या. सलग तीनवेळा त्या निवडून आल्या आणि तिसर्‍या टर्मवेळीच त्यांना गव्हर्नर बनण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी त्या अमेरिकेतील सर्वात कमी वयाच्या गव्हर्नरही ठरल्या होत्या. 2017 मध्ये त्या प्रेसिडेन्शियल कॅबिनेटमध्ये समाविष्ट होणार्‍या पहिल्या भारतीय-अमेरिकनही ठरल्या. ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळातच त्या संयुक्त राष्ट्रांमधील अमेरिकेच्या राजदूतही बनल्या. अत्यंत कणखर नेत्या म्हणून त्यांची अमेरिकेतील राजकीयक्षेत्रात ओळख आहे. लहान वयात आईचे कापडाचे दुकान ज्या समर्थपणे त्या सांभाळू शकत होत्या, त्याच क्षमतेने मोठेपणी त्यांनी साऊथ कॅरोलिनासारख्या राज्याचा कारभारही सांभाळला.

उत्तर कोरियाने पुन्हा क्षेपणास्त्र चाचणी केली तर अमेरिका लष्करी कारवाई करण्यास मागे-पुढे पाहणार नाही, असे किम जोंग उन यांना धमकावण्याची हिंमतही त्यांनी अमेरिकेच्या राजदूत म्हणून दाखवली होती. ट्रम्प यांना सुरुवातीपासूनच निक्की यांनी कडवा विरोध केला होता. पक्षांतर्गत निवडणुकीत ट्रम्प यांनी बाजी मारल्यावर त्यांनी 'मी ट्रम्प यांना निवडणुकीत मत देईन; पण मी काही त्यांची चाहती नाही,' असे स्पष्टपणे सांगितले होते. आता याच ट्रम्प यांच्यासमोर त्या स्वतःच उभ्या ठाकल्या आहेत. 15 फेब—ुवारीला त्या साऊथ कॅरोलिनाच्याच चार्ल्सटन येथे आपले पत्ते उघड करणार आहेत. अर्थात, या शर्यतीत केवळ त्या आणि ट्रम्पच आहेत असे नाही; तर माजी उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स, फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डिसँटिस आणि माईक पॉम्पियोही या शर्यतीत असल्याचे म्हटले जाते. सध्या तरी ट्रम्प यांचेच पारडे जड वाटत असले तरी भविष्यात काय होईल हे मात्र सांगता येत नाही.

– सचिन बनछोडे 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news