छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : अंगावरील पांढरे डाग घालवून देतो, असे आमिष दाखवून बोगस डॉक्टरसह दोघांनी कडा (ता. आष्टी) येथील एका प्राचार्यांना पाच लाख रुपयांचा गंडा घातला. नोव्हेंबर 2023 मध्ये हा प्रकार घडला होता. डॉक्टरांची बोगसगिरी समोर आल्यावर प्राचार्यांच्या पत्नीने दामिनी पथकाची मदत घेऊन सोमवारी (दि. 8) दोघांनाही पकडले. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. रंजीत सलीम खान आणि शिव शर्मा, अशी आरोपींची नावे आहेत. 64 वर्षीय प्राचार्यांच्या फिर्यादीनुसार, 6 नोव्हेंबर 2023 रोजी ते दुचाकीने पत्नीला सोडण्यासाठी औरंगपुरा भागात आले होते. पत्नीला सोडून ते परतत असताना सकाळी 10 वाजता एका अनोळखीने त्यांना गाठले. शिव शर्मा असे नाव सांगून त्याने अंगावरील पांढरे डाग बरे होऊ शकतात, असे सांगितले.
आपल्या ओळखीचे डॉ. खान असून ते हे डाग बरे करू शकतात असे सांगत मोबाइल क्रमांक घेतला. यानंतर काही वेळातच प्राचार्यांना खान नावाने कॉल आला. दुसऱ्या दिवशी प्राचार्यांची भेट घेत, हे डाग बरे होऊ शकतात असे सांगितले. यानंतर उपचाराच्या नावाखाली त्याने प्राचार्याकडून 3 लाख 99 हजार आणि औषधीच्या नावाखाली 1 लाख 10 हजार रुपये उकळले. उपचार केल्यानंतरही फरक पडला नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे प्राचार्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या लक्षात आले.
दामिनी पथकाची घेतली मदत
डॉ. रंजीत सलीम खान आणि शिव शर्मा हे आरोपी सोमवारी पुन्हा पैसे उकळण्यासाठी प्राचार्यांच्या घरी येणार होते. त्यामुळे प्राचार्यांच्या पत्नीने दामिनी पथकाला ही माहिती दिली. या माहितीवरून पोलिस उपायुक्त अपर्णा गिते, पोलिस निरीक्षक प्रवीणा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथकाच्या पीएसआय कांचन मिरधे, जमादार निर्मला निंभोरे, पोलिस अंमलदार सुरेखा कुकलारे, अयोध्या दौंड, प्रियंका भिवसने, मनीषा बनसोडे यांच्या पथकाने सापळा रचून या दोन तोतया डॉक्टरांना ताब्यात घेतले
चाळीस वेळा टोचली सुई
बोगस डॉ. खान याने प्राचार्यांच्या घरी उपचाराच्या नावाखाली तब्बल 40 वेळा सुई टोचली आणि पांढरा द्रव पाइपने बाहेर काढून दाखविला. त्यानंतर 3 लाख 99 हजार रुपये त्यांचा साथीदार संतोष सुतार याच्या बँक खात्यावर आरटीजीएस करायला लावले, असे फिर्यादीत म्हटले आहे.