कोल्हापूर मनपाची अंतिम प्रभाग रचना जाहीर

कोल्हापूर मनपाची अंतिम प्रभाग रचना जाहीर
Published on
Updated on

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा  सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी शुक्रवारी रात्री अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली. 31 पैकी काही प्रभागांत किरकोळ बदल झाले आहेत. प्रगणक गट बदलल्याने मतदारही दुसर्‍या प्रभागात गेले आहेत. त्यामुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. रात्री उशिरापर्यंत महापालिकेच्या ताराबाई पार्कातील निवडणूक कार्यालयात अधिकारी प्रभाग रचनेची छाननी करत होते.

राजकीय पक्षांसह इच्छुकांचे लक्ष प्रभाग रचनेकडे लागले होते. प्रभाग रचनेचे गॅझेट प्रसिद्ध झाल्यानंतर इच्छुकांकडूनही माहिती घेतली जात होती.

दरम्यान, निवडणूक कार्यालयासह चारही विभागीय कार्यालयांत नागरिकांना शनिवारी प्रभाग रचना पाहता येईल, असे अधिकार्‍यांनी सांगितले. महापालिका प्रशासनाने फेब—ुवारीमध्ये प्रारूप प्रभाग रचना आयोगाला सादर केली होती. तसेच त्यावर आलेल्या 115 हरकतींचा अहवालही 4 मार्चला दिला होता. काही हरकतींची दखल घेऊन राज्य निवडणूक आयोगाने बदल केले आहेत.

कोल्हापूर शहराची लोकसंख्या सुमारे 6 लाख असे गृहीत धरून नगरसेवकांची संख्या 92 अशी निश्चित करण्यात आली आहे. प्रत्येकी 3 नगरसेवकांचा 1 यानुसार 30 प्रभाग आणि 2 नगरसेवकांचा 1 असे एकूण 31 प्रभाग झाले आहेत.

एका प्रभागातील लोकसंख्या सुमारे 18 ते 20 हजार असणार आहे. त्यातील मतदारांची संख्या सुमारे 15 ते 16 हजार असेल. यापूर्वी एक प्रभाग आणि 4 ते 5 हजार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी इच्छुकांना जास्त कसरत करावी लागत नव्हती. परंतु, आता सुमारे 16 हजार मतदारांचा प्रभाग असल्याने त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी इच्छुकांची दमछाक होणार आहे.

आरक्षण सोडतही याच महिन्यात

पहिलीच निवडणूक आहे, असे गृहीत धरून प्रभाग रचना व आरक्षण निश्चित करावे, असे आयोगाने आदेश दिले आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी (एस.सी.) 12, तर अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी (एस.टी.) 1 जागा निश्चित होणार आहे. उर्वरित 79 जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी (खुला) असतील. तिन्ही प्रवर्गांत प्रत्येकी 50 टक्के जागा महिलांसाठी आरक्षित असून, याच महिन्यात आरक्षण सोडत काढली जाणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news