गर्भपात प्रकरण : उमलण्यापूर्वीच किती कळ्या खुडणार?, गर्भपात रॅकेटमुळे जिल्हा हादरला

गर्भपात प्रकरण : उमलण्यापूर्वीच किती कळ्या खुडणार?, गर्भपात रॅकेटमुळे जिल्हा हादरला
Published on
Updated on

कोल्हापूर : दिलीप भिसे : गर्भपात प्रकरण : मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी केंद्रासह राज्य शासनाकडून प्रभावी उपाययोजना राबविण्यात येत आहेत. स्त्री भू्रणहत्या आणि गर्भलिंग निदान चाचणी रोखण्यासाठी प्रचलित कायद्यामध्ये सुधारणा करून कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे, तरीही आर्थिक मोहाला बळी पडून समाजकंटकांकडून कायद्याचे उल्लंघन होत आहे. उमलण्यापूर्वीच कळ्या खुडल्या जात आहेत. कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात अलीकडच्या काळात घडणार्‍या घटना काळजावर घाव घालणार्‍या आहेत. यावर प्रकाशझोत टाकणारी मालिका आजपासून…

पुरोगामी व सामाजिक चळवळीचे प्रेरणास्रोत असलेल्या करवीरनगरीत उमलण्यापूर्वीच कळ्या खुडणार्‍या अन् माणुसकीला काळिमा फासणार्‍या 'गर्भपात' टोळीचे कारनामे कोल्हापूर पोलिसांनी उघडकीला आणल्याने जिल्हा हादरला आहे. स्त्री भू्रणहत्यांच्या वाढत्या घटना समाजमनावर घाव घालणार्‍या आहेत. कोल्हापुरातील रंकाळा टॉवर आणि पडळ (ता. पन्हाळा) येथील बहुचर्चित 'गर्भपात' अड्ड्यांवर समाजकटंकांनी आजवर किती कळ्या खुडल्या…? फुकट्या कमाईला सोकावलेल्या नराधमांच्या कृत्यांमुळे संवेदनशील जिल्ह्याच्या लौकिकाला पुन्हा एकदा धक्का बसला आहे.

संपूर्ण राज्याला हादरवून सोडणार्‍या बीड जिल्ह्यातील स्त्री भू्रणहत्यांच्या प्रकरणानंतर अलीकडे दोन-अडीच वर्षांच्या काळात कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात एका पाठोपाठ एक घटना चव्हाट्यावर येऊ लागल्या आहेत. परिते-कुरुकली (ता. करवीर) येथील बेकायदा गर्भलिंग निदान सेंटर प्रकरणामुळे राज्यभर नामुष्की झाली. फराकटेवाडी- बोरवडे येथील डॉक्टर पत्नीसह 17 जणांविरोधात न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले.

गर्भपात प्रकरण : कायदा धाब्यावर!

जिल्ह्यातील अशा वाढत्या घटना प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगणार्‍या ठरत आहेत. शाहूपुरीतील व्हिनस कॉर्नरजवळील डॉक्टर दाम्पत्यास अटक, धामोड (ता. राधानगरी) येथील सेंटरवरील छापा, दारवाड (भुदरगड) येथील तिघांना अटक, सोनोग्राफी मशिन पुरविणार्‍या कासेगाव येथील डॉक्टरवर राजवाडा पोलिसांनी केलेली कारवाई, शिरसे (ता. राधानगरी) येथील तरुणाला ठोकलेल्या बेड्या, कसबा वाळवे येथील एजंटांवर झालेली कारवाई बहुचर्चित ठरली होती.
पैशाला चटावलेल्या टोळीवर बडगा!

एकापाठोपाठ एक झालेल्या कारवाईनंतर आता विशेष पथकाने गर्भपात करणार्‍या टोळीला गजाआड केले आहे. विशेष पथकाने गुरुवारी मध्यरात्री अंबाई टँक परिसरातील हरिओमनगर आणि पडळ (ता. पन्हाळा) येथील बोगस डॉक्टरसह एजंटाला बेड्या ठोकून पैशाला चटावलेल्या आणखी एका टोळीवर कारवाईचा बडगा उगारल्याने टोळीचे कारनामे चव्हाट्यावर आले आहेत.

तपासाची व्याप्ती वाढविण्याची गरज

गर्भपात करण्यापूर्वी गर्भवतींचे सोनोग्राफीद्वारे बेकायदा गर्भलिंग निदान केले जाते. 'नकोशी' असल्यास माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य केले जाते. कोल्हापूर व पडळ येथील जेरबंद केलेल्या संशयितांनीही बेकायदा गर्भलिंग निदान केले असावे का, हा तपासाचा मुद्दा असला, तरी या टोळीची पाळेमुळे शोधून काढण्यासाठी तपासाची व्याप्ती वाढविण्याची गरज आहे.

कथित समाजकंटकांचे मुखवटे चव्हाट्यावर आणा

चिरीमिरीसाठी समाजकंटकांना पाठीशी घालणार्‍या किंबहुना संशयितांची प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष पाठराखण करण्याचा प्रयत्न करणार्‍या कथित समाजकंटकांचाही मुखवटा चव्हाट्यावर आणण्याची गरज आहे. एव्हाना अशा मंडळींना गुन्ह्यात सहआरोपी करण्याचीही मागणी महिला संघटनांकडून जोर धरू लागली आहे.

गर्भपातप्रकरणी अटक केलेल्या टोळीची व्याप्ती मोठी असावी, असा संशय आहे. टोळीत सक्रिय असलेल्यांचा निश्चित छडा लावण्यात तपासाधिकार्‍यांना यश येईल.
– श्रद्धा आम्बले, प्रमुख, महिला दक्षता पथक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news