दप्‍तराचे ओझे होणार हलके!

दप्‍तराचे ओझे होणार हलके!
दप्‍तराचे ओझे होणार हलके!

कोल्हापूर : प्रवीण मस्के पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आता प्रत्येकी एकाच पुस्तकावर तिमाहीचे शिक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून, दप्तराचे ओझे सुमारे दोन किलोंनी घटणार आहे. गेल्या काही वर्षांपासून दप्तराचे ओझे कमी करण्याचे शासनस्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. तत्कालीन युती सरकारच्या काळात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती नेमली.

विद्यार्थ्यांच्या पाठीवरील शिक्षणाचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न झाला; परंतु यात म्हणावे तसे यश आले नाही. यापूर्वी पहिली ते चौथीच्या अभ्यासक्रमात भाषा, गणित, खेळ खेळू, इंग्रजी, परिसर अभ्यास अशी 4 ते 5 पुस्तके होती. याबरोबरच प्रत्येक विषयाच्या वह्या, शुद्धलेखन वही, कंपास, पाणी बॉटल, रूमाल आदी साहित्य असे. त्यामुळे दप्तराचे ओझे प्रमाणापेक्षा जास्त होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला होता. काही शाळांनी दप्तर शाळेत ठेवायची व्यवस्था केली; परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही.

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर यंदाच्या वर्षी 13 जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षारंभ होणार आहे. यासाठी पालक, मुलेही उत्साही आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी नुकतेच शालेय विद्यार्थ्यांना दिलासादायक निर्णय घेतला आहे. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना यापुढे तिमाहीसाठी एकच पुस्तक अभ्यासासाठी असणार आहे. विद्यार्थ्यांना दररोज दप्तरात सर्व विषयांची पुस्तके घेऊन जाण्याची गरज भासणार नाही.

सरकारचा हा निर्णय स्तुत्य आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे निश्‍चितच कमी होईल. जिल्हा परिषद शाळांमध्ये यासाठी अडचण येणार नाही; परंतु खासगी शाळांमध्ये याची काटेकोर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.
– रवी पाटील, मुख्याध्यापक,
कुमार विद्यामंदिर नं.3, कुरुंदवाड

विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्याचा शासनाचा प्रयत्न अनेक वर्षांपासून सुरू आहे. प्रत्येक तिमाहीसाठी सर्व विषयांचे एक पुस्तक झाल्याने दप्तराचे बरेच ओझे कमी होईल. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे प्रश्‍न कमी होतील.
या निर्णयाचे स्वागत आहे.
– प्रसाद पाटील, माजी सदस्य, दप्तराचे ओझे करणे
शासनस्तरीय समिती

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news