सांगली : बांधकाम व्यावसायिक खुनाचे गूढ कायम!

सांगली : बांधकाम व्यावसायिक खुनाचे गूढ कायम!
Published on
Updated on

सांगली : पुढारी वृत्तसेवा अत्यंत गुंतागूंत व आव्हानात्मक बनलेल्या सांगलीतील बांधकाम व्यावसायिक माणिकराव पाटील यांच्या खुनाचे गूढ उकलण्यात पोलिस यंत्रणा सध्या तरी सपशेल अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे खुनाचे गूढ कायम आहे. दरम्यान, तुंग (ता. मिरज) येथील त्या महिलेस पुन्हा चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या महिलेच्या घराच्या बांधकामाचे काम पाटील स्वत: करीत होते. गेल्या सहा महिन्यांत त्यांची या महिलेच्या कुटुंबाशी जवळिकता खूप वाढलेली होती. महिलेच्या पतीसोबत काही महिन्यांपूर्वी मृत पाटील यांचा वादही झाला होता. कदाचित खुनामागे याच वादाचे कारण असावे, असा पोलिसांना दाट संशय आहे. दोन दिवसांपूर्वी या महिलेसह तिच्या पतीला चौकशीसाठी ताब्यात घेतले होेते. चौकशी करून त्यांना सोडून दिले होते. त्यानंतर पुन्हा काही माहिती हाती लागल्याने या महिलेस पुन्हा ताब्यात घेण्यात आले आहे.

गेल्या आठवड्यात पाटील यांना प्लॉट दाखविण्याचे अमिष दाखवून तुंग येथे बोलावून घेण्यात आले होते. दि. 13 ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजता पाटील तुंगमध्ये गेले होते. तेथून त्यांचे त्यांच्याच कारमधून अपरहण करण्यात आले होते. दि. 17 ऑगस्ट रोजी त्यांचा कवठेपिरान येथे नदीत मृतदेह आढळून आला होता. त्यांचे दोरीने हात बांधून जिवंतच नदीत फेकण्यात आले होते. हात बांधल्याने त्यांना पोहता आले नाही. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. पाटील यांच्या खुनाचा छडा लावण्यासाठी सांगली ग्रामीण, पोलिस उपअधीक्षक कार्यालय तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील जवळपास 70 पोलिस तपासात गुंतून आहेत. अनेक मुद्यावर तपास सुरू आहे. पण हाती अजून यश येेत नसल्याने पोलिस यंत्रणा हतबल झाली असल्याचे चित्र आहे.

सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे फुटेज व पाटील यांचा मोबाईल यावर सध्या तपासाला जोर देण्यात आला आहे. पाटील यांच्या कारचाही सुगावा लागलेला नाही. त्यांचा खून कदाचित 'सुपारी' देऊन केला असण्याची शक्यता आहे. 'सुपारी' घेणारे बाहेरचे असू शकतील, असा पोलिसांचा अंदाज आहे. विविध मुद्यावर हा तपास सुरू असून लवकरच छडा लागेल, असा दावा गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news